नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील आंतरराज्य सीमावाद पुढील वर्षापर्यंत संपुष्टात येईल. ईशान्य भारत हिंसामुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षात या भागातील ९ हजार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी केले. अरुणाचल प्रदेशातील रामकृष्ण मिशनच्या सुवर्ण महोत्सवी समारंभामध्ये ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, बोडोलँडचा प्रश्न सुटला आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील ६० टक्के सीमाप्रश्नही सोडवण्यात आला आहे. प्रदेशात शांतता आणि विकास प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्य सरकार आंतरराज्यीय सीमा विवादाच्या सौहार्दपूर्ण आणि कायमस्वरूपी तोडग्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. ईशान्येतील तरुण आता बंदुका आणि पेट्रोल बॉम्ब बाळगत नाहीत. त्यांच्याकडे आता लॅपटॉप आहेत आणि स्टार्टअप सुरू आहेत. केंद्र सरकारने या क्षेत्रासाठी आखलेला विकासाचा हा मार्ग आहे. आसाममधील बोडोलँड प्रदेशातील बंडखोरी बोडो शांतता कराराद्वारे सोडवली गेली आहे, असेही शाह यांनी यावेळी नमूद केले.