ये रिश्ता क्या कहलाता है? : मोहित कंबोज

मोहित कंबोज यांच्याकडून मुख्यमंत्री लक्ष्य

    10-May-2022
Total Views |

mohit
 
 
 
मुंबई : दाऊदशी संबंधीत असल्याने माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सोमवारी चौकशी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार मोहित कंबोज यांनी सुहेल खंडवानी यांच्याबरोबरची छायाचित्रे ट्विट करून ये रिश्ता क्या कहलाता है ? असा सवाल कंबोज यांनी विचारला आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईतील व्यक्तींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सोमवारी धाडसत्र सुरु झाले आहे. त्यात माहीमी दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. हे तेच प्रकरण आहे ज्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली होती.
 
 
 
मोठ्या कारवाया होण्याची शक्यता!
 
 
 
राज्याचे मंत्री आणि दाऊदशी संबंधित लोकांसोबत आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात केंद्रीय तपास संस्थांच्या कारवायांना पुन्हा एकदा मोठा वेग आल्याचे दिसून आले होते. नवाब मलिकांना झालेली अटक, त्यातून उलगडत गेलेले धागेदोरे, उघडकीस आलेले रॅकेट्स, मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील काही भंगारवाल्यांवर झालेल्या कारवाया आणि अशा विविध घटनांनंतर आता पुन्हा एकदा ‘एनआयए’ने आपला मोर्चा राज्याकडे वळवला असून राज्यातील आणखी एका बड्या राजकीय नेत्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘एनआयए’ आणि इतर काही संस्थांकडून राज्यात मोठ्या कारवाया होण्याचे संकेत दिले जात आहेत.
 
 
 
सोमवारी रोजी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या राजधानी मुंबईतील अनेक व्यक्तींवर ‘एनआयए’मार्फत कारवाईला सुरुवात झाली व मोठ्या प्रमाणात छापेमारीदेखील करण्यात आली. दाऊद इब्राहिमच्या ‘डी गँग’ला पैसे पुरविण्याच्या संबंधात ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुंबईच्या एकूण २४ ठिकाणी तर मीरा रोड, भाईंदर भागात पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दाऊदशी संबंधित अनेक हस्तक, ‘ड्रग्ज पेडलर’ यांच्यासह आणखी सुमारे ८० ते ९० मोठ्या असामी ‘एनआयए’च्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

 
‘टेरर फंडिंग’च्या संदर्भात फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या ‘डी कंपनी’वर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतरच ‘एनआयए’कडून कारवाईचे फास आवळायला सुरुवात झाली होती. सोमवारी झालेल्या या छापेमारीत दाऊदच्या ‘शार्प शूटर्स’सह माहिम येथील दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी, छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट आणि दाऊदशी संबंधित अनेक ‘हवाला ऑपरेटर्स’च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून त्यात ‘रिअल इस्टेट मॅनेजर’ आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित लोकही असल्याचे म्हटले जात आहे. बॉम्बस्फोटांकरिता तयार केले जाणारे ‘स्लीपर सेल स्फोट’ घडवून आणण्यात मदत करायचे ही ‘डी कंपनी’ची एक पद्धत होती. मात्र, ‘एनआयए’ने केलेल्या या छापेमारीतून दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटापेक्षा आर्थिक स्फोट तयार करण्याच्या तयारीत ‘डी कंपनी’ होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
 
 
 
 
कसे होते आर्थिक घडामोडींचे रॅकेट?
 
 
 
 
सर्वात आधी हवाला, अमली पदार्थ तस्करी, खंडणी, रिअल इस्टेट आणि इतर माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा करायचे. जमा करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत गुंतवणूक करायची आणि त्यातून एका ‘टेरर फंडिंग सेल’ची निर्मिती व्हायची. या ‘टेरर फंडिंग सेल’च्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने जमा झालेला पैसा विविध ठिकाणी गुंतवून त्यातून निर्माण झालेल्या पांढर्‍या पैशाची पुढे दाऊद इब्राहिमशी संबंधित आखाती देशांमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक व्हायची, अशा प्रकारे हे आर्थिक घडामोडींचे अर्थात ‘टेरर फंडिंग’चे रॅकेट चालवले जात होते.
 
 
 
 
कागदपत्रांसह रोख रक्कम जप्त!
 
 
दाऊद इब्राहिमच्या संशयित साथीदारांच्या परिसरात करण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ‘रिअल इस्टेट’मधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि अग्निशस्त्रांसह विविध गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी अधिकृत माहिती ‘एनआयए’तर्फे देण्यात आली आहे.