मुंबई : घाटकोपरमधील वर्षानगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था बघता स्थानिकांनी मुंबई महानगरपालिकडे वारंवार टाकीच्या दुरूस्ती व देखभालीची मागणी केली होती. मात्र, टाकीचे व्यवस्थापन करणार्या मंडळांकडे असणार्या थकबाकीच्या कारणास्तव ही टाकी ताब्यात घेण्यास मुंबई महानगरपालिकेने नकार दर्शवला होता. स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालिकेने ही टाकी दुरूस्ती व देखभालीसाठी ताब्यात घेण्यास सशर्त परवानगी दर्शवली. मात्र, मंडळांवरील थकबाकीचा भुर्दंड मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांवर लादला असल्याचा आरोप स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला आहे.
“मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची दुरवस्था झालेली आहे. या टाक्या खासगी मंडळांकडून मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेऊन त्याची दुरूस्ती आणि देखभाल करावी,” अशी मागणी स्थानिक रहिवासी वारंवार महापालिकेकडे करत आहेत. अशीच मागणी लक्षात घेता घाटकोपरमधील विक्रोळीतील वर्षानगर पाण्याच्या टाकीच्या देखभालीचा मुद्दा पालिकेने निकाली काढला. मात्र, यावरून नवीन वाद उद्भवला आहे. महापालिकेने वर्षानगर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होणार्या गृहनिर्माण संस्था, तसेच ग्रुप कमिटीला आपल्या नावे आजपर्यंत असलेल्या थकीत पाणी बिलाच्या रकमेचा भरणा करण्याबाबतचे लिखित हमीपत्र भरून देणे बंधनकारक केले आहे. सर्व सोसायट्यांचे हमीपत्र जमा झाल्यावर सक्षम अधिकार्यांच्या पडताळणीनंतर पाण्याच्या टाकीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली जाईल, असे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
मंडळांच्या थकबाकीची ओझे रहिवाशांवर
“मुंबई महापालिकेने आम्हाला दोन पत्र दिले आहे. यामध्ये एक उल्लेख आहे की, मंडळांवर जी थकबाकी आहे ती सर्व गृहनिर्माण संस्थांना मिळून भरायची आहे. ज्यांनी पैसे भरले, त्यांनीही पैसे भरावे, अशी पालिकेची जबरदस्ती आहे. महानगरपालिका या मंडळांच्या थकबाकीची ओझे आमच्यावर लादते आहे. ज्यांची थकबाकी आहे त्याच्याकडून पालिकेने जरूर पैसे घ्यावे, त्याला आमचा विरोध नाही,” असे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.