मुंबई : अकरबुद्दीन ओवेसी हे औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्यावरून सध्या राज्यात सर्वत्र हा विषय चांगलाच तापला आहे. तसेच मस्जिदीवरील भोंग्यांवर राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे मनसेकडून राज्यसरकारवार अनेकदा टीकाही करण्यात येत आहे. अशातच आता "२००० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये औरंगजेबाचे थडगे जमीन दोस्त झालं पाहिजे. पुन्हा बांधता कामा नये असं म्हणाले होते. हे ठाकरे सरकार बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का ?" असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी राज्य सरकारपुढे उपस्थित केला आहे.
"१८ डिसेंबर २००० रोजी सामानाला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, औरंगाबादमध्ये असलेलं हे औरंगजेबाचे थडगे जमीन दोस्त झालं पाहिजे आणि ते पुन्हा बांधण्यात येऊ नये. हे शिवसेनेचं ठाकरे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहेत का? आणि हे थडगं जमीन दोस्त होणार आहे का? या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय ? हि निजामाची औलाद येऊन इथे नतमस्तक होण्यासाठी ठेवलं आहे का हे?" असे प्रश्न गजानन काळे यांनी ठाकरे सरकारपुढे उपस्थित केले आहेत.
त्याचबरोबर "आपण संभाजीनगरच्या नावावरून पलटी मारलेली आहे. आदरणीय बाळासाहेबांच्या भोंग्याच्या आणि रस्त्यावर नमाज पठण करण्यात येत या विषयांवरूनही आपण पलटी मारली आहे. किमान आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलेलं ऐकून या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे थडगं तोडून टाकणार आहात का? असली नक्लीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्त्ववाद्यांची आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा" असं थेट आव्हान गजानन काळे यांनी ठाकरे सरकारला केले आहे.