नवी दिल्ली(प्रतिनिधी): जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी राहुल भट या काश्मिरी हिंदूची हत्या केली होती. आता राहुल भट्ट यांच्या पत्नी मीनाक्षी रैना यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यांना सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, नोवााबाद, जम्मू येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
यासोबतच सरकारने बुधवारी दि १८ रोजी राहुल भट यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यापूर्वी ही मदत जाहीर करताना नायब राज्यपालांनी राहुल भट यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार असल्याचे सांगितले होते. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार आणि जम्मू पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी बुधवारी राहुल भटच्या कुटुंबाची भेट घेतली. तेथे त्यांनी मृत राहुल भटच्या वडिलांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. राहुल भट यांची पत्नी मीनाक्षी यांनाही नियुक्तीपत्र मिळाले आहे. त्यांची नियुक्ती रु. (१४,००० - ४७,१००) वेतनश्रेणीवर करण्यात आली आहे. राहुल भट हे तहसीलदार कार्यालयात लिपिक होते. विस्थापितांसाठी विशेष पॅकेज अंतर्गत त्यांना नोकरी मिळाली. त्यांच्या हत्येनंतर काश्मीर आणि देशभरात निदर्शने सुरू आहेत. अनंतनाग जिल्ह्यात 'थाली बजाओ' नावाने निदर्शने करण्यात आली. हुमामा चौकात रास्ता रोको करण्यात आला. राहुल भट यांच्या भावाने सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.