वैदिक परंपरा आणि साधना - भाग-३४

    12-May-2022
Total Views |
 
 

ved
 
 
 
कोणत्याही विषयाशी तद्रूप झाल्याशिवाय त्या अवस्थेचा अनुभव वा ज्ञान होत नसते. योगी आपले चित्त इच्छित विषयाशी एकरूप करून ज्ञान मिळवितो. भक्त प्रत्येक वस्तुमात्राला परमेश्वर समजून त्या अवस्थेला एकरूप म्हणजे भक्त असतो. दोन्ही गोष्टींचा परिणाम एकच. या अर्थाने प्रत्येक योगी भक्त असतो, तर प्रत्येक भक्त योगी असतो. एवढे मात्र खरे की, वैराग्याशिवाय योग नाही की भक्ती नाही व योगभक्तीशिवाय ज्ञान नाही. म्हणून ज्ञानेश्वरांना भक्त योगी म्हटले आहे. ज्ञान ही अवस्था आहे. देह नव्हे. तद्वत् मुक्ती ही तर अवस्थासुद्धा नाही. सर्व अवस्थांचा शेवट म्हणजे मुक्ती होय.
 
 
अध्यात्माची आवश्यकता
 
 
सध्या जग स्वैराचाराला प्राधान्य देत असल्याने असले स्वैराचारी वृत्ती लोक, असा प्रश्न उपस्थित करू शकतात की अध्यात्म वगैरेची आवश्यकता काय? अध्यात्म वगैरे विषय रिकाम्या मनाचे अनावश्यक उद्रेक होत. आज जग वैज्ञानिकदृष्ट्या कितीतरी पुढे जात आहे. अनेक नवीन शोध लावून मानवी जीवन अधिकाधिक सुखी करावे. अध्यात्म वगैरेसारख्या खुळचट कल्पनांमध्ये गुंगून आपले जीवन व्यर्थ का घालवावे? केवळ जड जीवन जगणार्‍यांच्या दृष्टीने वरील विचार बरोबर आहेत. पण, एक गोष्ट ते साफ विसरतात की, भोग उपकरणांचे शोधक आयुष्यभर स्वैर भोगाला विन्मुख होऊन आपले सर्व जीवन एका विशिष्ट शिस्तीत आणि त्यागमय वृत्तीने घालवितात. सर्वांच्या सुखाकरिता वैज्ञानिक वा समाजसेवक संयमी व कष्टी जीवन जगत असतो. स्वच्छंदी जीवन जगण्यास काही लोकांच्या त्यागी व संयमपूर्ण जीवनाची नितांत आवश्यकता असते. त्यागाशिवाय व संयमाशिवाय जीवन परिपूर्णच होत नसते. आपण साध्या व्यवहारात पाहतो की, एक बीज जमिनीत स्वत:ला गाडून नष्ट होते. त्यापासून वृक्ष निघतो. वृक्षाला अनेक बिया वा धान्य लागते. त्यापैकी अधिकांश धान्य खाण्यात जात असले, तरी काही धान्य, बीज म्हणून स्वतःचे आत्मसमर्पण करण्याकरिता वेगळे काढून ठेवावे लागते. समृद्धी वा सुख सुरुवातीच्या संयमात अथवा शिस्तीत असते. सर्वच स्वैराचारी जीवन जगायला लागले तर समाज चालणार कसा, असा समाज लवकरच संपुष्टात येईल. पाश्चात्य देशांकडे पाहिल्यास याची प्रचिती येईल. भोगलालसा, स्वैराचार आणि वैज्ञानिक जीवन जगण्याची हाव यादृष्टीने भारतीय पाश्चिमात्यांपेक्षा, कमीत कमी ५० वर्षेतरी मागे आहेत. आज पाश्चिमात्य जीवन भकास व अर्थहीन झाले आहे. भोग उपकरणे विपुल असताना तेथील तरुण-तरुणी विचित्र पद्धतीने राहतात. भोगउपकरणांशिवाय मनाला समाधान मिळवून देणारा कोणता सहज पर्याय आहे, याचा शोध घेत ते जगभर वेड्यासारखे फिरत आहेत. चरस, गांजा, अफू इ. शरीर रोगग्रस्त व नष्ट करणारे पदार्थ सेवन करून ते मृत्यूला लवकर पाचारण करतात. जगायचेच कशाला, असा आज त्यांच्या समोर भीषण प्रश्न आ वासून उभा आहे. तेथे शेकडा ४५ लोक वेडे, अर्धवेडे आणि पिसाट आहेत असे म्हणतात. असले जीवन भोगालालसेतूनच निष्पन्न झाले असल्यामुळे ते उत्तम आहे, असे कोणी सुजाण म्हणणार नाही.