वैवाहिक बलात्कार आणि समाजमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2022   
Total Views |
 
 
 
 
marital rape
 
 
 
 
 
 
दि. १७ मे रोजी वैवाहिक बलात्कारासंदर्भात खुशबू सैफी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या अधीन असणार्‍या या याचिकेला अनुसरून वास्तव काय आहे, याबद्दल मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. कायदा सर्वोच्च आहेच, पण काही गोष्टी समाज आणि व्यक्तिसापेक्ष असतात. माणूस म्हणून त्यांची अभिव्यक्ती त्या त्या स्तरावर भिन्नच असते. वैवाहिक बलात्कार याचिकेतील सामाजिक वास्तव या लेखात शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
 
वैवाहिक बलात्कार या संवेदनशील मुद्द्यावर दि. १७ मे रोजी खुशबू सैफी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने यावर विभिन्न मते प्रदर्शित केली होती. या याचिकेवर बोलताना कायदेशीर लढाई लढणार्‍या अ‍ॅड. करूणा नंदी म्हणतात, ”बेडरूममध्ये पत्नीचा अपमान केला, मानसिक शोषण केले किंवा तिला मारले तर तो गुन्हा होतो. मात्र, पतीने केलेला बलात्कार हा गुन्हा का होऊ शकत नाही?” तर ’ऑल इंडिया अखिल डेमोक्रेटिक वुमेन्स असोसिएशन’च्या संस्थापिका चित्रा अवस्थी म्हणतात ”वैवाहिक बलात्कारासंदर्भात महिलांना जागृती नाही. यासंदर्भात याचिका दाखल केल्याने समाजात याबाबत काही प्रमाणात जागृती निर्माण झाली. ”
२०१५ साली ’आरआईटी फाऊंडेशन”ने वैवाहिक बलात्कारासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर २०१७ साली ’ऑल इंडिया अखिल डेमोक्रेटिक वुमेन्स असोसिएशन’ने याबाबत याचिका दाखल केली. यावर काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात वैवाहिक बलात्कार यावर न्यायदान करताना दोन विभिन्न मते मांडली गेली. न्या. राजीव शकधर यांनी ‘वैवाहिक बलात्कार’ संज्ञेस मान्यता देत त्यास गुन्हेगारीच्या कक्षेत आणण्याचे मत व्यक्त केले. यावर अशीही भूमिका मांडण्यात आली की, एक देहविक्री करणारी स्त्री लैंगिक संबंधास नकार देऊ शकते.
 
 
 
मात्र, विवाहित स्त्री देऊ शकत नाही, हे अतिशय विडंबनास्पद आहे. या भूमिकेला विरोध दर्शविताना न्या. हरीशंकर म्हणाले, ”वैवाहिक बलात्कार हा विषय व्यक्तिसापेक्ष असून सरसकट गुन्हेगारीच्या कक्षेत आणणे या गोष्टीशी सहमत नाही,” असेही मत मांडले की, विवाहित स्त्री पतीने तिच्या इच्छेविरोधात लैंगिक संबंध केल्यास तितकीच उद्ध्वस्त असते का की जितके एखादी स्त्री परपुरुषाने बलात्कार केल्यावर असते?” वैवाहिक बलात्काराच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींनी परस्पर भिन्न मत दिल्यामुळे या याचिकेमधल्या सहभागी झालेल्या खुशबू सैफी यांनी वैवाहिक बलात्कारविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, त्याआधीच काही संघटना वैवाहिक बलात्कार कायद्याच्या विरोधात मैदानात उतरल्या. ’सेव्ह इंडियन फॅमिली’चे अनिल मूर्ती यांनी याविरोधात ‘हॅशटॅग मॅरिजस्ट्राईक’ नावाचा ‘ट्रेंड’ही चालवला. त्या ‘ट्रेंड’ला अनेक पुरुषांनी पाठिंबा दिला.
 
