मुंबई : राज्याच्या कारभाराचे केंद्र असलेले मंत्रालय आणि हा कारभार पाहणारे मंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवार, दि. १७ मे रोजी अचानक बत्तीगुल झाली. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची राज्यभर चर्चा रंगली. यापूर्वीही मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना असाच प्रकार घडला होता. उन्हाळ्यात मुंबईसह राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे वीजपुरवठ्यावर ताण निर्माण होत आहे. मात्र, दोनवेळा बत्तीगुल होण्याच्या घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली असून संबंधित विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.
‘बेस्ट’च्या दक्षिण मुंबईतील ‘नेटवर्क’मधून मंत्रालयापासून अनेक शासकीय कार्यालयांना वीजपुरवठा करण्यात येतो. त्यासोबतच मंत्रालयासमोरील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या बंगल्यातही वीज पुरवण्यात येते. परंतु, दिवसभरात दुसर्यांदा या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाही अचानक बत्तीगुल झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे एका कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु असताना अशीच बत्तीगुल होण्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्तीगुल झाल्याने ‘बेस्ट’ उपक्रमाला याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. कारण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह जितेंद्र आव्हाड, दादा भुसे, नीलम गोर्हे, उदय सामंत आदी नेत्यांची मंत्रालयासमोर शासकीय निवासस्थाने आहेत.
दरम्यान, मंगळवारी सकाळी १० वाजता ‘मरिन ड्राईव्ह रिसिव्हिंग स्टेशन’ला पहिला ‘फॉल्ट’ झाला होता. तो दुरुस्त करण्यात आला. मात्र, त्यानंतर पुन्हा दुसरा ‘फॉल्ट’ सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आला. साधारणपणे दीड तासांत संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यात अंधार पसरला होता. ‘बेस्ट’च्या वीज विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ वीजदुरुस्तीबाबतची कामे हाती घेत ६० ते ७० टक्के वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला असून उर्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, असे स्पष्टीकरण ‘बेस्ट’ प्रशासनाकडून त्यावेळी देण्यात आले होते.