संदीप देशपांडेंना अटक होणार?

जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १७ मे रोजी

    11-May-2022
Total Views |

sd
 
 
 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते-प्रवक्ते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनसे नेत्यांच्या जामीन अर्जावर मंगळवार, दि. १० मे रोजी होणारी सुनावणी लांबणीवर पडल्याने संबंधितांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायाधीश उपस्थित राहू न शकल्याने या दोन्ही नेत्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण होऊ शकली नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी आता मंगळवार, दि. १७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे आता संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना देशपांडे यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. त्यावेळी हे दोघेही आपल्या खासगी वाहनातून भरधाव वेगात निघून गेले. यावेळी गाडीचा धक्का लागून एका महिला पोलीस कर्मचार्‍याला इजा झाल्याच्या प्रकरणावरून संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्यावतीने मनसेच्या दोन्ही नेत्यांचा शोध घेण्यात येत असून, आता जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते.