जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2022   
Total Views |

mulund
 
 
 
 
 
 
 
 
‘इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड’चे सध्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. मुलुंड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे योगदान महत्त्वाचे आहे. ‘शक्तिमान महिला सर्वशक्तिमान जगासाठी’ असा संदेश घेऊन समाजासाठी सदैव कार्यरत असलेल्या या संस्थेत ईश्वरसेवा मानून कार्य करणार्‍या जवळजवळ तीन पिढ्यांतील मातृशक्ती सामील आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या देदीप्यमान कारकिर्दीचा घेतलेला आढावा.
 
 
 
 
संघटन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो... भला हो जिसमे देश का, वो काम सब किये चलो....
देश आणि समाजाच्या कल्याणासाठी संघटितपणे एकत्रित येत काम करणार्‍या संस्था देशाचे वैभवच असतात. त्यापैकीच एक संस्था आहे ‘इनरव्हिल क्लब ऑफ मुलुंड.’ ही संस्था ‘इंटरनॅशनल इनरव्हिल क्लब’शी संबंधित आहे. ‘इंटरनॅशनल इनरव्हिल’च्या १०३ देशांमध्ये चार हजार क्लब असून त्यामध्ये लाखो महिला सक्रियरित्या सभासद आहेत. त्यापैकी भारतात सर्वात जास्त क्लब आणि सर्वात जास्त महिला सदस्य कार्यरत आहेत. अशा जागतिक स्तरावर काम करणार्‍या संस्थेची एक शाखा आहे, ‘इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड.’ ही संस्था सुरुवातीपासूनच तन-मन-धन अर्पून समाजासाठी काम करतेच. सध्या मुलुंड संस्थेच्या कारकिर्दीला ५० वे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने संस्थेने विशेष आणि अतिशय मौल्यवान उपक्रम राबवत आहे. प्रांत आणि भाषाभेद लंघून मुलुंडमधील सद्विवेकी आणि सद्विचारी अशा १०० पेक्षाही जास्त महिला या संघटनेत सामील आहेत. सध्या या संस्थेच्या अध्यक्षा आहेत मीनाक्षी खोसला. एक अतिशय हरहुन्नरी आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व. प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देत मीनाक्षी यांनी कर्करोगावर मात केली. त्यानंतर उर्वरित आयुष्य समाजकल्याणासाठी वाहण्याचा त्यांनी पणच केला. गरजूंना वेळेत आणि योग्य मदत मिळावी, यासाठी ’इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड’च्या माध्यमातून त्या अहोरात्र कार्यरत असतात. कितीही खर्च असू दे, त्यासाठी निधी उभा करण्याचे शिवधनुष्य त्या संघटनेच्या माध्यमातून लिलया पेलतात. कुटुंबामध्ये जसे ज्येष्ठांचा सन्मान आणि मार्गदर्शन असतेच. तसेच या क्लबमध्येही माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्त्या नवीन पदाधिकारी आणि सभासदांना मार्गदर्शन करत असतात. अनुसयाबेन शहा, सुनीताताई देवधर, डॉ. कनकलता सक्सेना, भानुबेन, डॉ. जयंती लालका अशा मान्यवर मातृशक्ती संस्थेला नेहमीच मार्गदर्शन, सहकार्य करतात. या सगळ्या मार्गदर्शिका लक्ष्मीच्या वरदहस्ताने आणि अन्नपूर्णेच्या संपन्नतेने ’इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड’च्या कार्यात सढळहस्ते सहकार्य करतात. सध्या अनुसूयाबेन शहा या संस्थेच्या गुजराती वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांसाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करतात. माधुरी शेंबेकर या मराठी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांसाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करतात. या संस्थेत सभासद असणार्‍या प्रत्येक महिलेचे स्वतंत्र असे कार्यविश्व आहे. देश आणि समाजाबाबत जाज्वल्य भक्तिभाव त्यांच्या मनविचारात सदैव दीप्तिमान आहे. त्यामुळेच प्रत्येकजण ‘इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड’शी तर संबंधित आहेच. त्याशिवाय त्यांचे आणखीही कार्यक्षेत्र विस्तारित आहे आणि ते कार्यक्षेत्र पुन्हा देश आणि समाजाच्या वैभवाशीच निगडित.
 
