नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाअंतर्गत भारताने स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या इतिहासात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. भारताने मागील आठवड्यात भारतीय नौदलाच्या ‘१५बी डिस्ट्रॉयर’ (विनाशक) ‘सुरत’ आणि ‘१७ए फ्रिगेट’ ‘उदयगिरी’च्या दोन आघाडीच्या युद्धनौका चाचण्यांसाठी समुद्रात उतरविण्यात आल्या आहेत. ’माझगाव डॉक्स लिमिटेड, मुंबई’ येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या नौकांच्या प्रक्षेपण कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या जहाजांच्या निर्मितीमध्ये ७५ टक्के स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे, जे देशाच्या सागरी जहाजांच्या निर्मितीमध्ये ‘आत्मनिर्भरते’चे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
‘डिस्ट्रॉयर’ ‘आयएनएस सुरत’
‘प्रोजेक्ट १५बी’ श्रेणीचे जहाज ‘आयएनएस सुरत’ची निर्मिती भारतीय नौदलाला सागरी शक्ती बनण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हे जहाज भारतीय नौदलाचे पुढील पिढीचे ‘स्टेल्थ गाईडेड मिसाईल’ प्रकारचे ‘डिस्ट्रॉयर’ आहे. या जहाजाची निर्मिती माझगाव डॉक्स लिमिटेड, मुंबईने केली आहे. गुजरात राज्याच्या व्यावसायिक राजधानीच्या नावावरून त्याला ‘सुरत’ हे नाव देण्यात आले आहे. ही युद्धनौका ‘१५बी’ प्रकारातील चौथे जहाज असून हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये हे जहाज अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. ‘प्रोजेक्ट १५बी’अंतर्गत तयार केलेली सर्व जहाजे ‘ब्राह्मोस’ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून हवेत मारा करणार्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये स्वदेशी ‘टॉर्पेडो ट्यूब लाँचर’, स्वदेशी पाणबुडीविरोधी ‘रॉकेट लाँचर’ आणि ७६ मिमी ‘सुपर रॅपिड गन माऊंट’ यांसारख्या अनेक स्वदेशी शस्त्रे आहेत.
युद्धनौका ‘उदयगिरी’
आंध्र प्रदेशातील पर्वतराजीच्या नावावरून ‘उदयगिरी’ हे ‘प्रोजेक्ट १७ए फ्रिगेट्स’चे तिसरे जहाज आहे. या प्रकल्पातील सहा स्वदेशी युद्धनौकांना ‘निलगिरी’, ‘हिमगिरी’, ‘तारागिरी’, ‘उदयगिरी’, ‘दुनागिरी’ आणि ‘विंध्यगिरी’ अशी नावे देण्यात आली आहेत. ही नावे १९७२ ते २०१३ या काळात भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या जुन्या वर्गांच्या जहाजांच्या नावावरून देण्यात आली आहेत. या प्रकल्पाची पहिली दोन जहाजे ‘निलगिरी’ २०१९ मध्ये आणि ‘हिमगिरी’ २०२० मध्ये लाँच करण्यात आली.
‘प्रोजेक्ट १७ए’ अंतर्गत माझगाव येथे चार आणि ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अॅण्ड इंजिनिअर्स’ (जीआरएसई) येथे तीन अशा एकूण सात जहाजांचे बांधकाम सुरू आहे. प्रत्येक जहाज १४९ मीटर लांब असून त्याची क्षमता सुमारे ६,६७० टन आणि त्यांचा वेग २८ नॉट्स आहे. ‘प्रोजेक्ट १७ए’ अंतर्गत ‘जीआरएसई’ला १९,२९४ कोटी रुपयांचे तीन ‘स्टेल्थ फ्रिगेट्स’ बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पातील पहिली युद्धनौका २०२३, तर दुसरी आणि तिसरी युद्धनौका अनुक्रमे २०२४ आणि २०२५ मध्ये उपलब्ध होणार आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’
‘१५ बी’ आणि ‘पी १७ ए’ ही दोन्ही जहाजे नौदल डिझाईन संचालनालयातच रेखांकित करण्यात आली होती. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणास यामुळे मोठी चालना मिळाली आहे. ‘शिपयार्ड’मधील बांधकामादरम्यान ७५ टक्के उपकरणे आणि यंत्रणांची खरेदी भारतीय उद्योगांकडून करण्यात आली आहे. त्यामध्ये देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे, एकात्मिक उत्पादन, ‘मेगाब्लॉक आऊटसोर्सिंग’, प्रकल्प डेटा व्यवस्थापन इत्यादीसारख्या नवीन संकल्पना आणि तंत्रज्ञान वापरले जात आहेत. या सर्वांचा प्रथमच स्वदेशी युद्धनौका डिझाईन आणि बांधकामात अवलंब केला जात आहे.