प्रमोद सावंतांनी शब्द पाळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2022   
Total Views |
 
 
 
 
sawant
 
 
 
 
 
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरून देशातील राजकीय आणि धार्मिक वातावरण ढवळून निघत असताना आता अन्य राज्यांमध्येही मंदिरांचा घोटला गेलेला गळा मुक्त करण्यासाठी हिंदू समाज जागा झाला आहे. हिंदू देवदेवतांना आणि धर्माला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी देशभरात ठिकठिकाणाहून बुलंद होणारे आवाज आश्वासक चित्र निर्माण करत आहे.
 
 
 
 उत्तर प्रदेशात मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्याबरोबरच अनुदानाचे लाडही बंद करण्यात आले. त्यातच लखनौचे नामकरण लक्ष्मणपुरी करण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवेकरांना दिलेला शब्द मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच पूर्ण केला असून, त्यादिशेने पावले टाकण्यास सुरुवातही केली आहे. गोवा सरकारने सनातन संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मंदिरांच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने पोर्तुगीजांच्या काळात नष्ट झालेली हिंदू मंदिरे आणि वारसा स्थळांच्या जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणीसाठी २० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली आहे. राज्य सरकारने केलेली ही अशा प्रकारची पहिलीच तरतूद आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान, दक्षिण गोव्यातील मंगेशी मंदिराच्या प्रांगणात राज्य सरकारच्या एका कार्यक्रमात त्यांनी सूचक वक्तव्य केले होते. पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करत हिंदू संस्कृती आणि मंदिर संस्कृती जपण्याची गरज असल्याचे ते म्हणाले होते.
 
 
 
 
त्याचप्रमाणे, एका कार्यक्रमात त्यांनी, पोर्तुगीजांनी त्यांच्या राजवटीत नष्ट केलेली सर्व मंदिरे वारणा येथील महालसा नारायणी मंदिराप्रमाणे पुनर्संचयित करण्याची गरज असून, गोवामुक्तीच्या ६० व्या वर्षाच्या निमित्ताने ही प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, असेही म्हटले होते. दरम्यान, पोर्तुगीजांनी १५६० पासून गोव्यातील हिंदू देव-देवतांची मंदिरे पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली.
 
 
 
 
प्रार्थनास्थळे हिंदूंच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. मात्र, गोव्यातील अनेक मंदिरे एकतर जीर्ण झाली आहे किंवा दुर्लक्षित. त्यामुळे प्रमोद सावंत यांनी गोव्यात हिंदू मंदिरांचे पुनरूज्जीवन करण्याची हाती घेतलेली मोहीम नक्कीच प्रशंसनीय आहे.
 
 
 
 
‘परिवर्तनवादी ड्राम्या’ला दणका 
 
 
 
 
दिल्ली, पंजाबनंतर आता आम आदमी पार्टीने गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 182 मतदारसंघांतील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘आप’ने नुकतीच परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. दि.१५ मे रोजी गोपाल इटालिया यांनी सोमनाथ मंदिरापासून तर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेले इसुदान गढवी यांनी द्वारका येथून परिवर्तन यात्रा काढली. यासोबतच राज्यातील विविध सहा ठिकाणी यात्रेला सुरुवात करण्यात आली. मात्र, गुजरातवासीयांनी या ‘परिवर्तनवादी ड्राम्या’कडे साफ दुर्लक्ष केले आहे. या परिवर्तन रॅलीमध्ये ना रोड शोला प्रतिसाद मिळाला ना सभेला. खरेतर ‘आप’ला रॅलीला प्रतिसाद मिळणार नाही, याची आधीच कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी पंजाबमधून मोठ्या संख्येने वाहने आणि लोकांना बोलवले. मात्र, एवढे करूनही रॅलीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
 
 
 
 
यापूर्वीही भगवंत मान गुजरातमध्ये पक्षकार्यक्रमासाठी विमानाने आले खरे, पण तेही पंजाब सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारुन. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीकाही झाली, पण उपयोग शून्यच! कालच्या रॅलीत तर माजी पत्रकार आणि ‘आप’चे नेते तथा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार इसुदान गढवी तर रॅलीत हात दाखवून थकले. मात्र, गर्दी काही जमली नाही. विशेष म्हणजे, त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्थाही पंजाबमधून करण्यात आली होती. मोफत वाटपवादी पक्षाने पंजाबमध्ये फुकटाच्या घोषणांचा वर्षाव करून सत्ता मिळवली खरी. मात्र, आता पंजाबमध्येही सगळं काही सकुशल मंगल सुरू आहे, असे चित्र नाही. पंजाबमध्ये शेतकर्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. यांसह पंजाबच्या विविध शेतकरी संघटनांनी चंदीगड-मोहाली सीमेवर तळ ठोकला आहे.
 
 
 
 
गहू आणि भात पेरणीवर बोनस द्यावा, यांसह मका आणि हरभर्‍यासह २३ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (चडझ) ची हमी, अखंड वीजपुरवठा आणि गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवणे या मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आता ‘आप’चे उत्तरखंडातील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेले सेवानिवृत्त कर्नल अजय कोठियाल यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे घरचे तंटे निस्तरायचे सोडून ‘आप’ला गुजरात बिघडवण्याचे वेध लागले आहेत, जे येत्या काळात यशस्वी होतील, अशी शक्यता दूरदूरपर्यंत तरी दिसत नाही.  
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@