ज्ञानदानी ‘गुणवंत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022   
Total Views |
 
 
mansa
 
 
 
 
 
केवळ शिक्षकी पेशात अडकून न राहता अखंड ज्ञानदानाचा वसा घेत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान घडविणार्‍या डॉ. गुणवंत प्रेमराज भंगाळे यांच्याविषयी...
 
 
जळगावच्या रावेर तालुक्यातील खेर्डी गावात जन्मलेले डॉ. गुणवंत प्रेमराज भंगाळे यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण खेर्डी या खेडेगावातच झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचेशिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर अमळनेर येथे त्यांनी ‘बीएससी’ व ‘एमएससी’ पूर्ण केले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांना शिक्षकी पेशाविषयी आदर होता. अध्यापनातून ज्ञानदानाचा आनंद घेत अनेक उत्तम पिढ्या संस्कारित कराव्यात, असे त्यांना नेहमी वाटत असे. त्यामुळे अनेक क्षेत्र खुणावत असतानाही त्यांनी शिक्षण क्षेत्रातच पाय रोवायचे ठरवून १९८७ मध्ये ठाण्यात आले.
 
 
त्यांचे मोठे बंधू युवराज आणि वहिनी प्रेरणा हे डोंबिवलीला राहत होते. तिथे आल्यावर लगेचच बंधूच्या सूचनेनुसार उल्हासनगरच्या ‘आरकेटी’ महाविद्यालयामध्ये नोकरीच्या शोधात गेले. तिथे जुजबी मुलाखतीनंतर दुसर्‍याच दिवशी ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर ते अंबरनाथमध्ये स्थायिक झाले. रसायनशास्त्राचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ही त्यांची महाविद्यालय विश्वातील ओळख. मात्र, त्याचबरोबर गेली २१ वर्षे खासगी शिकवणी व्यवसायातही त्यांनी गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा ठसा उमटवला. त्यानंतर आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर कल्याण-मुरबाड रोडवर ‘बीबीआरटी’ ही ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची अत्याधुनिक शाळा ते सुरू करीत आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून या शाळेचे नर्सरी ते चौथीचे वर्ग सुरू होतील. या शाळेत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
 
केवळ नोकरीच्या चाकोरीत न अडकता महाविद्यालयामधील प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळून उर्वरित वेळेत खासगी कोचिंग क्लासच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे उच्चशिक्षण दिले. विज्ञान शाखेचे विद्यार्थी त्याचप्रमाणे ‘मेडिकल’ आणि ‘इंजिनिअरिंग’च्या प्रवेश परीक्षांचे वर्ग त्यांच्या शिकवणीमध्ये घेतले जातात. डोंबिवली-अंबरनाथ पट्ट्यातील हजारो विद्यार्थी या क्लासमध्ये दरवर्षी प्रवेश घेतात.
 
हसतमुख स्वभावाने डॉ. गुणवंत यांनी अनेक जीवाभावाची माणसे जोडली. ‘आरकेटी’मध्ये सहकारी प्राध्यापक असणारे नरेश भाटीया यांच्याशी त्यांचे सूर जुळले. या मैत्रीचे पुढे कोचिंग क्लासच्या रुपाने भागीदारी व्यवसायात रूपांतर झाले. कोणताही लेखी करार नसलेली ही भागीदारी केवळ विश्वासावर 21 वर्षं टिकली आहे. १९९९ मध्ये उल्हासनगरमध्ये भाटीया यांच्या बराकीमध्येच त्यांनी कोचिंग क्लास व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पहिल्या वर्षी त्यांच्याकडे सात विद्यार्थी होते आणि त्यांना शिकवायला १२ प्राध्यापक.
 
 
अतिशय उत्साहाने त्यांनी या व्यवसायाची पायाभरणी केली. हळूहळू या कोचिंग क्लासची किर्ती सर्वदूर पसरली. अकरावी, बारावी विज्ञान शाखा तसेच ‘मेडिकल’ आणि ‘इंजिनिअरिंग’च्या प्रवेश परीक्षा प्रशिक्षणासाठी उत्तम संस्था असा त्यांच्या सोनम कोचिंग क्लासचा लौकिक असल्याचे ते अभिमानाने सांगतात. उल्हासनगरमध्ये सुरू झालेल्या या क्लासचा पसारा दिवसेंदिवस वाढत आहे. आता त्यांच्या या क्लासची डोंबिवलीत एक, कल्याणमध्ये तीन, उल्हासनगरमध्ये दोन आणि अंबरनाथमध्ये एक शाखा आहे.
 
 
आतापर्यंत १२ हजारांहून अधिक ‘इंजिनिअर्स’ आणि दोन हजारांहून अधिक डॉक्टर्स त्यांच्या शिकवणीतून तयार झाल्याचे डॉ. गुणवंत सांगतात. गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपल्याचे ते आवर्जून नमूद करतात. महाविद्यालयीन शिक्षणात अध्यापनाचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवल्यानंतर डॉ. गुणवंत भंगाळे सर आता ‘बीबीआरटी’च्या माध्यमातून शालेय शिक्षण क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. डोंबिवली-बदलापूर परिसरातील एक अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी शाळा उभारण्याचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचे ते सांगतात.
 
 
समाजातील वंचित घटकांना शैक्षणिक प्रवाहात आणणे आणि देशासाठी उत्तम क्रिया घडवण्याच्या दृष्टिकोनातून ही आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘बीबीआरटी’ शाळा उभारल्याचे सांगतात. समाजसेवा हे आवडते क्षेत्र असलेल्या गुणवंत सरांना शासनाने २००४ मध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवले. अलीकडेच ‘शिक्षण व्यवस्थापन’ या विषयावर त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळवली. ‘रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ’चे विद्यमान अध्यक्ष असलेल्या गुणवंत यांना ‘अंबरनाथ गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.
 
यशस्वी होण्यासाठी व्यक्तीच्या ठायी गुणवत्ता असावीच लागते. त्याच्याआधारेच व्यक्तीला स्वत:ला सिद्ध करावे लागते. मात्र, त्याचबरोबर काही भाग्यवान व्यक्तींना नशीबही साथ देत असते. नवीन पिढीने व्यावसायिक शिक्षणाकडे वळले पाहिजे, त्याचबरोबर बाजारात जे विकलं जातं, तेच आपण पिकवलं पाहिजे. त्यादृष्टीने आपले क्षेत्र निवडून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे, असा संदेशही ते युवावर्गाला देतात. मागे वळून पाहताना केलेल्या प्रगतीत वडील बंधू आणि वहिनींचा मोठा वाटा आहे, हे ते कृतज्ञतापूर्वक नमूद करतात, अशा रितीने आपले गुणवंत हे नाव सार्थ करणार्‍या या उत्साही रसायनाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@