रुग्णसेवा हेच ध्येय : विजय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

    18-May-2022
Total Views |
 
 
विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 
 
 
 
केवळ नफा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर न ठेवता रुग्णसेवा करण्याच्या हेतूने अंबरनाथ येथील ‘विजय मल्टिस्पेशालिटी रुग्णालया’ची स्थापना करण्यात आली. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण बरे झाल्यानंतर समाधानाने बाहेर पडतात, हीच आमच्या कामाची खरी पोचपावती असल्याचे रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. अश्विनी सावंत सांगतात. या रुग्णालयाच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश...
 
 
 
 
अंबरनाथमधील औद्योगिक विभागात ‘विजय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय’ असून याच जागेवर २०१३ च्या सुमारास ‘ओपीडी क्लिनीक’ होते. तसेच या ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू होते. या सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी रुग्ण मोठ्या संख्येने येत होते. मात्र, याच काळात महाराष्ट्रात ‘कोविड’ने हातपाय पसरायला सुरुवात केली. अंबरनाथमध्येदेखील औद्योगिक परिसरात एका चांगल्या ‘कोविड’ रुग्णालयाची गरज होती. रुग्णांना चांगली सेवा या रुग्णालयात मिळत असल्याने त्यांनी ‘कोविड’ रुग्णालयदेखील या जागेत सुरू करावे, अशी मागणी अरूण सावंत याच्याकडे केली होती.
 
 
अरूण सावंत यांनी याठिकाणी ‘कोविड’ रुग्णालयदेखील सुरू केले. ‘कोविड’ रुग्णालय सुरू केल्यानंतरही अनेक आव्हाने समोर उभी होती. त्या आव्हानांचा सामना करीत अनेक रुग्णांना पूर्णपणे बरे करण्याची किमया या रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टरांनी साकारली आहे. या रुग्णालयातील सर्व रुग्णांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी फळे आणि रात्रीचे जेवण रुग्णालयातर्फे दिले जाते. अरूण सावंत स्वखर्चाने रुग्णांना जेवण आणि नाश्ता पुरवित असतात. ‘कोविड’ काळातही अनेक रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 
 
‘कोविड’नंतर या रुग्णालायाचे नूतनीकरण करण्यात आले. नोव्हेंबर २०२१ ला रुग्णालयाचे नूतनीकरण केल्यानंतर अनेक सेवा रुग्णालयातच रुग्णांना मिळू लागल्या. रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. ‘डिलक्स रुम’ तयार करण्यात आल्या आहेत. डेंग्यू, मलेरिया यासारख्या सामान्य आजारांवर याठिकाणी उपचार होतच होते. मात्र, आता हृदयशस्त्रक्रियेपासून सामान्य शस्त्रक्रियाही याठिकाणी होत आहे. ऑर्थोपेडिक, कार्डिअ‍ॅक , डोळ्यांच्या विविध आजारांवरील शस्त्रक्रियादेखील या रुग्णालयात होत आहे. जळीत रुग्ण विभागदेखील रुग्णालयात आहे. सध्या अंबरनाथ विभागातील रुग्णांना सर्व सेवा एकाच छताखाली या रुग्णालयात मिळत आहे. ‘विजय मल्टिस्पेशालिटी रुग्णालया’चे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाले, तर मॉड्युलर ‘ऑपरेशन थिएटर’ याठिकाणी रूग्णसेवेसाठी सज्ज आहे.
 