 
 
या पुरुषांचे म्हणणे आहे की, ”टोकाच्या स्त्रीमुक्तीवाल्यांचे हे थोतांड आहे. एका पत्नीच्या साक्षीने ठरवले जाणार की, तो पती बलात्कार करणारा गुन्हेगार आहे? ‘घरगुती हिंसाचार कायदा २००५’ तसेच ४९८ कलम’ यामध्ये कितीतरी निष्पाप पुरुषांना त्रास सहन करावा लागतो. कोणत्या पुरुषाला असे वाटते की, त्याच्या पत्नीने त्याचा द्वेष करावा, त्याला गुन्हेगार समजावे? समाजात गेल्यावर कळेल की, वैवाहिक संबंधात एकटी स्त्रीच नाही तर पुरूषही पीडित सापडतील. वैवाहिक बलात्कारासंदर्भात कायदा झाला तर घटस्फोट घेताना स्वत:ची कोणतीही चूक न दाखवता पतीच कसा राक्षसी, विकृत होता, बलात्कार करणारा गुन्हेगार होता, हे घटस्फोट घेऊ इच्छिणारी महिला सांगू शकेल. यात पुरूषांच्या सुरक्षिततेचे काय?” तर यावर केंद्र सरकारने २०१७ साली मत मांडले हेाते की, ”वैवाहिक बलात्कारासंदर्भात कायदा हा व्यापक विचारांनी करायला हवा. त्यासाठी जनमत घेणे गरजेचे आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून या मुद्द्यावर मत मागितले आहे.” पण, २०२२ पर्यंत त्याबाबत व्यवस्थित माहिती मिळाली नसल्याने केंद्र सरकारने याबाबत न्यायालयाकडून आणखीन मुदत मागितली होती. पण, न्यायालयाने ती मुदत नाकारली. पुढे या याचिकेबाबत सुनावणी झाली. त्यामध्ये दोन न्यायाधीशांनी परस्परविरोधी मत मांडली. आता याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली.
असो. संशोधनानुसार २९ टक्के महिलांवर त्यांच्या पतीकडून बलात्कार केला जातो. त्यामध्येही ग्रामीण भागात ३२ टक्के, तर शहरी भागात २४ टक्के असे प्रमाण आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राईड यांनी तर ‘लैंगिकतेच्या दृश्य आविष्काराची मुळे मनुष्याच्या अलैंगिक प्रेरणांमध्ये व सुप्त इच्छा-आकांक्षांमध्ये आहे,’ असे म्हटले. या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज काय म्हणतो, याचा आढावा घेऊया.
काही वर्षांपूर्वी अतिउच्चशिक्षित जोडप्याची एक केस अ‍ॅड. सुधा जोशी यांच्याकडे आली. ते दोघेही दिवसभर कामाला जायचे. ती कामावरून घरी आली की, घरकाम आणि मूल यातच तिचा वेळ जायचा. रात्र झाली की, कधी एकदा झोपते असे तिला व्हायचे. मात्र, पतीला लैंगिक संबंधाची इच्छा असायची. तिच्या नकारावरून एकेदिवशी त्या दोघांचे पहाटे ५ पर्यंत भांडण चालले. पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंटा मारला. त्यानंतर डॉक्टरांकडे उपचार करून ती पत्नी सुधा जोशी यांच्याकडे आली. तिला पतीविरोधात तक्रार नोंदवायची होती. लैंगिक संबंध, त्यातील ताणतणाव हे पोलिसांसमोर बोलण्यास तिला संकोच वाटत होता. शेवटी घरगुती हिंसा कायद्याअंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली गेली.
 
