हे मीम नव्हे, तर हिंदूद्वेषाची थीम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2022   
Total Views |
 
shivling
 
 
 
 
 
हिंदूंच्या संयमाचा फायदा आजवर अनेकांनी घेतला. सहिष्णू भूमिकेमुळे हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. मात्र, केंद्रामध्ये मोदी सरकार आल्याने सध्या हिंदूंची ओळख पुन्हा एकदा नव्याने उजळू लागली. नुसती उजळत नसून, तर पुन्हा हिंदू धर्माला आणि सोनेरी दिवस पाहण्याची संधी मिळू लागली आहे. मात्र, यातही हिंदूद्वेष्ट्या राज्यकर्त्यांबरोबरच पुरोगामी पत्रकारितेच्या मशाली मिरवणार्‍या दैनिकांना हिंदू धर्मावर टिंगलटवाळी करण्याचे दिवास्वप्न पडू लागले. नुकत्याच रविवार, दि. २२ मेच्या अंकात एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राने आपला हिंदूद्वेष जगजाहीर मांडला आणि तो छापून प्रसारितही केला. या दैनिकाकडून ज्ञानवापी मुद्द्यावर व्यंगचित्राद्वारे हिंदूंची खिल्ली उडवण्यात आली. या व्यंगचित्रात ‘भाभा अणुसंशोधन’केंद्राला शिवलिंग दाखवण्यात आले असून,सदर व्यंगचित्राचे शीर्षक ’बम भोलेनाथ’ असे होते. हे व्यंगचित्र वर्तमानपत्राच्या ’दुनिया’ स्तंभात प्रसिद्ध झाले होते. याच वृत्तपत्रात आणखी एका व्यंगचित्रामध्ये ताजमहालच्या तळघरातील दरवाजे उघडतानाविषयीचे देखील भाष्य करण्यात आले आहे.
 
 
 
 
ज्ञानवापी सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग मिळाल्यानंतरची बाब समोर आल्यानंतर अनेकांनी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, पत्रकार साबा नक्वी, निवृत्त ‘आयएएस’ सूर्य प्रताप सिंह, पीस पार्टीचे शादाब चौहान आणि राजदचे नेते कुमार दिवाशंकर यांनी आपल्या मुक्ताफळांनी हिंदूंची श्रद्धा दुखावली. तसेच, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक रतन लाल यांनाही अटक करण्यात आली. मात्र, त्यांना दुसर्‍याच दिवशी जामीनही मंजूर करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, याच रतनलाल यांनी न्यायालयात स्वतःला हिंदू घोषित केले. अशा प्रकारे हिंदूंच्या पूजा, त्यांचे सण आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवर आक्षेपार्ह टिप्पणी करू शकतो आणि नंतर स्वत:ला हिंदू म्हणवून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दावा करू शकता, अशा परिस्थितीत न्यायालयाकडून कठोर शिक्षा होणार नाही, असा विचार करून अनेक जण हिंदू धर्माविरूद्ध गरळ ओकण्याचे धाडस करतात. सध्या अशा हिंदूद्वेष्ट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, अभिव्यक्तीच्या आड त्यांचा हिंदूविरोध अधिक तीव्र होत आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, घटनेचे तथ्य आणि सत्य समाजासमोर योग्यरित्या मांडणे महत्त्वाचे असते. पण, अभिव्यक्तीचा फायदा घेत हिंदू विरोधाची भाकरी भाजणार्‍यांना अद्दल घडवणे ही काळाची गरज बनत चालली आहे.
 
 
हिंदूंनो...वाचाल तर वाचाल!
 
 
  
हिंदू धर्माची आणि धर्मीयांची खिल्ली उडवणे हा पुरोगामी ट्रेंड तसा नवीन नाहीच. त्यातही बड्या बड्या माध्यम संस्थांना तर हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडताना अधिक उत्साह येतो. हिंदू म्हटलं की, यांच्या लिखाणाला वेगळीच धार चढते. या नामांकित इंग्रजी दैनिकाने हिंदूंच्या आस्थेची व्यंगचित्राच्या पदराआड अशी निंदा केली. मात्र, जर हे व्यंगचित्र इतर धर्माच्या श्रद्धेशी संबंधित असेल, तर कोणत्याही मुख्य प्रवाहातील माध्यमे त्याला हात लावायलाही धजावणार नाही. परंतु, जेव्हा हिंदूंचा विचार केला जातो, तेव्हा त्यांच्या श्रद्धांची थट्टा करणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. कारण, हिंदू समाजाच्या श्रद्धेची खिल्ली उडवणे हे उदारमतवादी असण्याचे लक्षण मानले जाऊ लागले. ज्ञानवापी प्रकरणातही काशिविश्वनाथ हे हिंदूंच्या सर्वात पवित्र तीर्थांपैकी एक असल्याचे ज्ञात असूनही एका राष्ट्रीय दैनिकाने हा खोडसाळपणा केला. हिंदूंची निंदा करून काहीही होणार नाही, याची खात्री या माध्यम संस्थांसह लोकांनाही माहीत असल्याने ते पुन्हा अशी कृत्य करण्यास धजावतात. फार फार तर ‘एफआयआर’ आणि नंतर जामीन यापलीकडे काहीही कारवाई होणार नाही याची त्यांना जाणीव आहे. हिंदूंची कोणतीही गोष्ट म्हणजे रा. स्व. संघ किंवा भाजपच्या नावाखाली ते संपूर्ण हिंदू धर्माची चेष्टा करू लागले.
 
 
हिंदू हे केवळ राजकीय पक्ष किंवा संस्थेचे प्रतीक नसून त्यांना स्वतःची वेगळी ओळख आहे, याचा प्रत्यय या माध्यम संस्थांना कधी येणार? अनेक माध्यम संस्थांनी फ्रान्समधील ‘शार्ली हेब्दो’वरील जिहादी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पण, जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा आला, तेव्हा त्यांचे दुहेरी चरित्र जगजाहीर झाले. या इंग्रजी दैनिकाने शिवलिंगाऐवजी पैगंबर किंवा कुराणशी जोडून असा खोडसाळपणा केला असता, तर कदाचित सोशल मीडियावर आणि त्यांच्या कार्यालयावरही हल्ले झाले असते. मीम बनवणार्‍यालाही चांगलीच अद्दल घडवली गेली असती. मात्र, हिंदूंच्या बाबतीत असे काहीही घडत नाही, ज्यातून हिंदू समाजाची सहिष्णुता दिसून येते. श्रद्धेला धक्का देणारा मजकूर हिंदूंना नीट समजून त्याचा दिशानिर्देश ओळखता आला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’, धर्मपरिवर्तन आणि इतर अनेक मुद्द्यांवरही हिंदूंची दिशाभूल केली जाते. त्यामुळे वाचाल तर वाचाल हे ध्यानी ठेवून आपण काय वाचलं, तर वाचणार आहोत, हे समजून घेण्याची वेळ आली आहे, हे मात्र नक्की!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@