विद्यार्थी घडविणारा क्रीडा शिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2022   
Total Views |
 
 
mansa
 
 
 
 
 
मायेने वाढविलेली बकरी विकून वडिलांनी ७०० रुपये शिक्षणासाठी दिले. आज त्याच शिक्षणाच्या बळावर त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना क्रीडासमृद्ध केले. जाणून घेऊया भंडारा जिल्ह्यातील दिलीप पवार यांच्याविषयी...
 
 
यवतमाळ जिल्ह्यामधील पुसद तालुक्यातील आरेगावी जन्मलेल्या दिलीप बन्सी पवार यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळेत झाले. आई धुरीबाई आणि वडील बन्सी हे कोरडवाहू शेती करत. खेळांविषयी आवड असणारे साखरे गुरूजी दररोज शाळा सुरू होण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतर मुलांचा मैदानी खेळांचा सराव करून घेत. त्यामुळे बन्सी यांचा खेळाकडे ओढा वाढला. लोकहित विद्यालयात आठवी इयत्तेचे शिक्षण आणि नंतर अकोल्यातील रविंद्रनाथ टागोर विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. दहावीपर्यंत दिलीप यांनी केंद्र आणि तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला.
 
बारावीनंतर त्यांनी पुसद येथे ‘बीपीएड’साठी प्रवेश घेतला. यानंतर नागपूर विद्यापीठात ‘एमपीएड’साठी प्रवेश यादीत त्यांचे नाव आले. घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असल्याने कुटुंबीयांना शिक्षणासाठी नागपूरला जाण्याइतके पैसे कुठून आणणार, असा प्रश्न पडला. मात्र, दिलीप यांची जिद्द कायम होती. अखेर वडील बन्सी यांनी मायेने वाढविलेली एक बकरी ७०० रुपयांना विकली आणि ते पैसे दिलीप यांना शिक्षणासाठी दिले. ते ७०० रुपये घेऊन दिलीप नागपूरला आले आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. एका खासगी हॉस्टेलमध्ये दिलीप राहू लागले. शिष्यवृत्तीच्या पैशातून ते हॉस्टेलचे भाडे देत.
 
 
पैसे वाचविण्यासाठी दिलीप यांनी अनेक गोष्टी केल्या. खानावळ बंद असल्यास ते खिचडी बनवून खात. कित्येक रात्री उपाशीपोटी काढल्या. कधी एकवेळ जेवण केले. स्वतःच्याआजीचे निधन झाले हे पोस्टाने आलेल्या पत्राद्वारे कळल्यानंतरही केवळ तिकीटाला पुरेसे पैसे नाहीत म्हणून ते घरी जाऊ शकले नाही. याकाळात त्यांनी अनेक अपमान पचवले. आपली गरिबीच आहे, तर दुसर्‍यांना बोलून काय होणार, असा विचार करून दिलीप कुणाचे बोलणे फारसे मनावर घेत नसत. आपल्या गरिबीची जाणीव ठेवून त्यांनी ‘एमपीएड’ अतिशय उत्तम गुण मिळवत पूर्ण केले. नंतर दीड वर्षं दिलीप नोकरीच्या शोधात निघाले. मात्र, मोठमोठ्या ‘डोनेशन’मुळे त्यांनी अनेक नोकरीचे प्रस्ताव नाकारले. ‘एमपीएड’नंतर नोकरी न मिळाल्याने त्यांनी समाजशास्त्रात ‘बीए’ केले. यादरम्यान, वृत्तपत्रात जाहिरात पाहिल्यानंतर ते मुलाखतीला गेले आणि यशस्वीदेखील झाले. २००२ साली वलनी येथील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून रूजू झाले. जवळपास एक वर्ष खोली भाड्याने घेऊन त्यांनी नोकरी केली. त्यानंतर एका वर्षातच त्यांची कोंढा येथे बदली झाली.
 
 
मामाच्या मुलीशीच लग्न झाल्यानंतर दिलीप यांनी कोंढा येथे बस्तान बांधले. शाळेत रूजू झाल्यावर दिलीप यांना समजले की, शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाविषयी तितकीशी आवड नाही. त्यामुळे दिलीप यांनी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करत दररोज सकाळ आणि संध्याकाळ मैदानी खेळांचे धडे देण्यास सुरुवात केली. दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सहकार्याने त्यांनी विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. त्यासाठी ते सरावापासून ते अगदी आर्थिक मदतीपर्यंत परिश्रम घेत. अ‍ॅथलेटिक्स, कराटे, मल्लखांब, योगा अशा अनेक क्रीडा प्रकारात दिलीप यांच्या विद्यार्थ्यांनी अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. उत्तम आणि यशस्वी खेळाडू घडविण्यासाठी झटणार्‍या दिलीप यांचे काम पाहून जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी त्यांच्यावर पवनी तालुका क्रीडा संयोजकपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे दिलीप यांना शाळेबरोबरच पूर्ण तालुक्यातील क्रीडा उपक्रम राबविण्याची संधी मिळाली.
 
स्वतः दिलीप यांनी ग्वालियर आणि पुण्यात ‘मास्टर ट्रेनर कोर्स’ही पूर्ण केला आहे. संस्थेने त्यांना कामटी येथे ‘एनसीसी’च्या प्रशिक्षणासाठी पाठविले. तीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर दिलीप यांनी शाळेत सुरुवातीला ५० जणांचा ट्रुप (ग्रुप) तयार केला, जो आता १०० मुलांवर जाऊन पोहोचला आहे. दिलीप यांचे अनेक विद्यार्थी सैन्यदल, पोलीस, नौदलात रूजू झाले आहेत. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जिभकाटे हेदेखील शाळेत क्रीडापटू घडविण्यासाठी आर्थिक मदतीसह शक्य तितकी मदत करतात. प्राचार्य देवानंद चेटुले यांचेही क्रीडाविषयक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन मिळते.
कोरोनानंतर विद्यार्थ्यांचा खेळाशी संबंध तुटला होता. मात्र, दिलीप यांनी पुढाकार घेत तब्बल ५७० विद्यार्थ्यांना खेळाचे धडे दिले.
 
 
 
क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण अशा अनेक कारणांसाठी दिलीप यांना अनेकदा घरापासून लांब राहावे लागते. त्यावेळी पत्नी सिंधू लहान मुलांसह कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मुलांनी आवडीचे शिक्षण घ्यावे. मी अभ्यासाला कधीही घाबरलो नाही. रात्ररात्रभर अभ्यास करायचो. खेळाचा सराव करायचो. मात्र, मी गरिबीला घाबरत होतो. पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे कधी उपाशी राहून, तर कधी मित्रांची मदत घेऊन वाईट दिवस काढले, असे दिलीप सांगतात. बकरी विकून मिळालेल्या पैशात आपले स्वप्न साकार करण्यासाठी नागपूरची वाट पकडणार्‍या दिलीप यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला आरसा दाखविला. त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@