सांस्कृतिक राष्ट्रवाद टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य : डॉ. शांतीश्री पंडीत

    21-May-2022
Total Views |

१


(जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडीत यांचा डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी (डावीकडून) एकता मासिक फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे, नामवंत विधिज्ञ व शिक्षण प्रसारक मंडळी, पुणेचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, एकताचे संपादक मनोहर कुलकर्णी.)



पुणे : सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आपल्या भारताचा मूळ पाया आहे आणि या आधुनिक काळात तो टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांनी केले. नवी पेठच्या पत्रकार भवनात आयोजित सन्मान सोहोळ्यात त्या बोलत होत्या.


"आपल्या भारतीय विचारधारेमध्ये स्त्रीवाद आहे. पुराणकाळातील द्रौपदी, सीता हे याचे उत्तम उदाहरण आहेत. आपला धर्म ही लोकशाहीच आहे. भारत एक सांस्कृतिक राज्य आहे. ते आता औद्यौगिक क्रांतीमध्येही सामील झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि नागरी राष्ट्रवाद यामध्ये भरपूर विचार आणि वाद सुरू आहेत," असे त्यांनी सांगितले.

"भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपण सांस्कृतिक राष्ट्रवाद कसा करणार हे अभ्यासले पाहिजे. विविध प्रांतातून आलेल्या स्वातंत्र्य सेनानींविषयी अभ्यास न करताच आपण त्यांच्यावर टीका करतो हे मोठे दुर्दैव आहे. भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास केला जात नाही." असे त्या पुढे म्हणाल्या.

केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्कार त्यांचा हा जाहीर सत्कार करण्यात आला. 'आपण आज एकभाषिक झालो आहोत,बहुभाषिक होणे आम्हाला अत्यंत गरजेचे आहे', असे सांगून त्यांनी आज ज्यांना इंग्रजी येथे त्यांना संस्कृत येत नाही आणि संस्कृत येते त्यांना इंग्रजी येत नाही अशी अवस्था झाल्याचे सांगितले.


'माझी ज्या विद्यापीठात नेमणूक झाली तेथे एक विचारधारा रुजलेली आहे, ती आधी नष्ट करावी लागेल, या विद्यापीठाने एकाच परिवाराचा इतिहास तयार केल्याचे सांगताना डॉ. पंडित यांनी लोकमान्य टिळक, गोखले,सावरकर यांच्या सारख्या महापुरुषांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली. आपल्याला याबाबत कार्य करावे लागेल' असेही त्या म्हणाल्या.

माझी मातृभाषा मराठी नाही, तेलगू आहे, मात्र पुणे विद्यापीठात मी मराठी शिकल्याचे त्यांनी सांगितले. ज्या विद्यापीठात आपण आता कुलगुरू म्हणून कार्य करणार आहोत तेथील शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारणार असल्याचे सांगून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय हे भारतातील हे पहिल्या क्रमांकाचे विश्वविद्यालय आहे. भारतातील विविधता या विद्यापीठात दिसून येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाला पहिल्या १०० क्रमांकात स्थान आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.


एक पुणेकर म्हणून एवढ्या मोठ्या पदावर जात असल्याचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. जेएनयू विद्यापीठात नव्या शिक्षण धोरणानुसार कार्य करण्याचा आपला प्रयत्न राहील हे देखील त्यांनी स्पष्ट केले. या विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले तीन केंद्रीय मंत्री आज देशसेवेत असल्याचे त्या म्हणाल्या. सरिता माळी या मुंबईतील फुल विक्री करणाऱ्या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास देखील त्यांनी सांगितला.



भाषांचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी - डॉ. ज्ञानेश्वर मुळे

आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल काळात भाषा लोप पावत असून भाषांचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे मत आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. आपल्या अनुभव समृध्द आणि अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी भारतातील भाषा आणि विविधतेतून एकता दर्शविणारया भारतीय संस्कृतीचे महत्व अधोरेखित केले. जगातील ५० टक्के भाषा या आपल्या भारतीय खंडात असल्याचे सांगून भारताची बहुभाषिक विविधता आज जगात भारताचा गौरव करण्यास पुरेशी आहे असे ते म्हणाले.

सुदैवाने आज ज्यांचा सन्मान झाला त्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. पंडित या बहुभाषिक आहेत आणि आपल्या सामूहिक विद्वातेतून त्या ही जबाबदारी पार पाडतील असेही डॉ. मुळे म्हणाले. नव्या शिक्षण धोरणाचा उल्लेख करून त्यांनी यामुळे भारत जगात विश्वगुरू बनू शकेल असा विश्वास व्यक्त केला. देशात प्रवासी विद्यापीठ असावं असेही ते म्हणाले. शिक्षणात नवे प्रयोग सांस्कृतिक सत्ता निर्माण होतानाच 'एको दं बहु च्या' नुसार कार्य असायला हवे, डॉ. पंडित यांच्यावर ती जवाबदारी आहे ती त्या पार पाडतील यात शंका नाही असेही ते म्हणाले.


