...अन्यथा भाजपचे ५ हजार कार्यकर्ते ‘वर्षा’ बंगल्यात घुसतील!

आ. आशिष शेलारांचा सरकारला इशारा

    19-May-2022
Total Views |

ashish shelar
मुंबई : “ ‘बीडीडी’ चाळीतील पोलिसांना ५० लाख रुपयांत घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा पाच हजार भाजप कार्यकर्त्यांना घेऊन भाजप ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घुसल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराच भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. दादर-नायगाव येथे भाजप आयोजित ‘पोलखोल’ सभेत ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास आ. कालिदास कोळंबकर, आ. प्रसाद लाड, भाजप जिल्हाप्रमुख राजेश शिरवाडकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दादर आणि नायगाव परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते.
 
 
 
यावेळी मुंबई महापालिकेच्या कारभाराची ‘पोलखोल’ करताना आ. आशिष शेलार म्हणाले की, “ही ‘पोलखोल’ कशासाठी? ही मुंबई पालिका निवडणुकांची प्रचारसभा नाही. या सभा कोणालातरी अपमानित करा, विरोधात बोला यासाठी केलेल्या नाहीत. या सभा एकाच गोष्टीसाठी आहेत, जे २५ वर्षे सत्ताधारी आहेत, त्यांना आमचा एकच प्रश्न आहे की, एका-एका रुपयाचा हिशोब द्या. मराठी माणसाची ही संस्कृती आहे की, आम्ही हिशोबात चोख आहोत. या सत्ताधारी कारभार्‍यांनी हिशोबात चोख राहावे, हीच आमची मागणी आहे. जर तुम्ही कोणाकडे हिशोब मागितला आणि त्याने हिशोब देण्याऐवजी शिवीगाळ केली, तर समजून जा की, त्याच्याकडे हिशोब नाही. जे तुम्ही बोललात, त्याचाच हिशोब हवा आहे. पाच वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारात तेव्हाचे पक्षप्रमुख आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना आश्वासन दिले होते, “तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला २४ तास पाणी देईन. तुम्हाला २४ तास पाणी मिळते का? १५ तास मिळते का? दहा तास मिळते का,” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थितांना केला.
 
 
 
तसेच ‘बीडीडी’ चाळीतील पोलिसांच्या घरांबाबत ते म्हणाले की, “दोन सरकारांमध्ये फरक किती आहे बघा. देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला आणि ‘बीडीडी’ चाळीतील रहिवासी पोलिसांना मोफत घरे देण्याचे ठरलेही. हे सरकार आले आणि आता मात्र उद्धव ठाकरे म्हणाले, मोफत कशाला? आता पोलिसांना हेच घर ५० लाखांत देऊ. ५० लाख सहज कमवता येतात का? दोन दिवसांत ५० लाख कमवायला इथे काय यशवंत जाधव आहेत का? शिवसेनेला राग आला तरी आम्ही प्रश्न विचारणार आहोत. ‘बीडीडी’ चाळीतील पोलिसांच्या घरावर ५० लाखांचा वरवंटा फिरवतात. पण आज मी या सरकारला इशारा देतो, जर ‘बीडीडी’तील कुठल्याही पोलिसांच्या घरासाठी ५० लाख रुपये जर उद्धव ठाकरे सरकारने घेतले, तर त्याच्याविरोधात पाच हजार भाजपचे कार्यकर्ते ‘वर्षा’ बंगल्यावर घुसल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला.
 
 
 
यावेळी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनीही ‘बीडीडी’ चाळीतील पोलिसांच्या घरांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, “पोलिसांसाठीची घरे आणि ‘बीडीडी’ चाळीचा विकास यात फरक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे आणि तीही मोफत मिळाली पाहिजे, ही आमची मागणी मान्य केली. मोफत घरे देण्याची घोषणाही केली. आजच मी ऐकले की, आत्ताच सरकार ५०० कार्पेटसाठी ५० लाख रुपये मागत आहेत. हे काय सुरू आहे तेच समजत नाही. तुम्ही पोलीस बांधवांना साधे मोफत घर देऊ शकत नाहीत. हे सरकार खूप दिवस चालेल, असे दिसत नाही. उद्या फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील आणि तेच तुम्हाला तुमच्या हक्काचे घर देतील, अशी अपेक्षा आहे,” असेही कोळंबकर म्हणाले.
 
 
 
भाजप दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर म्हणाले की, “गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुंबईकरांच्या विकासाचे स्वप्न बाजूला सारून केवळ भ्रष्टाचाराचे काम केलेल्या सत्ताधारी पक्षाची पोलखोल करणारी ही सभा आहे. या सत्ताधारी पक्षाच्या पोलखोलमुळे सर्वसामान्य मुंबईकर नागरिक थक्क झालेले आहे. येणार्‍या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर मुंबईकर कोणाला भरभरून आशीर्वाद देणार आहे तर सेवा करणार्‍या, लोकांच्या अडीअडचणीला धावून आलेल्या भारतीय जनता पक्षाला आपले अमुल्य मत देतील. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बनणार आहे.”
 
 
 
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, “मी सांगतो भ्रष्टाचार कुठे कुठे झाला आहे. गटार, मीटर आणि वॉटरमध्ये भ्रष्टाचार केला. मागच्या २५ वर्षांचे नालेसफाईचे बजेट काढले तर प्रत्येक वर्षाला ५० कोटी रुपये नालेसफाईला, पंचवीस वर्षाचे तुम्ही बजेट काढले तर आत्तापर्यंत बाराशे ते तेराशे कोटी रुपये नालेसफाईमध्ये दिले. मला सांगा एवढ्यात नवीन नद्या निर्माण झाल्या असत्या पण पैसे गेले कुठे? गेले ते गेले. पण ज्याठिकाणी मुख्यमंत्री राहतात ती मातोश्रीदेखील पाण्यात गेली. म्हणजे पैसे खाण्याची परिसीमा किती, हा देखील जनतेला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पैसे तुमच्या बापाचे नाहीत. या सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा असून त्याच्या खर्चाचा जाब नरेंद्र मोदींचे सरकार विचारल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुरुंगात घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”