 
 
मात्र, त्यानंतर काही दिवसांनी ते दोघे पती-पत्नी सुधा जोशी यांच्याकडे आले. पत्नी म्हणाली, ”झाले ते झाले रागाच्या भरात. आता आम्हाला ती तक्रार मागे घ्यायची आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.” वैवाहिक बलात्कार यावर मत मांडताना अ‍ॅड. सुधा जोशी म्हणतात की, “गेली २५ वर्षे वकिली करताना असंख्य घटना पाहायला मिळाल्या. २० वर्षांपूर्वी वर्षाला २०० ते २५० घटस्फोटाच्या केसेस न्यायालयात यायच्या. आता त्याचीच संख्या वर्षाला २५०० च्या पुढे पोहोचली आहे. त्यामध्ये ‘३७७’ हे कलम घटस्फोटाचे कारण म्हणून लावलेले असतेच. ‘कलम ३७७’ काय तर पुरुषाने जबरदस्तीने इच्छेविरूद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध केले. आता यामध्ये हे खरे की खोटे, याची सिद्धता कशी करणार? वैवाहिक बलात्कार हा विषय अत्यंत क्लिष्ट आहे. असे नाही की, वैवाहिक बलात्कार होतच नाहीत, तर ते होतात. मात्र, सामाजिक मानसिकतेसोबतच व्यक्तिसापेक्ष मानसिकतेवर ते अवलंबून आहेत.”
या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या आणि मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभाग साहाययक प्राध्यापिका डॉ. लक्ष्मी साळवी म्हणतात की, ”वैवाहिक बलात्कार हा क्रूरच असतो. भारतीय संविधानाने समानतेचा हक्क स्त्री आणि पुरुषांना दिला. नकार देणे हासुद्धा अधिकार आहे. विवाहित किंवा अविवाहित या मुद्द्यावरून हा हक्क नाकारला जाऊ शकत नाही. आज-काल दूरदर्शन मालिकांनी समाजजीवन बिघडलंय. विवाहबाह्य संबंधांमुळे कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे. आपल्या ज्या काही मानसिक आणि शारीरिकही गरजा आहेत, त्या एकमेकांच्या साथीनेच पूर्ण करायला हव्यात, हा समाज नियम पती-पत्नीने पाळायलाच हवा.
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांत आणि कृतीमध्येही अन्याय-अत्याचाराला विरोध केला, तसेच बाबांनी व्यभिचारालासुद्धा विरोध निषिद्ध मानले, हे समाजाने विसरता कामा नये.” या अशा तर वैवाहिक बलात्काराबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रेखा बहनवाल यांनी एक घटना सांगितली. नेहमीच आजारी असणार्‍या एका महिलेच्या आजाराचे निदान करताना त्यांना जाणवले की, शारीरिक आजारापेक्षा तिला मानसिक उदासिनता जास्त आहे. तिच्या आजारपणाचे कारण काय, असे खोदून खोदून विचारल्यावर ती स्त्री रडू लागली. त्या महिलेने रेखांना सांगितले की, पतीला ती आवडत नाही. तो तिला छळायची, अपमानित करायची एकही संधी सोडत नाही. मात्र, तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे, हा त्याला त्याचा हक्क वाटे. तो दररोज रात्री तिचा पूर्ण चेहरा टॉवेलने बांधायचा आणि मग लैंगिक संबंध ठेवायचा.
 
 
 
त्यानंतर स्वत:च्या पायावर थुंकायचा आणि तिला चाटायला सांगायचा. तिने नकार दिला, तर तिला मारायचा. तिचा आरडाओरडा ऐकून दुसर्‍या दिवशी घरातल्या मोठ्याधाट्यांनी विचारले, “काय झाले?” तर सांगायचा, “हिला मी आवडत नाही. माझे काहीही ऐकत नाही. पतीला खूश ठेवत नाही.” मग घरातल्या महिला तिला दररोज सांगायच्या की, ”बाई, पतीला खूश ठेवायला पाहिजे. तू खूश नाही ठेवलेस, तर तो दुसरीकडे गेला तर मग रडू नकोस.” डॉ. रेखा म्हणतात, ”या महिलेला कायद्याची मदत मिळवून द्यायची तयारी दर्शवली तर तिने नकार दिला. म्हणाली, “आईबाबांनी सांगितले, ज्या घरात तुझी डोली गेली त्याच घरातून तुझी अर्थी बाहेर येईल. मेल्याशिवाय घराबाहेर पडू शकत नाही. पोलिसात गेले तर खानदानची इज्जत जाईल.
 
