भाजपने ईशान्य भारतातील भ्रष्टाचाराची संस्कृती संपवली

अमित शाह यांचे अरुणाचल प्रदेशातील कार्यक्रमात प्रतिपादन काँग्रेसच्या भ्रष्टाचारी संस्कृतीचाही घेतला रोखठोक समाचार

    23-May-2022
Total Views |

amit shaha
 
 
 
 
 
 
नामसाई : “ईशान्येच्या राज्यांतील भ्रष्टाचाराची संस्कृती भाजपने संपुष्टात आणली आहे. येथे विकासकामांसाठी दिल्या जाणार्‍या निधीचा लाभ शेवटच्या व्यक्तीला मिळत आहे, जिथे यापूर्वी काँग्रेसच्या काळात ही रक्कम मध्यस्थांच्या घशात जायची,” असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेश येथे आयोजित एका कार्यक्रमात रविवारी बोलताना केला.
 
 
 
“काँग्रेसची सत्ता असताना मागील ५० वर्षांच्या काळात या क्षेत्राकडे केवळ दुर्लक्ष करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर येथील विकास आता वेगाने होत आहे,” असे यावेळी अमित शाह यांनी सांगितले.
ते म्हणाले की, “काँग्रेसच्या काळात एका मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन होत असे, दुसरा मुख्यमंत्री त्या प्रकल्पाची घोषणा करत असे, तर तिसरा मुख्यमंत्री कदाचित त्याचे उद्घाटन करत असे. पण, आता भाजपच्या राज्यात सर्व विकासप्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडूनच केले जाते.”
 
 
 
नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करणार्‍या काँग्रेसवरही शाह यांनी टीका करीत, “देशातील सर्वांत जुना पक्ष येथील विकास बघू शकत नसल्याने त्यांनी डोळे बंद करून घेतले आहेत,” असा टोला काँग्रेसला लगावला.
तसेच “राहुल गांधींनी इटालियन चश्मा फेकून भारतीय चश्मा घालावा व डोळे उघडून पाहावे, असे केल्यास नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्रात केलेला विकास ते पाहू शकतील,” असे म्हणत, “५० वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसला ईशान्य भारताचा विकास घडवण्यात अपयश आले आहे,” अशी सणसणीत टीकाही शाह यांनी यावेळी केली.
 
 
 
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ते बोलताना म्हणाले की, “काँग्रेसची सत्ता असताना या क्षेत्रासाठी येणारा विकासनिधी मध्यस्थांच्या हातात जायचा. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआकडे सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराची संस्कृती संपुष्टात आली आणि प्रत्येक पैशाचा पारदर्शकपणे वापर केला जात आहे. दिला जाणारा विकासनिधी शेवटच्या घटकापर्यंत मिळावा, हे पंतप्रधान सुनिश्चित करतात,” असे शाह यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी अरुणाचल प्रदेशच्या आर्थिक प्रगतीचे दाखले देताना शाह म्हणाले की, “आधी अरुणाचल प्रदेशचा अर्थसंकल्प हा फक्त १२ हजार, ५०० कोटी रुपयांचा होता. पण, येथील युवा मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अरुणाचलचा अर्थसंकल्प हा दुपटीने वाढून २६ हजार कोटींवर पोहोचला आहे. एवढेच नाही, तर अरुणाचल प्रदेशचा ‘जीडीपी’ दहा हजार कोटी इतका होता.
 
 
 
पण, या राज्याच्या ‘जीडीपी’ला तिपटीने वाढवून तो ३० हजार कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पेमा खांडू यांच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेशने साध्य केले आहे.” ईशान्येतील सीमावादाविषयी बोलताना शाह म्हणाले की, “ कधीपर्यंत देशातील एक राज्य दुसर्‍या राज्याशी असेच भांडत राहणार? आसाम आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्यकेडील राज्यांमध्ये बरीच वर्षे सीमावाद प्रलंबित होता. परंतु, या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याने हा विवाद सोडवला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” अरुणाचल प्रदेशची ‘कनेक्टिव्हिटी’ आणि विकासाविषयी बोलताना शाह म्हणाले की, “अरुणाचल प्रदेशमधील परशुराम कुंडापर्यंत रेल्वे पोहोचेल,तो दिवस आता दूर नाही. देशभरातील भाविक लवकरच परशुराम कुंडापर्यंत रेल्वेने येऊ शकतील. तसेच अरुणाचल प्रदेशलालवकरच त्यांच्या राजधानीत प्रशस्त विमानतळही उभे राहणार आहे,” असे ते म्हणाले.