वाल्मिकी समाजाची पहिली महिला डॉक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2022   
Total Views |
 
 
 
 
Dr. Rekha Bahanwaal
 
 
 
 
 
महर्षी वाल्मिकींच्या रामायणातील सीतामातेची वारसदार आणि त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणार्‍या भिमाची लेक डॉ. रेखा बहनवाल. त्यांच्या कार्यजीवनाचा घेतलेला हा मागोवा....
 
 
 
तुला डॉक्टर बनायचंय, पण मुलं शिकत असलेल्या कॉलेजला तुला कसं शिकवायला पाठवू,” असं श्यामाबाई लेकीला समजावून सांगत होत्या. पण, लेक ऐकली नाही. ‘मला डॉक्टर बनायचं आहे’ या एका जिद्दीखातर तिने अन्नत्याग केला. त्यामुळे आजारी पडली. लेकीला घेऊन त्या डॉक्टर घोगरेंकडे गेल्या. त्यांनी मुलीला अन्नत्यागाचे कारण विचारले. कारण, कळल्यावर ते श्यामाबाईंना म्हणाले, “ताई, शिकू द्या मुलीला. मुलांसोबत शिकल्याने काही होत नाही.” असे म्हणून त्यांनी स्वत:च्या गाडीमध्ये बसवून मायलेकींना एका महाविद्यालयात नेले. तिथे विज्ञानशाखेत प्रवेश मिळवून दिला.
 
 
इतका मोठा डॉक्टर त्यातही ब्राह्मण माणूस इतक्या विश्वासाने, आपलेपणाने सांगतो म्हणून श्यामाबाईंनी मुलीला त्या महाविद्यालयात पाठवले. पण, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा, तर गावाबाहेरील वसतिगृहात राहावे लागणार होते. आता मात्र काही लोकांनी श्यामाबाईंना स्पष्टच सांगितले की, ‘हे चांगले नाही. मुलीला गावाबाहेर एकटीला शिकायला पाठवतेस? समाजात कुणी मुलगी अशी बाहेर शिकायला गेली का? मुलगी पळून जाईल. नाक कापेल तुझं.’ पण, श्यामाबाई लेकीसाठी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या.
 
 
त्या तिला सांगत, “बघ बाई, जगाशी झगडून तुला शिकायला पाठवलं. तू शिकून कुळाचं नाव राखून डॉक्टर झालीस, तर बाकीच्या पोरींना लोकं शिकायला पाठवतील. नाहीतर मग कुणीच मुलींना पुढे शिकवणार नाहीत.” लेकीने आईचे म्हणणे लक्षात ठेवले. ती खूप मेहनतीने डॉक्टर झाली. वाल्मिकी समाजाची पहिली महिला डॉक्टर, डॉ. रेखा बहनवाल. आज डॉ. रेखा ‘अखिल भारतीय वाल्मिकी महासभे’ची राष्ट्रीय महासचिव, ‘अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटने’च्या कार्याध्यक्षा, ‘श्री क्षेत्र वाल्मिकी धाम ट्रस्ट’च्या कार्याध्यक्षा, ‘श्री महाकालेश्वर ट्रस्ट, कल्याण’ विश्वस्त, ‘आयकॉन प्रतिष्ठान, डोंबिवली’च्या सरचिटणीस आहेत.
 
त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘भीमाची लेक पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’, ‘कागाय पाथब्रेकर्स राष्ट्रीय पुरस्कार’, संघभूमी येथे ‘डॉ. हेडगेवार स्मारक समिती सन्मान पुरस्कार’ही प्राप्त झाला आहे.डॉ. रेखा यांचा जीवनप्रवास म्हणजे एका भारतीय स्त्रीची यशोगाथाच होय. रेखा यांचे आजोबा हे स्वातंत्र्यसेनानी. स्वातंत्र्यानंतर ते जळगावचे आमदार झाले. पण, घरची आर्थिक स्थिती ‘जैसे थे’च. त्यांचे पुत्र मोहनजी. मोहनजी यांची पत्नी श्यामाबाई. उभयंतांना सात अपत्ये. सहा मुली आणि एक मुलगा. त्यापैकी एक रेखा.
 