अरूण सावंत यांची ‘विजय गॅस एजन्सी’ आहे. त्यांची सून अश्विनी ही व्यवसायाने डॉक्टर आहे. त्यांनी ‘फिजिओथेरपी’ यामध्ये ‘स्पेशलायझेशन’ केले आहे. अरूण सावंत यांची अंबरनाथ या ठिकाणी सुरूवातीपासूनच जागा होती. त्या जागेत त्यांनी ‘ओपीडी’ सुरू केली होती. डॉ. अश्विनी या सुरूवातीला ‘प्रॅक्टिस’ करीत होत्या. रिजन्सी इस्टेट आणि डोंबिवली एमआयडीसी या विभागात त्यांची ‘प्रॅक्टिस’ सुरू होती. दहा ते बारा वर्षे ‘प्रॅक्टिस’ केल्यावर त्या ‘विजय मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात रूजू झाल्या. डॉ. अश्विनी सावंत यांच्या आईचे स्वप्न त्यांनी डॉक्टर व्हावे असे होते. त्याप्रमाणे त्या डॉक्टरही झाल्या. डॉ. अश्विनी यांना लग्नानंतर सासू, सासरे, पती यांची चांगली साथ मिळाली. अरूण सावंत यांच्या जागेत रुग्णांच्या मागणीनुसार रुग्णालय त्यांनी सुरू केले. “रुग्णालयात विविध विभाग सुरू करणे, ही एक मोठी गुंतवणूक होती. पण लोकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते,” असे डॉ. अश्विनी यांनी सांगितले.
 
‘कोविड’ काळात एकदा एका रुग्णावर उपचार होणार नाही, असे त्यांना वाटत होते. मात्र, तरीही रुग्णांचे नातेवाईक त्या रुग्णाला रुग्णालयाच्या दारात टाकून गेले. रूग्णालयानेदेखील माणुसकीच्या भावनेतून त्या रुग्णावर उपचार केले. एका महिलेच्या प्रसूतीसंदर्भातील केस रुग्णालयात आली होती. ही प्रसूती करणे अत्यंत कठीण गोष्ट होती. मात्र, रुग्णालयातील सर्व टीम पूर्णपणे कामाला लागली होती. त्यांनी १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही प्रसूती यशस्वी केली. सध्या रुग्णालयात 15 हून अधिक डॉक्टर कार्यरत आहेत.
 
 
‘कोविड’ संसर्गाचा काळ हा प्रत्येकासाठी भीतीयुक्त आव्हानाचा होता. यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना रुग्णावरील संकट दूर करतानाच स्वत:चे आणि कुटुंबांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची तिहेरी कसरत करावी लागत होती. डॉ. अश्विनी यांनीदेखील ‘कोविड’ काळात झपाटल्याप्रमाणे काम केले. ‘कोविड’ काळात आपल्या चिमुरड्यांच्या आधी त्या रुग्णांची काळजी घेत होत्या. ‘कोविड’ काळात त्या घरी रात्री २ ते ३ वाजता पोहोचायच्या. पण त्यांनी कायम कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले. अनेक रुग्णांना त्यांनी नवजीवन देण्याचेही काम केले आहे. या रुग्णालयाचा आधीच एक चांगला लौकिक आहे. पण आता ज्या पद्धतीने रुग्णांना सेवा दिली जाते, त्यामुळे रुग्णांचा रुग्णालयावर विश्वास अधिकच दृढ झाला आहे.
 
रुग्णालय चालविताना त्यांनी नफा हे उद्दिष्ट कधीच ठेवले नाही. सेवा करणे, हाच त्यांचा हेतू आहे. आता रुग्णालयाला ‘हिंदुजा रुग्णालया’प्रमाणे करण्याचा मानस आहे. रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊनच बाहेर गेला पाहिजे. रुग्णालयात अजून ही ‘कॅथलॅब’ तयार करणे, ‘डायलिसिस’ मशीन आणणे, ‘सिटीस्कॅन’ यासारख्या सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मोठे रुग्णालय म्हटले की, रुग्णांना त्याठिकाणी उपचार घ्यायला भीती वाटते. पण गरिबांना हे रुग्णालय आपले आहे, असे वाटले पाहिजे, असा अरूण सावंत यांचा प्रयत्न आहे. या रुग्णालयातून आतापर्यंत ७५० हून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. या रुग्णालयाच्या दोन वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. पण त्याला मोठ्या धैर्याने सावंत कुटुंबीयांनी तोंड दिले आहे. रुग्णालयाचे नाव आज अंबरनाथमधील प्रतिष्ठित रुग्णालयांत घेतले जाते. तसेच रुग्णालयात गरिबांनाही उपचार मिळावे यासाठी ‘इएसआयसी’, ‘महात्मा फुले जन आरोग्य’ यासारख्या योजना रुग्णालयात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रुग्णालयाच्या यशात उमेश जयस्वाल, लक्ष्मी नायर, किरण शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे.