नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना दोषी ठरवले आहे. चौटाला यांच्या शिक्षेवर न्यायालयात २६ मे रोजी युक्तिवाद होणार आहे.
यापूर्वी १९ मे रोजी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात, सीबीआयने २६ मार्च २०१० रोजी चौटाला यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यांना १९९३ ते २००६ या कालावधीत त्यांच्या वैध उत्पन्नाच्या तुलनेत ६.०९ कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
सक्तवसुली संचालनालयाने २०१९ मध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची ३ कोटी ६८ लाखांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये ओम प्रकाश चौटाला यांच्या मालकीची सदनिका, भूखंड आणि जमीन यांचा समावेश होता. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरसा येथे आहेत. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली होती.