दाऊदशी संबंधित मलिकांबरोबर कामासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

    22-May-2022
Total Views |

DF
 
 
 
 
 
 
मुंबई : “दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अत्यावश्यक ‘इम्पिरिकल डेटा’साठी कुठलीही धडपड केली नाही. पण, त्याचवेळी तुरुंगात रवानगी केलेले आणि ‘डी गँग’शी संबंध असलेले नवाब मलिक मंत्रिमंडळात राहावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारची धडपड सुरू आहे,” असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाण साधला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
 
 
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नवाब मलिक यांचे ‘डी गँग’शी संबंध असून ही अतिशय गंभीर बाब आहे, पण दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने ‘इम्पिरिकल डेटा’ आणि ओबीसी आरक्षणासाठी कुठलीही धडपड केली नाही. त्याचवेळी तुरुंगात असलेले आणि ‘डी गँग’शी संबंध असलेले नवाब मलिक मंत्रिमंडळात राहावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारची धडपड सुरू आहे. यापेक्षा अर्धी धडपड जरी ओबीसी आरक्षणाचा ‘इम्पिरिकल डेटा’ गोळा करण्यासाठी केली असती, तर ओबीसी आरक्षण गेले नसते. जो मंत्री दाऊदशी संबंधित आहे, अशा मंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांना काम करायचे आहे,” असे म्हणत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
 
 
 
पुढे ते म्हणाले की, “राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यावरून नेहमीच सासू-सुनेचे भांडण सुरू आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तसाच आहे. ‘इम्पिरिकल डेटा’वरूनही केंद्र राज्यावर आरोप करत आहे आणि राज्य केंद्रावर मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नाही.”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, “भारतात पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्षे जे लांगूलचालनाचे धोरण भारतात सुरू होते. त्यामुळे दुफळी निर्माण झाली. आता ती दुफळी दूर करून आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहेत, ही भावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या प्रकारे मोदी देशाला नेतृत्व देत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींकडे लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे विरोधकांची मळमळ बाहेर येत आहे,” असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
 
 
 
नवाब मलिक यांचे ‘डी गँग’शी संबंध होते; न्यायालयाने नोंदविले प्राथमिक निरीक्षण
 
महविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांचे ‘डी गँग’शी संबंध होते. मंत्री नवाब मलिक यांनी हसिना पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या आणि ‘मनी लॉण्ड्रिंग’ केले, असे प्राथमिक निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. रोकडे यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचे दाऊदच्या गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. हसिना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत नवाब मलिक यांच्या बैठका झाल्या असल्याचा ठपका ’ईडी’ने नवाब मलिक यांच्यावर ठेवला आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात ‘मनी लॉण्ड्रिंग’चे पुरावे आढळले, असेही ’ईडी’चे म्हणणे आहे. मलिकांचा दाऊदच्या लोकांशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. ‘मलिक हे हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते’ असा आरोप करण्यात आले आहेत. मलिकांचा मुलगा फराज आणि इतर दोघांनी पारकरच्या सहयोगीशी भेट घेतली. या गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.