सहस्रावधी तरुण-तरुणी आज भारतात येऊन भारतीय तत्त्व आणि साध्या जीवनाकडे अधिकाधिक आकृष्ट होत आहेत. अध्यात्माची आवश्यकता त्यांना अधिक वाटत आहे, असे असताना अध्यात्माची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न उपस्थित करणे वेडेपणाचे ठरेल. प्रख्यात वैज्ञानिक डार्विनने असा उपयुक्त सिद्धांत मांडला की, मानवी शरीर प्रकृतीतील उत्क्रांतीची उच्च निष्पत्ती होय. ‘अमिबा’ नामक एकपेशीय प्राण्यावर संस्कार होत होत अगणित काळातून त्यापासून ‘हायड्रा’ नामक बहुपेशीय प्राणी, ‘हायड्रा’वर पुन्हा उच्च संस्कार ग्रहण होऊन त्यापासून ‘जेली’ मासा, ‘जेली’ माशापासून उच्च मासा, माशापासून बेडूक, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, माकड, अर्धमानव व मानव झाला. आता आणखी एक प्रश्न विचार करण्यासारखा असा की, जर आदिकालापासून सर्वच अमिबांवर संस्कार होत गेले, तरी आज तेच असंस्कृत अमिबा असंख्य का दिसावे? याचा स्पष्ट अर्थ असा की, उत्क्रांतीतून प्राप्त सुसंस्कारांना ग्रहण करण्याची क्षमता वा इच्छा ज्या अमिबांची नव्हती, ते इतक्या प्रचंड काळातून जगत असतानासुद्धा स्वत:ला उत्क्रांत न करता, आज अतिशय निम्न परावलंबी, असंस्कृत, निरर्थक जीवन जगत आहेत. जे अमिबा सुसंस्कारांना ग्रहण करते झाले, ते उत्क्रांतीचा आदर्श जीवनाचा संथ प्रवाह तरून उच्च अशा मानव अवस्थेत आले आणि जे अमिबा स्वैर, भोगी, स्वच्छंदी राहिले, ते कोट्यवधी वर्षांतूनही आज तेच ते व्यर्थ जीवन जगत आहेत. घाण व पराधीनता हेच त्यांचे जीवन होय. कोणताच विचारी माणूस, मग तो कितीही स्वैर वा असंयमी जीवन जगो. असले असंस्कृत अमिबा जीवन जगण्याची इच्छा करणार नाही. त्याला उच्च मानवी जीवनाचाच आनंद हवा. पण, हे उच्च मानवी जीवन त्याला कोट्यवधी वर्षांच्या सततच्या उच्च संस्काराशिवाय प्राप्त झाले नाही, हे स्पष्ट आहे. असे असता आता अत्यंत उच्च अवस्थेत आल्यावर स्वच्छंदी, स्वैर जीवन जगणे म्हणजे सबंध इमारत बांधून उच्च मनोर्‍यावर विराजमान व्हायचे आणि त्या इमारतीचा पायाच खणून काढण्यासारखे आहे. संयम व उच्च संस्कार ग्रहण करण्याची क्षमता वाढविणे, म्हणजेच अध्यात्माची सुरुवात होय. ‘अध्य+आत्म’ म्हणजे स्वतःला (आत्मावस्थेला) जाणण्याची इच्छा व प्रक्रिया होय. केवळ पुस्तके वाचल्याने अध्यात्म गवसत नसते. त्याप्रमाणे संस्कार ग्रहण करण्याची वागणूक हवी. मानव व्हायला अगणित काळ लागतो, तर पशू व्हायला एक क्षणही लागत नाही. आम्हाला तुमचे मानवी जीवन जगायचे नाही, आम्ही पशु जीवन जगू असा उन्माद करणार्‍यांना समाजाने ताळ्यावर आणण्याचा अधिकार आहे. रोगग्रस्त शरीरात असंख्य विद्रोही जंतूंचा प्रादुर्भाव होत असतो. शरीर पूर्ववत् निरोगी करण्यास औषध योजना करून असल्या शरीरघातक जंतूंचा नायनाट करावा लागतो. उच्च संस्कारयुक्त मानव समाज टिकवण्याकरिता स्वैर, असंस्कृत विचारांच्या जीवांना ताळ्यावर आणणे समाजाचे आवश्यक कर्तव्यच आहे. असला कर्तव्याचा आग्रह म्हणजेही अध्यात्मच होय. याबाबतीत संत तुकाराम म्हणतात, “तुम्हाला धार्मिक अध्यात्मिक जीवन जगायचे काय? मग त्याकरिता प्रथम पाखंड्यांचे खंडन करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन!”
- योगिराज हरकरे