मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या टप्प्याअंतर्गत सदर जाहीर सूचीतील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. ०६ जून व दि. ०७ जून, २०२२ या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.
सदर भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक २१५, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.
दि. ६ जून, २०२२ रोजी पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक १ ते १० या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक १ ते १४ उमेदवार, तसेच सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक १ ते २४ उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक १ ते ७५ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी २.०० वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक ११ ते २० या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक १५ ते २७ उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक २५ ते ४८, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक ७६ ते १५० उमेदवार यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
दि. ७ जून, २०२२ रोजी सकाळी १० वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक २१ ते ३० या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. याच सत्रात उपअभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक २८ ते ४१ उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक ४९ ते ७२ उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक १५१ ते २२५ या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी २.०० वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक ३१ ते ४० या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक ४२ ते ५४ उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक ७३ ते ९५ उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक २२६ ते २९७ या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव श्री. राजकुमार सागर यांनी केले आहे.