पंजाबमधील ‘आप’च्या छत्रछायेत खलिस्तानवाद्यांना खतपाणी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2022   
Total Views |
 
 
punjab and delhi cms
 
 
 
 
 
सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन-अडीच महिन्यांमध्येच पंजाबच्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेविषयी चिंता वाटाव्या अशा घटना घडण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा 80च्या दशकातील अराजकतेचे वातावरण निर्माण करून खलिस्तान चळवळीस बळ देण्याचा प्रयत्न होत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. 
 
 
 
 
पंजाब विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक महत्त्वाचे पत्र लिहिले होते. त्यामध्ये चन्नी यांनी खलिस्तानवाद्यांचा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षास जाहीर पाठिंबा असल्याचे नमूद केले होते. बंदी असलेल्या खलिस्तानवादी ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या संघटनेचा कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नू हा आम आदमी पक्षाच्या नियमित संपर्कात असल्याचे आणि २०१७ प्रमाणेच २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षास पाठिंबा देत असल्याचे चन्नी यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिले होते.
 
चन्नी यांनी अरविंद केजरीवाल यांचे खलिस्तानवाद्यांशी संबंध असल्याच्या कुमार विश्वास यांच्या आरोपांचाही उल्लेख पत्रामध्ये केला होता. चन्नी यांच्या पत्रास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर देऊन त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची गंभीर दखल घेण्याचे आश्वासन दिले होते. चन्नी यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांना लिहिलेले पत्र एकवेळ राजकारणाचा भाग असेल, असे मान्य करू. कारण, ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ते पत्र त्यांनी लिहिले होते. मात्र, त्यामध्ये चन्नी यांनी व्यक्त केलेली चिंता ही गंभीर होती. पुढे निवडणुकीमध्ये सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल, भाजप यांना धक्का देऊन आम आदमी पक्ष सत्तेत आला. सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन-अडीच महिन्यांमध्येच पंजाबच्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेविषयी चिंता वाटाव्या अशा घटना घडण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा ८० च्या दशकातील अराजकतेचे वातावरण निर्माण करून खलिस्तान चळवळीस बळ देण्याचा प्रयत्न होत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. कारण, पंजाब अशांत झाल्यास त्याचा थेट फायदा पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ घेणार, हे स्पष्ट आहे.
 
 
किंबहुना, सध्या घडत असलेल्या घडामोडींमध्येही पाकचा हात नसेल, यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. सध्या पंजाबमध्ये ‘ड्रोन’, ‘आरडीएक्स’ आणि ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड्स’ (आरपीजी) यांच्या वापराच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांवर नजर टाकल्यास पंजाबमध्ये सुरक्षेविषयी आलबेल स्थिती नसल्याचे दिसून येते. या आठवड्यात सोमवारी मोहालीच्या सोहाना येथील ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या कार्यालयात तिसर्‍या मजल्यावर स्फोट झाला. हा हल्ला ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’द्वारे करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या कार्यालयात म्हणजे अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणीच जर असा हल्ला होत असेल, तर ते अतिशय गंभीर आहे. या घटनेसोबतच गेल्या काही महिन्यांत पंजाबमध्ये झालेल्या अशाच घटनांचा आढावा घेणे गरजेचे आहे.
 
 
अलीकडेच, हरियाणातील करनाल येथे चार दहशतवादी पकडले गेले, त्यांच्याकडून तीन ‘आयईडी’, एक पिस्तूल आणि 31 काडतुसे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी हे बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यानंतर पंजाबमधील तरनतारनमध्ये चार किलो ‘आरडीएक्स’ जप्त करण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये लुधियाना न्यायालयात दोन किलो ‘आरडीएक्स’चा स्फोट झाला होता. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले होते. या स्फोटाच्या एक महिना अगोदर दि. २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी पठाणकोटमधील भारतीय लष्कराच्या छावणीजवळ स्फोट झाला होता. हा स्फोट ‘ग्रेनेड’चा होता. पंजाबमधील पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराचा मोठा तळ आहे. आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ हा स्फोट झाला. त्यापूर्वी दि. १५ सप्टेंबर, २०२१ रोजी जलालाबादमध्ये मोटारसायकल स्फोट झाला होता.
 
 
या प्रकरणात प्रवीण कुमार नावाच्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो फाजिल्का जिल्ह्यातील धर्मुपुरा गावचा रहिवासी होता. हे गाव भारत-पाक सीमेपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. गेल्यावर्षी दि. १३ ऑगस्ट, २०२१ रोजी अमृतसरच्या गजबजलेल्या भागात एक हँडग्रेनेड सापडला होता. बॉम्ब निकामी पथकाने तपासानंतर हँडग्रेनेड निकामी केले होते. अमृतसर पोलिसांनी हँडग्रेनेड आणि टिफीन बॉक्स ‘आयइडी’ जप्त केला होता. त्याद्वारे मोठा स्फोट घडविण्याचा कट पोलिसांनी हाणून पाडला होता.
 