 
 
 
मला आठवते, २०२० साली कोरोनाचा उच्छाद होता. या काळात माझ्या एका किन्नर मैत्रिणीने संपर्क केला. ती आजारी होती. अंथरूणावरच होती. तिच्या पायाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. चार लाख रूपये खर्च होता. तिच्याकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळे तिच्या शस्त्रक्रियेसाठी निधी जमवत होते. ती ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथेच निधी द्या, असे आवाहन केले. ठाण्याचे रा. स्व. संघाचे सुनील ढेंगळे आणि स्वयंसेवक तसेच ‘सेवा सहयोग’च्या पदाधिकरी आरती नेमाने यांनी सहकार्य केले. पण ‘इनरव्हिल क्लब’च्या मीनाक्षी खोसला यांच्याकडून माधुरी शेंबेकर यांनी संपर्क केला. सगळी माहिती विचारून घेतली. (माधुरी शेंबेकर या मातृशक्ती कोकणप्रांतच्या पदाधिकारी असल्याने चांगल्या परिचयाच्या होत्याच.) त्यानंतर काही दिवसांतच ‘इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड’च्या पदाधिकारी त्या किन्नर भगिनीच्या वस्तीत तिला भेटायला गेल्या. तिची विचारपूस केली. तिला शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली. त्या किन्नर भगिनीचे मन आणि डोळे आपुलकीने भरून आले. ‘इतक्या श्रीमंत घरच्या, शिकल्या-सवरलेल्या महिला मी आजारी म्हणून मला बघायला आल्या’ म्हणत आजही तिच्या डोळ्यांत आनंद मावत नाही. तिची शस्त्रक्रिया झाली आणि ती आता बरी आहे. दुसरी घटना, कोरोनाचाच काळ होता. ‘मुलुंड डम्पिंग ग्राऊंड’ परिसरामध्ये कचरा वेचणार्‍या महिलांची परिस्थिती खूपच बिकट होती. पावसाळ्याचे दिवस होते. या महिलांमधील काहीजणींना छत्री हवी होती. सध्या काय काम चालू आहे, यावर ‘इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड’च्या भगिनींशी सहज चर्चा केली. त्यामध्ये या कचरावेचक भगिनींच्या आयुष्याबद्दल बोलले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी संपर्क करत सांगितले की, मुलुंडमध्ये कचरा वेचणार्‍या ५० भगिनींना एकत्रित करता येईल का? कोरोना काळात कुठे सभागृह मिळणार? तर यावर तोडगा काढत अनुसयाबेन शहा यांनी सांगितले की, आमच्या सोसायटीच्या आवारात जमूया. एक दिवस ठरवून मुलुंडमधील 50 कचरावेचक भगिनींना तिथे एकत्रित केले. त्यांचा छान पाहुणचार करण्यात आला. या महिलांना २००-३०० रूपयांची छत्री हवी होती. मात्र, संस्थेने त्यांना अतिशय किमती आणि सुटसुटीत रेकनकोट वितरित केले. त्यांनाच नव्हे, तर संस्थेच्या प्रत्येक सदस्य महिलेने आपापल्या घरी घरकाम करणार्‍या महिलांसाठीही आवर्जून रेनकोट घेतले. थोडक्यात सांगायचे तर हेच की, ‘इनरव्हिल क्लब ऑॅफ मुलुंड’च्या पदाधिकारी महिला या हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून एक गृहितक असते की,श्रीमंत घरच्या महिलांना काय मजाच मजा. दिमतीला नोकरचाकर. किटी पार्टी आणि सगळी भौतिक सुखं हाजीर. पण या महिला या सगळ्या गृहितकांना छेद देतात. या सगळ्या जणी ‘रोट्रॅक क्लब’शी संबंधित असणार्‍या. या महिलांचे मला नेहमीच कौतुक वाटते. कारण, सगळ्याच अतिशय सधन घरच्या. गरिबी किंवा आर्थिक मजबुरी यांच्याशी त्यांचा संबंध तसा आलेलाच नाही. त्यांनी मनात आणले तर आयुष्य छान शौक आणि आरामात व्यतित करू शकतात. पण त्यांनी आपल्या आर्थिक सधनतेचा आपल्या उच्चशिक्षणाचा आणि आपल्या वेळेचा उपयोग समाजासाठी केला. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमांकडे पाहिल्यावर वाटते की, खरेच महिला ही अष्टभुजादेवीच आहे. ती आदिशक्ती आहे. ज्या अष्टभुजांनी लोकांचे कल्याण करते, त्याच शक्तीने या महिला उपक्रम राबवतात.
 