 
 
मरेपर्यंत सहन करेन. कधीतरी पतीला दया येईल माझी.” अशी मानसिकता असल्यावर कितीही कायदा केला तर काही बदल होणार का? आपला धर्मसंस्कृती दया, करूणा सांगते, पण काही विकृत माणसामुळे समाजव्यवस्था बदनाम होते, तर याबाबत मानसी पराडकर सामाजिक कार्यकर्तीचे म्हणणे आहे की, “वैवाहिक बलात्कार ही विकृत मानसिकता आहे, असे सरसकट म्हणू शकत नाही. कारण, एका वळणावर महिला घर, संसार आणि इतर व्यापात गुंतून जातात. त्या आपल्या वैवाहिक आणि एकंदर लैंगिक संबंधांबाबत स्थिरता अनुभवतात. मात्र, पुरुषांचे तसे होताना दिसत नाही. त्यामुळे ते पत्नीकडून पूर्वीसारखीच लैंगिक सहकार्याची इच्छा बाळगतात. अगदी पत्नीची इच्छा नसली तरीसुद्धा. कारण, त्या पतींना वाटते की ती आपलीच आहे. आपला हक्कच आहे. आपल्यामुळे पत्नीला मानसिक किंवा शारीरिक आघात होऊ शकतो, याची जाणीवही त्या पतींना नसते. मात्र, हे केवळ शारीरिक वेदनादायक अनुभव न देणार्‍या संबंधांबाबत म्हणू शकतो, जिथे शारीरिक, अत्याचार, पीडा, वेदना अगदी मानसिकही वेदना असतील, तर तो मग बलात्कारच.”
वस्तीपातळीवरील महिलांचे वैवाहिक बलात्कारावर मत काय असेल? गेली १४ वर्षे कौटुंबिक हिंसाचाराविरोधात महिलांच्या हक्कांसंदर्भात काम करताना निश्चित समजले की, वैवाहिक बलात्कारही असतो, हे त्यांना माहिती नाही. पतीचा तो अटळ हक्कच आहे, असे त्यांना वाटते. किंबहुना यामध्ये आपली सहमती-असहमती असू शकते, याची त्यांना अजिबात जाणीव नाही. तसेच लैंगिक संबंध ही अतिशय गुप्त आणि खासगी बाब असून त्यासंदर्भात कुठेही बोलणे सगळ्याजणी टाळतात. उलट आपला नवरा आपली इच्छा नसतानाही लैंगिक संबंध ठेवतो, म्हणजेच त्याला आपली गरज आहे, यातच त्या संतुष्ट आहेत. आपल्याकडे येतो म्हणजे दुसरीकडे कुठे काही लफडे नाही, याबद्दल त्या आनंदात असतात. अर्थात, यात काही महिला अशाही असतात की, त्या पतीला छळण्यासाठी म्हणून लैंगिक संबंधांना नकार देतात. पतीला कसे का होईना झुकायला लावू शकतो, याचा आसुरी आनंद उपभोगतात. अर्थात, या दोन्ही गोष्टी समाजात आहेतच. पण कुटुंब म्हणून पती आणि पत्नी परस्परांना सहकार्य करून संसार चालवतात.
 
