उरण : छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केल्यानंतर आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्धार केला आहे. पुण्यात दि. १२ मे रोजी पत्रकार परिषदेत राज्यसभेसाठी उमेदवारीसाठी अर्ज भरणार असून १० अपक्ष आमदारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील आमदारांनी या गोष्टीला आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे महाराज यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या १० अपक्ष आमदार यादीतील महेश बालदी हे पहिले आमदार ठरले आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. १६) आमदार महेश बालदी यांच्या उरण या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आमदार महेश बालदी यांनी उमेदवारी अर्जावर सही केली. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे, अंकुश कदम, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.