डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जागृती झाली पाहिजे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    18-May-2022
Total Views |
 
 
 
 
 
 
babasaheb
 
 
 
 
 
बदलापूर : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची हिमालयाएवढी आहे, ती कोणीही नाकारू शकत नाही. नागरपूरमध्ये दीक्षाभूमी आहे, बदलापूरमध्ये आ. किसन कथोरे यांनी प्रति दीक्षाभूमी साकारली आहे. स्मारके बांधण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जागृती झाली पाहिजे,” असे प्रतिपादन विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. बदलापूरमध्ये आ. किसन कथोरे यांच्या संकल्पेतून सोनीवली येथे साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण, भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
 
 
 
 
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरबाडचे आ. किसन कथोरे, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे, आ. कुमार आयलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
 
“इंदू मिलमधील स्मारकाच्या जागेसाठी लढा सुरू होता. तेव्हा, केंद्राशी चर्चा करून ३ हजार, ६०० कोटी रुपयांची जागा राज्याला मिळवून दिली. आता त्याजागी डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे राहात आहे. त्याचप्रमाणे, बदलापुरातही डॉ. आंबेडकर यांच्या उंच पुतळ्याचे काम नक्की होणार,” असा विश्वासही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
चार वेळा निवडून येणार्‍या आ. किसन कथोरे यांनी सतत विकासकामे करण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक साकारल्याबद्दल कथोरे यांच्या कार्याची रामदास आठवले यांनी प्रशंसा केली. डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आणि अन्य कामांसाठी ४० लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने बदलापूर शहर पावन झाल्याची आठवणही त्यांनी करून दिली. नागरपूरकरांनी स्मारकासाठी लागणारा निधी दिल्याने बदलापुरात प्रति दीक्षाभूमी पूर्णत्वास आल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले. बदलापुरात डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा मिळाल्यानंतर असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. टीका झाल्या. स्मारकाचे काम पूर्ण झाले असून डॉ. आंबेडकर यांचा उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. जेएनपीटी ते वडोदरा महामार्गावर बदलापूरच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याला आणि सोनीवली जवळील नियोजित मेट्रो रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणीही आ. कथोरे यांनी यावेळी केली.
 
 
 
 
 
याप्रसंगी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सुधाकर जाधव, प्रवीण राऊत, संजय गायकवाड, धनराज गायकवाड, महेश जाधव, सुखदेव गायकवाड, तात्यासाहेब सोनावणे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, किरण भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष शरद तेली यांनी सूत्रसंचालन तर माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी आभार मानले.
 
 
 
‘...तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार!’
 
 
 
 
 
“राज्यातील महाविकास आघाडीची अडीच वर्षे पार पडली आहेत, अजून तशी गडबड दिसत नाही. ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील असे दिसत आहे. पण, मध्येच काही गडबड झालीच, तर आम्ही पुन्हा सत्तेत येणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार,” असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केला.