ठाणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यातील कापुरबावडी उड्डाणपुलावरील विद्युत पोल उखडून पुलाखालील रस्त्यावर अधांतरी लटकल्याने धोका निर्माण झाला होता. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेने पुलाखालील रस्ता काही काळ बंद ठेवावा लागला. अखेर, ठाणे पोलीस, ठाणे मनपा विद्युत विभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचार्यांनी हा क्षतीग्रस्त विद्युत पोल हटवला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
ठाण्यातील कापुरबावडी उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून पुलावरील ‘स्ट्रीट लाईट’ पोल उखडला गेला. उखडलेला विद्युत पोल थेट पुलाखालील कापुरबावडी नाका रस्त्यावर अधांतरी लटकत्या अवस्थेत असल्याने येथील वाहतूक खोळंबली. वाहतूक पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, घटनास्थळी आलेल्या वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठा. म. पा. विद्युत विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान आदींनी सदरचा स्ट्रीट लाईट पोल काढला. त्यानंतर सर्व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.