नवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपावरून सीबीआयने मंगळवार, दि. १७ मे रोजी काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या घराची आणि कार्यालयांची झडती घेतली. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित सात परिसर चेन्नई, मुंबई, ओडिशा आणि दिल्लीमध्ये धाड टाकण्यात आली आहे.
सीबीआयने सकाळी पी. चिदंबरम यांच्या ८० लोधी इस्टेट निवासस्थानाची झडती घेतली. सीबीआयच्या पथकाने त्याच्या घरी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि काही कागदपत्रेही सोबत घेतली आहेत. २०१० ते २०१४ दरम्यान पंजाबमधल्या एका वीज प्रकल्पासाठी २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्याकरीता ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप करत, तपास यंत्रणेने कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध नवीन गुन्हा नोंदवला आहे.
घरच्या सुरक्षा रक्षक अधिकारी बिरबल सिंग म्हणाले, '' सीबीआय टीममध्ये एकूण सात सदस्य होते व सकाळी ७.३० वाजता छापा टाकला तेव्हा कार्ती चिदंबरम त्यांच्या निवासस्थानी नव्हते''. छापेमारीची बातमी उघड झाल्यानंतर कार्ती चिदंबरम हे ट्विट करत म्हणाले, "ही कितव्यांदा धाड टाकण्यात आलीयं त्याबद्दल मला माहिती नाही, परंतू आता त्याचीही नोंद ठेवायला हवी.". अशी टीपण्णी आजच्या कारवाईबद्द्ल त्यांनी केली आहे.
कार्ती चिदंबरम यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी केली जात आहे. त्यांचे वडील पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना ३०५ कोटींचा विदेशी निधी प्राप्त करण्यासाठी आईएनएक्स मीडियातील गुंतवणूकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आईएनएक्स मीडिया प्रकरणाचा तपास करत असताना, एजन्सीला लाचेच्या आरोपांसह नवीन प्रकरणाशी जोडलेली कागदपत्रे सापडली. कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने फेब्रुवारी २०१८ मध्ये मनी लाँड्रिंग केस मध्ये अटक करण्यात आली होती आणि महिनाभरानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.