सैया भये कोतवाल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2022   
Total Views |
 
 
 
sharad pawar
 
 
 
 
 
आम्हाला काय करायचे आहे, देवाचे बाप असा नाही तर सैतानाचे रूप असा. तुमचं तोंड कसंही वाजवा. पण ते ‘सेक्युलर’ तोंड नेहमी देवाच्याबाबतच का वाजते? यावर विचार करणे गरजेचे आहे. त्यांच्या या विधानाला ज्या ‘पाथरवट’ कवितेचा संदर्भ दिला जातो. त्या कवितेत ‘साल्यांनो, मी तुमचा बाप आहे’ असे शब्द आहेत का? जर नसतील, तर मग खोटारडेपणाबद्दल कोणती शिक्षा द्यायला हवी? पण छे... इथे ओशाळला खोटारडेपणा. तेरावा बॉम्बस्फोट, कोरेगाव-भीमा दंगलीमधल्या विधानाबद्दल घुमजाव, जेव्हापासून राजकारणात आहेत, तेव्हापासून कोणत्या न कोणत्या पक्ष किंवा व्यक्तिविरोधात केलेला नियोजनबद्ध कावा हे सगळे पाहता खोटारडेपणा हा शब्द अतिशय तकलादू वाटतो. देव, श्रद्धा आणि मुख्यत: हिंदू समाज याबद्दल त्यांना काय वाटत असेल, हे या विधानावरून जगाला समजले. खरेतर श्रद्धा हा असा विषय आहे की, तिथे सगळे तर्क आणि विज्ञान थांबते. माणूस नतमस्तक होतो आणि शरण जातो. ‘साल्यांनो...’ म्हणत देवाचा बाप काढल्याबद्दल जनमाणसात प्रतिक्रिया निर्माण होणे साहजिकच होते. मात्र, ‘देवाचा बाप’ बनण्याची सोडा, ‘देवमाणूस’ बनण्याची पात्रता आहे का, असा प्रतिप्रश्न करायचा नाही. त्याबद्दल विनोद किंवा शाब्दिक प्रहारही करायचा नाही. कारण, संविधानाने बहाल केलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य सध्या हरवले आहे. केतकी चितळेचे उदारहण आहेच. तिने प्रसारमाध्यमांवर ‘शेअर’ केलेली ‘पोस्ट’ वाचून चांगले वाटत नाही मान्य! पण ती तिची अभिव्यक्ती होती. तिची आवड होती. त्यासाठी तिला गुन्हेगार ठरवण्याची प्रक्रिया झाली. २०१४ ते २०१९ काळात महाराष्ट्रात पान जरी झाडावरून पडले, तरी हळवे होत मानवी हक्क, संविधानाने दिलेले हक्क, अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणत डफली घेऊन कलापथक सादर करणारे, राज्यात न घडलेल्या प्रसंगांबाबतही मैलोन्मैल अनवाणी मोर्चा काढणारे, कधीकाळी चमचागिरी करून मिळालेले पुरस्कार निषेध म्हणून परत करणारे हे सगळे आता कुठे गेलेत? आता संविधानाने जनतेला दिलेल्या हक्कांची पायमल्ली होत नाही का? पण ते आता बाहेर येणार नाहीत. जेव्हा भाजपची सत्ता येईल तेव्हा पुन्हा ते बाहेर येतील. ‘संविधान बचाव, संविधान बचाव’ म्हणत प्रचंड प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण सध्या यापैकी ते काहीच करू शकणार नाहीत. कारण, सैया भये कोतवाल...

‘थ्री इडियट्स’चे ‘ऑल इज वेल’
इडियट्स’ सिनेमा आणि त्यातले ‘ऑल इज वेल’ गाणे खूप गाजले होते. आठवा तो सिनेमा. पण छे! सिनेमा आठवायची गरजच काय? आपल्याकडेही ‘थ्री इडियट्स’ सिनेमासारखेच (मी ‘थ्री इडियट्स’ म्हणाले नाही बरं) ‘ऑल इज वेल’ सुरू आहे. खून, बलात्कार, भ्रष्टाचार... नाही, नाही, अजिबात नाही. हे काय गुन्हे आहेत? पालघर साधू हत्याकांड, पूजा-दिशा-सुशांत मृत्यू, मनसुख हिरनची हत्या, गृहमंत्री, कमिशनर आणि अल्पसंख्याकमंत्री तुरूंगात, यात काय वाईट आहे? यात उगीच विचार करण्यासारखे काही नाही. या सगळ्यामुळे महाराष्ट्राचे नाव थोडेच बदनाम होते. १०० कोटींचा घोटाळा असू दे की, कोरोना सेंटरचा भ्रष्टाचार, पवई तलावाजवळ ‘सायकल ट्रॅक’ कायद्याने बंद, आरे, मोनो (मेट्रो) ट्रेनबद्दलही असेच काहीसे झाले. पण या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला काय फरक पडणार आहे आणि जनतेला काही फरक पडला, तर त्याने महाराष्ट्राच्या सत्ताकर्त्यांना काय फरक पडणार आहे. ‘सौ बात की एक बात’ या सगळ्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे, पण तरीही ‘ऑल इज वेल’च बरं का? सध्या जे वातावरण आहे, त्यानुसार महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त नुकसान हनुमान चालीसा म्हणण्याने होत असावे. त्याशिवाय का, नवनीत राणा दाम्पत्याला तुरूंगवास झाला? तसेच इतर कोणत्याही मोठ्या गुन्ह्यांपेक्षा मोठा गुन्हा एकच तो म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांंच्या चुकीला चूक म्हणणे. जर ही चूक केली तर राजसत्ता उलटवण्याचा कट अगदी देशद्रोह म्हणून शिक्षा होऊ शकते. संवैधानिक अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या न्यायाने जो हा नियम मोडेल त्यांचा अनंत करमुसे, नवनीत राणा अगदी केतकी चितळे व्हायला वेळ लागणार नाही. त्यांच्या कोणत्याही कृत्याला ‘अरे वा! छान!! असे हजारो वर्षांत कुणी केले नाही किंवा हेच आपले तारणहार, खरे जाणते राजे आणि मुख्यत: हेच आमचे मरेपर्यंत मुख्यमंत्री किंवा भावी पंतप्रधान असतील, असे म्हणणे हे जनतेचे आद्यकर्तव्य आहे. जनता निष्क्रिय व्यवस्थेने मरत असली, तरी तिने म्हणावे आमचे भाग्य की, यांच्या निष्क्रियतेमुळे आम्ही तीळतीळ मरतोय. तर अशा प्रकारे सगळीकडे आनंदीआनंद सुरू आहे. ‘थ्री इडियट्स’चे (सिनेमाचे म्हणते मी) ‘ऑल इज वेल’ सुरू आहे. ऑल इज वेल...!
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@