पंजाब निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौर्‍यावर गेले असताना पाकिस्तानी दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे पुरवू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या अहवालात ‘ड्रोन’वर लक्ष ठेवण्याच्या विशेष सूचना दिल्या होत्या. त्यावेळी एडीजीपी जी. खुद्द नागेश्वर राव यांनी पंतप्रधानांच्या दौर्‍यापूर्वी ‘ड्रोन’च्या धोक्याचा सामना केल्याची कबुली दिली होती. भारत-पाकिस्तान सीमेवर २०२१ साली ५९ ‘ड्रोन’ हालचाली नोंदवण्यात आल्या होत्या. पंजाबमध्ये गेल्या सव्वा वर्षांत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेही सापडण्याच्या घटना घडल्या आहेत. पंजाब सीमेवरून एक ‘सब मशीन गन’, एक ‘फॉल रायफल’, एक ‘एकेएम रायफल’, एक ३०३ बंदुक, एक ७.५ ‘सेगा रायफल’, एक ‘पीएमजी एमके रायफल’ जप्त करण्यात आली आहे. ही हत्यारे पाठविण्यासाठी प्रामुख्याने ‘ड्रोन’चा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे लावलेले ‘ड्रोन’ भारतीय सीमेमध्ये विशिष्ट ठिकाणी पाडले जाते. त्यानंतर ‘ड्रोन’सोबत पाठविण्यात आलेली शस्त्रास्त्रे, स्फोटके, अमली पदार्थ व अन्य साहित्य येथील हँडलर ताब्यात घेतात. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दल अर्थात ‘बीएसएफ’ची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला होता.
 
पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तान चळवळीस हवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. वर्षभरापूर्वी दिल्लीच्या सीमांवर बसविण्यात आलेले कथित शेतकर्‍यांचे आंदोलन, तेथील आंदोलकांना असलेला खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा, २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर करण्यात आलेला हल्ला आणि राष्ट्रध्वजाचा अवमान आदी बाबी या भडका उडविण्यासाठीच होत्या, अशी शंका आता घडणार्‍या घटनांवरून येते. केंद्र सरकारने या घटना अतिशय संवेदनशीलतेने हाताळल्याने अप्रिय घटना टळल्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या शासकीय निवासस्थानी देश आणि परदेशातील शीख समुदायाच्या व्यक्तींना आमंत्रित केले असतानाच पंजाबमध्ये पतियाळामध्ये खलिस्तानवाद्यांनी दंगल घडविणे, हा नियोजनबद्ध कटच असल्याची शंका घेण्यास वाव आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे पोस्टर चिकटविणे आणि खलिस्तानी झेंडे लावणे हीदेखील भारतासाठी गंभीर घटना आहे.
 
या सर्व घटनांच्या मुळाशी ‘सीख्ज फॉर जस्टीस’चा नेता गुरपतवंत सिंग पन्नू हा कुठे ना कुठे गुंतलेला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षास पाठिंबा देण्यासाठी यानेच पुढाकार घेतला होता. पन्नू या भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी असून, सध्या तो अमेरिकेत राहून खलिस्तानसमर्थनाची चळवळ चालविण्याचे काम करतो. त्याच्या ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या संघटनेद्वारे भारतविरोधी प्रचार करणे आणि भारतविरोधी कारवायांना मदत करण्याचे काम तो करतो. यासाठी त्याला पाकच्या ‘आयएसआय’च्या पाठिंबा असल्याचा यंत्रणांचा आरोप आहे. केंद्र सरकारने दि. १ जुलै, २०२० रोजी त्याला ‘युएपीए’ कायद्यांतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे जुलै २०२० मध्येच पंजाब पोलिसांनी त्याच्याविरोधात अमृतसर आणि कपुरथळा येथे देशद्रोहाचाही गुन्हा दाखल केला आहे.
 
 
त्याचवेळी सुरक्षा यंत्रणांच्या शंकेनुसार, ‘आयएसआय’ने पंजाब आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी ‘लष्कर-ए-खालसा’ असा नवा गट तयार केल्याचे पुढे आले आहे. या संघटनेत सहभागी झालेल्यांना ‘आयएसआय’ अफगाणी दहशतवाद्यांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. हेच अफगाणी दहशतवादी ‘आरपीजी रॉकेट लाँचर’ चालविण्यात तरबेज आहेत. त्यामुळे मोहाली येथे झालेला हल्ला आणि ‘आयएसआय’ यांचा थेट संबंध असल्याचे यंत्रणांना संशय आहे.
 
मात्र, पंजाबमध्ये पुन्हा एकदा ८० च्या दशकाप्रमाणे अस्थिर परिस्थिती निर्माण होणे, हे परवडणारे नाही. कारण, पंजाब अस्थिर म्हणजे संपूर्ण देश अस्थिर; हे देशाने यापूर्वी एकदा अनुभवले आहे. त्यामुळे ‘पंजाब विरुद्ध भारत’, ‘खलिस्तान विरुद्ध भारत’, ‘शीख विरुद्ध हिंदू’ अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जातीने कार्यरत असल्याचे त्यांच्या गेल्या काही महिन्यांतील कार्यक्रमांद्वारे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या केंद्र-राज्य संघर्ष निर्माण करण्याच्या आणि प्रांतवादास खतपाणी घालण्याच्या राजकारणाकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@