 
 
त्यात इतकी समरसता असते की, त्या दोघांशिवाय घरातल्या तिसर्‍याला त्याची बिल्कूल माहितीही नसते. मुळात पतीने पत्नीच्या इच्छेविरूद्ध तिच्याशी केलेले लैंगिक संबंध हा मुद्दा अत्यंत नाजूक आणि व्यक्तिसाक्षेप आहे. वर्षानुवर्षे एकमेकांसोबत प्रेमाने किंवा कोणत्याही कारणाने एकत्रित आयुष्य व्यतित केलेले पती-पत्नी एकमेकांच्या इच्छेचा आदरच करतात. आदर नाही केला, तरी इतर नावडत्या कर्तव्यासारखेच एक कर्तव्य समजून त्याला सामोरे जातात. परस्परावलंबन आणि परस्पर सहयोग हा कुटुंबसंस्थेचा प्राण आहे. तसेच इच्छा काय केवळ पतीलाच होतात का? किंवा असतात का? आयुष्याच्या एका वाटेवर कधीतरी स्त्री तर सोडाच, पण माणूस म्हणून त्या पत्नीलाही इच्छा होऊ शकते.
 
 
 
त्यावेळी तिच्या पतीची इच्छा नसेल तर? या काही जर-तरच्या गोष्टी नाहीत. आधीच सांगितल्याप्रमाणे याला अनेक मानसिक-सामाजिक आणि सांस्कृतिक कंगोरे आहेत. पती-पत्नी कोणत्या परिस्थितीत बालपण गेले, कोणत्या परिस्थिती आणि कोणत्या प्रक्रियेने त्यांचे संगोपन झाले, यावरही त्यांचे वैवाहिक संबंध, त्यातील मधुरता किंवा दुष्कृत्य अवलंबून असते. दुसर्‍या बाजूने पाहिले तर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या अशा की, खरेच काही महिलांना वैवाहिक बलात्काराला सामोरे जावे लागते. आपले दु:ख किंवा निराशा याचा.
 
 
 
राग कुठे बाहेर काढायचा, तर पत्नीवर हे काही पुरुषांच्या मनावर ठाम कोरले गेले आहे. आपल्यावर होणार्‍या अत्याचाराला, दडपशाहीला बाहेर उत्तर देता येत नसेल, तर मग त्याचा राग त्या पत्नीवर लैंगिक संबंधाद्वारे काढला जातो. त्या संबंधातून तिला होणारा त्रास पिडा होऊन त्या पतीला आपण खरे मर्द असल्याचे वाटते. खोटा पुरुषी अहंभाव त्याला संतुष्ट करतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोरोना काळात जगभरात बलात्काराचे आणि घरेलु हिंसेचे प्रमाण वाढले. असो, यात सगळ्याच पुरुषांची मानसिकता अशी होती किंवा आहे असे बिल्कूल म्हणायचे नाही. कारण, पुरुष आणि स्त्री या दोघांनाही मन आणि भावना असतात. पुरूष ज्याप्रमाणे स्त्रीला प्रताडित करू शकतो, त्याप्रमाणे स्त्रीसुद्धा पुरूषाला प्रताडित करू शकते, हे अंतिम सत्य आहे. फक्त व्यक्त आणि अव्यक्त होण्याचे प्रमाण कमीअधिक आहे इतकेच. वैवाहिक बलात्कार कायद्याने थांबू शकतील का? यात प्रामुख्याने गरज आहे, समाजजागृतीची, कुटुंबप्रबोधनाची, शाश्वत मानवी मूल्ये समाजात रूजण्याची!
 
 
 
 
 
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हे पवित्र बंधन आहे. या संबंधामध्ये ’वैवाहिक बलात्कार‘ हा शब्द हा योग्य नाही. जर पतीद्वारे पत्नीवर अत्याचार होत असेल, तर पत्नी कायद्याने वेगळी राहू शकते. तिला कायद्याद्वारे पतीकडून आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे ‘वैवाहिक बलात्कार’ आणि ‘गुन्हा’ हा शब्दप्रयोग कौटुंबिक व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी टाळायला हवा.
 
 
 
- सुनीला सोवनी, अ. भा. प्रचार प्रमुख, राष्ट्र सेविका समिती
 
 
@@AUTHORINFO_V1@@