चेन्नई : तामिळनाडूतल्या श्री वरदराज पेरुमल मंदिरात काही दिवसांपासून वडगलाई आणि थेंगलाई या दोन पंथीयांमध्ये पूजा करण्याच्या अधिकारवरून वाद सुरू होते. यावर गुरुवार, दि. १९ मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाकडून हिंदू धर्मातला महत्वाचा मुद्दा अधोरेखित करत मोठा निर्णय देण्यात आला. "सहिष्णुता ही हिंदू धर्माची ओळख आहे. त्यामुळे अशा क्षुल्लक गोष्टींवरून भांडण्याऐवजी देवाची पूजा करण्याचा अधिकार दोन्ही पक्षांना दिला पाहिजे.", असे म्हणत न्यायमूर्ती एसएम सुब्रमण्यम यांनी दोन्ही पक्षाच्या बाजूने निकाल दिल्याचे दिसून आले. तसेच मंदिरात कोणालाही पूजा करण्यापासून अडवता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मंदिराच्या विश्वस्तांनी बजावलेल्या नोटीसमुळे वाद
श्री वरदराज पेरुमल मंदिराच्या कार्यकारी विश्वस्तांनी वडगलाई पंथीयांना मंदिरात नामजप करण्यापासून रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. त्यामुळे विश्वस्तांनी पाठवलेल्या नोटीसमुळेच पुढे संपूर्ण वादाला तोंड फुटल्याचे सांगितले जात आहे.
न्यायालयाकडून नियम लागू
न्यायालयाने आपला निकाल देताना कोणत्याही पंथाच्या श्रद्धेला धक्का लागणार नाही याची काळजी घेत काही नियम लागू केले आहेत. 'थेंगलाई पंथाला सर्वप्रथम त्यांचा पाठ वाचण्याची परवनगी मिळेल, त्यानंतर वडगलाई पंथाला त्यांचा पाठ वाचण्याची परवनगी मिळेल. तसेच दोन्ही पक्षांना त्यांचा पाठ वाचण्यासाठी १० ते १२ मिनिटांचा अवधी असेल.', असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.