 
त्याकाळी मोहनजी जळगावला खादी ग्रामोद्योग भवनमध्ये शिपाई म्हणून काम करत. काही घरगुती कारणास्तव श्यामाबाई आपल्या माहेरी राहत. श्यामाबाई धुळे महानगरपालिकेत सफाई खात्यात काम करायच्या. धूळ, कचरा, शौचालयातील घाण यामध्ये श्यामाबाईंचा दिवस जायचा. रेखाही चौथीपासून गल्लीत झाडूकाम करायला जायच्या. त्यावेळी त्यांना शाळेमध्ये काही मुलेमुली जातिवाचक अपशब्द वापरून चिडवू लागल्या. शाळेमध्ये पाटील गुरूजींनी हे पाहिले. ते मुलांना म्हणाले, “कष्टाशिवाय कोणी मोठे होत नाही.
 
 
रेखासुद्धा कष्ट करते,” असे म्हणून त्यांनी रेखाकडून स्वा. सावरकरांचे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गीत पाठ करून घेतले. छोटी रेखा हे गाणे गल्लीत झाडू मारताना सुस्वरपणे म्हणत. याच गल्लीत राहणार्‍या जोशीकाकांनी रेखांचे गाणे ऐकले. त्यांनी विचारपूस केली. ते रेखांच्या शाळेत आले आणि त्यांनी रेखांना नि:शुल्क शिक्षण मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. रेखा त्यावेळी आठवीला होत्या. त्यावेळी त्यांनी कल्याणच्या डॉ. एम. एम. बहनवाल यांचे पत्रक पाहिले. त्यात समाजाने डुक्करे पाळू नये, मुलांना शिकवावे, असे त्यात लिहिले होते. घरात, समाजात डॉ. एम. एम. बहनवाल यांना मानाचे स्थान होते.
 
 
त्यांच्याबद्दल ऐकून रेखांनी पत्रक वाचले.त्यांनी ठरवले आपणही डॉक्टर व्हावे. पुढे डॉ. एम. एम. बहनवाल यांनीही रेखा यांनी डॉक्टर व्हावे, यासाठी सहकार्य केले. योगायोग असा की, पुढे डॉ. एम. एम. बहनवाल यांच्या छोट्या भावाशी आयुर्वेदाचार्य गोपालसिंह यांच्याशी रेखा यांचा विवाह झाला. त्या सासरी आल्या. मात्र, पतीवर समाजाचा पगडा होता. शिकलेल्या मुलींना बंधनं घातली नाहीत, तर त्या बेताल होतात, असे डोक्यात भरलेले. रेखा यांनी दवाखाना सुरू केला तेव्हा त्यांनी केवळ महिला रुग्णांनाच पाहावे, असे सांगण्यातही आले.
 
 
यामुळे सुरुवातीला रेखा यांना जड गेले. मात्र, रेखा यांचे घरदार जोडून असलेले वागणे, संस्कार आणि सेवाभाव पाहून शिकलेल्या मुली बेतालच असतातच असे नाही, हे गोपालसिंह यांना अनुभवाअंती कळले. त्यानंतर या दोघांचे सहजीवन सहज फुलत गेले. गोपालसिंह आणि सासर-माहेरचे सर्वच आप्तेष्ट रेखांना प्रत्येक गोष्टीत साथ देत गेले. पुढे रेखा यांच्या दवाखान्यात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक वसंत सहस्रबुद्धे उपचारासाठी आले. रेखामधील कर्तृत्ववान व्यक्ती त्यांना जाणवली. समाजासाठी काम करा, असे ते सांगू लागले.
 
 
रेखा यांनी सासर-माहेरच्या नातेवाईकांच्या साथीने आणि संमतीने सामाजिक कार्याला सुरुवात केली. सफाई कामगारांचे प्रश्न त्यांनी अनुभवले होते. सफाई कामगार त्यातही वाल्मिकी समाजातील व्यक्तीचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला, कामामधील असुविधा, डावलेले हक्कयासाठी त्यांनी लढा उभारला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्यापर्यंत मागण्या नेल्या. सफाई कामगारांच्या रजेबाबतची मागणी शासकीय स्तरावर मंजूर झाली. बाकी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जुळवाजुळव होत असताना राज्य सरकार बदलले. मात्र, तरीही रेखा यांचा लढा कायम आहे. कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक स्तरावर वंचित असतानाही रेखा यांनी स्वत:चे तेजोमय अस्तित्व निर्माण केले. डॉ. रेखा बहनवाल या समाजाच्या खर्‍या प्रेरणास्थान आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@