 
 
 
यामध्ये गरजूंना विविध माध्यमांतून सहकार्य तर आलेच. जसे आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी मदत. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि प्रशिक्षण, महिलांच्या आरोग्यासंदर्भात उपचार शिबीर, विविध आजारांबाबत मार्गदर्शन आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीर, कुटुंब नियोजनासंदर्भात मार्गदर्शन, ‘मायक्रो फायनान्स’च्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करणे; त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे; शिलाई मशीन्स, टेलिफोन बूथ आदींची व्यवस्था करून देणे; वृद्धाश्रमांमध्ये प्रत्येक सण-उत्सव साजरा करणे; वृद्धाश्रमामधील ज्येष्ठांना गरजेच्या सर्व वस्तू वितरित करणे, त्यामध्ये अन्नधान्य कपडे फ्रीज, कपाट, भांडी आणि मुख्यत: त्यांच्यासाठी वेळ आणि प्रेम देणे; अनाथाश्रमामधील मुलांच्या विकासासाठी काम करणे, दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या वैयक्तिक विकासासाठी कार्य करणे, या कार्यातही सातत्य आहे, नियोजन आहे. पालघर आणि शहापूर येथील दोन गावांसांठी समाज हॉल बांधण्याचे कामही संस्थेने केले. खडवली येथील पाड्यांमध्ये ‘सौरउर्जेची’ची व्यवस्था करून दिली. ‘केईएम’सारख्या रुग्णालयात मानवी दुधाच्या सुरक्षिततेसाठी फ्रीज, मुलुंडच्या सावरकर रुग्णालयात तर विविध रुग्णोपयोगी व्यवस्था, हिरामोंगी रुग्णालयामध्ये दोन व्हेंटिलेटर्स, मुलुंडच्या योगी हिल परिसरात ज्येष्ठांसाठी उद्यान आणि ‘सौरउर्जेची’ व्यवस्था करणे, ‘थॅलेसिमिया’च्या रुग्णांसाठी रूग्णवाहिका, विविध माध्यमांतून कर्करोगग्रस्तांसाठी निधींची उपलब्धतता करून देणे, एक ना अनेक उपक्रम संस्थेने केले आहेत. यामध्ये मुलुंड परिसरातील तीन हजारांपेक्षा जास्त बालकांचे लसीकरण, हजारो गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण, शेकडो कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबांना आधार दिला. त्याचप्रमाणे दिव्यांग, त्यातही दृष्टिहीन विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे कार्य लक्षणीय आहे. संस्था पर्यावरणसंदर्भातही अनेक उपक्रम राबवते. ‘मोक्षम् काष्ठम्’ एक असाच उपक्रम. स्मशानामध्ये अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड वापरले जाते. संस्थेच्या प्रबुद्ध महिलांनी विचार केला की, या लाकडाऐवजी गोमय शेणींचा वापर केला तर? गोमातेच्या शेणाचा असाही उपयोग होईल, गवरी बनवणार्‍या महिलांच्या हाताला काम मिळेल आणि लाकडाचा अत्याधिक वापर टाळला जाऊन पर्यावरणपूरकतेसाठी कार्य होईल. यासंदर्भात संस्था ठिकठिकाणी जागृती करत असते. मुलुंड स्मशानभूमीमध्ये या उपक्रमाला समर्थनही मिळाले आहे.
 
 
 
 
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा...
असे संतवचन आहे. त्यादृष्टीने पाहायचे तर ‘इनरव्हिल क्लब ऑफ मुलुंड’ म्हणजे स्त्रीशक्तीमधील संतत्वाच्या भावनांचे देदीप्यमान विश्वच म्हणता येईल.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@