ठाणे : ठाणे जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून मार्च २०२२ अखेर ठाणे जिल्ह्यात एकूण २२५ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ८४ रुग्ण हे ठाणे पालिकेच्या हद्दीत तर ४३ रुग्ण भाईंदर पालिका परिसरात आढळून आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षणात भिवंडी तालुक्यातील सहा ते सात वयोगटातील सर्वाधिक २३ बालकांना हत्तीरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्याने आरोग्य विभागासमोर हत्तीरोगावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकलेआहे.
हत्तीरोग हा वेदनादायी आजार आहे. या आजाराचे जगाच्या तुलनेत सुमारे ४० टक्के रुग्ण भारतात आढळले आहेत.तर देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. या रोगामुळे अपंगत्व येते. तेव्हा, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता देशभर 'ट्रिपल ड्रग थेरपी' वापरण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरु असून तांत्रिक सल्लागार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर हा प्रस्ताव अंमलात येऊ शकणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्रासह देशातली पाच जिल्ह्यांमध्ये ही थेरपी पहिल्या टप्प्यात अंमलात येणार असल्याचे सांगण्यात येते.डासांमुळे होणाऱ्या हत्तीरोगाचे प्रमाण ठाण्यात वाढत असल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने यंत्रणा कार्यन्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.सध्या 'डायथेलकार्बामॅझिन' (डीईसी) आणि 'अल्बेन्डाझोल' (आयडीए) या प्रकारची दोन औषधे दिली जात आहेत. यात तिसऱ्या औषधाचा समावेश करून त्याद्वारे हत्तीरोग नियंत्रित होत असल्याचे वैद्यकिय तज्ञांचे मत आहे. हत्तीरोगाबाबत समाजासह नागरिकांमध्ये अज्ञान आहे. ही धोक्याची घंटा असून नागरिकांवर उपचार करण्यामध्ये हे मोठे आव्हान आहे.