तंत्रज्ञान हे मानवता केंद्रित असले पाहिजे हा विचार भारत जगाला देऊ शकतो. कारण तंत्रज्ञानाचा अनियंत्रित विकास हा जगाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. हा विकास नैसर्गिक संसाधनांच्या विनाशावर आधारलेला आहे. हा विकास माणसांच्या, पृथ्वीच्या भविष्याशी संबंधित आहे, असे ते आपल्या भाषणात म्हणाले. आत्मनिर्भर भारत आणि विश्व गुरू व्हायचे असेल आपले सुरक्षा विषयक धोरण तसेच विदेश धोरण हे स्पष्ट असेल पाहिजे. सुरक्षा परिषदेत भारत सदस्य होणे त्यासाठी आवश्यक आहे असेही डॉ. मुळे यांनी स्पष्ट केले. 'We are one' हे आम्हाला जगाला दाखवून द्यावे लागेल असे ते म्हणाले.

डॉ. पंडित यांच्या विषयी बोलताना डॉ. मुळे यांनी त्यांची विद्वत्ता आणि अनुभव हा पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरेल असे सांगून त्यांनी आपल्या नव्या प्रवासात देश घडवण्याचे स्वप्न तरुणांना द्यावं आणि निसर्गाच् नुकसान न होऊ देता तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञांनदानात करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. विश्वगुरू ची जबाबदारी एकट्या पंतप्रधानांची नाही तर शिक्षण क्षेत्रातील सर्वांना ती पार पाडावी लागणार आहे, त्या साठी नवे शिक्षण धोरण हा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. आताच्या शिक्षणातील अधोगतिवर बोलताना त्यांनी आपल्या देशातील एक लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात आणि त्यावर आपण ५० हजार डॉलर खर्च करतो असे सांगितले हे चित्र बदलले पाहिजे असे ते म्हणाले. तत्पूर्वी 'एकता'च्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन नामवंत विधिज्ञ व शिक्षण प्रसारक मंडळ पुणेचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन यांच्या हस्ते करण्यात आले .


यावेळी बोलताना,अ‍ॅड. एस. के.जैन म्हणाले की, तत्त्वाशी तडजोड न करताही तुम्ही मोठे होऊ शकता याचे डॉ. शांतीश्री पंडीत या उत्तम उदाहरण आहेत. कुटुंब, गाव, शहर, राष्ट्र याचा विचार करणारे शिक्षण पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. या साठी उत्तम साहित्यकृती निर्माण झाल्या पाहिजेत. पत्रकारितेचा उपयोग समाजनिर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. चांगले साहित्य वाचले तर विचार चांगले होतात, योग्य मार्गदर्शन करतात. एकता हे मासिक समाजात, राष्ट्रात एकता घडवेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. पुण्यातील 'एकता' मासिकाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदाचे वर्ष हे एकता मासिकाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.

यावेळी व्यासपीठावर डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. शांतीश्री पंडित, ॲड. एस. के. जैन, एकता मासिक फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे, एकताचे संपादक मनोहर कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल दामले व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अमोल दामले यांनी केले. डॉ. मुळे आणि डॉ. पंडित यांचा परिचय निमेष वहाळकर यांनी करून दिला, सूत्रसंचालन रुपाली भुसारी यांनी केले तर आभार मनोहर कुलकर्णी यांनी मानले. माधवी पोतदार यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.


'शांती' आणि 'पंडित'

आजच्या या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी शब्द सौंदर्य आपल्या वाणीतून अधिकच खुलविले. दोन्ही वक्ते भाषेवर प्रभुत्व असणारे डॉ. शांतीश्री पंडित या बहुभाषिक व्यक्तिमत्वाच्या धनी. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी हाच धागा पकडून भाषा ही आम्हा भारतीयांची खरी विरासत असल्याचे सांगितले. जशी आपण आपल्याकडे जेवढी केवढी असेल त्या संपत्तीची काळजी घेतो तशी भाषेची देखील घ्यायला हवी असे ते म्हणाले. आपल्या नावातच ' शांती ' आहे आणि आपण ' पंडित ' आहात त्यामुळे हे इंद्रधनुष्य आपण सहज पेलाल अशी आपणास शुभेच्छा देतो असे डॉ. मुळे यावेळी बोलताना म्हणाले.
बहुभाषिक व्यक्तिमत्व
डॉ. शंतिश्री पंडित. या सर्वार्थाने बहुभाषिक. त्यांचे आई - वडील आंध्र प्रदेशातील.त्या स्वतः तामिळनाडूतील.त्यांचे पती आणि मुलगी महाराष्ट्रातील. त्यामुळे त्यांच्या घरातूनच या त्या त्या प्रांतातील भाषा सोबत होत्या.