मुंबई: महाराष्ट्रातील सध्याची स्थिती बघता कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता करण्याची अजिबात गरज नाही असे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात भीती पसरवणाऱ्या कुठल्याही वृत्तावर विश्वास ठेवू नका असेही आवाहन त्यांनी केले. साध्य महाराष्ट्रात कुठलेही कोरोना निर्बंध नाहीत. मेळावे, राजकीय सभा, लग्नसराईसारखे कार्यक्रम जोरात सुरु असताना रुग्ण वाढीचा वेग अत्यंत कमी आहे आणि रिकव्हरी ९८ टक्के आहे त्यामुळे महाराष्ट्राला सध्या तरी कुठलाही धोका नाही असे मत टोपे यांनी मांडले.
महाराष्ट्रासह भारत कोरोनाच्या तडाख्यांतून आता कुठे सावरत असताना जगात परत एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीन देशात पुन्हा एकदा टाळेबंदी लावावी लागली आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेने सर्वाधिक नुकसान केले होते पण तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी जाणवली नाही. देशातील १०० कोटींहून जास्त लोकसंख्येचे झालेले लसीकरण, कोरोनाबद्दल झालेली जागरूकता यांमुळे भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव जास्त जाणवणार नाही असे मत आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.