मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत निदर्शने केली. यावरून रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला होता. मात्र आता रोहित पाटील यांच्या टीकेला उत्तर देत "पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं?" असा सवाल रोहित पवार यांच्यापुढे उपस्थित केला आहे.
"रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनीच ही संस्कृती राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच 'हात' आहे?" अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
"गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला असून आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी", अशी मागणी रोहित पवारांनी केली होती. त्याचबरोबर "आपण मोठे नेते आहाता. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे," अशा शब्दात रोहित पवार यांनी टीका केली होती.