चित्रपट प्रदर्शित तरीही ‘धर्मवीर’ उपेक्षितच!

    13-May-2022
Total Views |
 
 
 
dharmaveer
 
 
 
 
 
ठाणे: शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनपट असलेला ‘धर्मवीर’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, धर्मवीर दिघे यांनीच लहान मुलांसाठी वाचविलेले आणि ठामपाने त्यांच्याच नावाने विकसित केलेले उद्यान मात्र गेल्या १८ वर्षांपासून ‘टाळेबंदी’मध्ये असल्याचे समोर आले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने विकसित केलेले हे उद्यान लहान मुलांसाठी खुले करावे, या मागणीसाठी मनसेचे संतोष निकम यांनी सुमारे ४५ वेळा ठाणे महापालिकेशी पत्रव्यवहार केला.
 
मात्र, त्याकडे पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निकम यांनी केला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील इमारत क्र. ५४, ५५ दरम्यान उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर काही गावगुंडांनी अतिक्रमण केले होते. ही बाब आनंद दिघे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा भूखंड वाचवून त्या ठिकाणी मुलांसाठी उद्यान विकसित करण्याचे आदेश दिले होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर २०१४ मध्ये या भूखंडावर एक कोटी रुपये खर्च करून उद्यान विकसित करण्यात आले.
 
या मैदानाला ‘धर्मवीर आनंद दिघे,‘ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे संतोष निकम यांनी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दि. १९ जुलै, २०१८ रोजी या उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याचा ठराव पारीत करण्यात आला. मात्र, या उद्यानाचे लोकार्पणच करण्यात आलेले नाही. या उद्यानाचे लोकार्पण करावे, या मागणीची सुमारे ४५ स्मरणपत्रे संतोष निकम यांनी ठामपा प्रशासनाला दिली आहेत. तरीही, शिवसेनेची सत्ता असलेल्या ठामपाने या उद्यानाचे लोकार्पण केलेले नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्च करूनही हे उद्यान अडगळीत पडले आहे.