‘लव्ह जिहाद’ची कर्दनकाळ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2022   
Total Views |


Sudha Joshi
 
 
 
‘लव्ह जिहाद’ आणि ‘गोरक्षा’ या अतिसंवेदनशील विषयासाठी कायदेशीर लढाई लढणार्‍या अ‍ॅड. सुधा जोशी यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
 
२०१२ साल. अ‍ॅड. सुधा जोशींना फोन आला. “ताई, एक १४ वर्षांची हिंदू मुलगी एका मुस्लीम युवकासोबत पळून गेली. तिचे आई-वडील खूप हतबल झाले आहेत. तुम्ही काही मदत कराल का?” पण, काही क्षणातच पुन्हा फोन आला. “तुम्ही येऊ नका. तिच्या आईबाबांनी ठरवले की, याबाबत काहीच करायचे नाही. ती आम्हाला मेली.” सुधा यांना वाईट वाटले. पण, आईबाबांनीच माघार घेतली म्हटल्यावर त्या तरी काय करणार? काही दिवसांनी पुन्हा मग सुधा यांना फोन आला. “ताई, ती मुलगी पळून गेली होती ना? तिच्या आईबाबांना तुम्हाला भेटायचे आहे.” सुधा त्या मुलीच्या आईबाबांना भेटायला गेल्या, तर कळले की, त्या मुलीने आत्महत्या केली. प्रेमासाठी आई-वडिलांच्या विरोधात गेलेल्या त्या किशोरवयीन मुलीने आत्महत्या का केली असेल? त्या मुलीच्या आई-वडिलांचा आक्रोश सुधा यांचे हृदय पिळवटून गेले. कित्येक रात्री त्यांना झोप आली नाही. या घटनेबाबत आणखी काही माहिती जमवताना सुधा यांना कळले की, ही काही एकमेव घटना नाही आणि देशभरात अशा घटना घडत असतात. पण, ‘इज्जती’च्या नावाने या मुलींचे जगणे आणि मरणे या दोन्हीकडे समाज दुर्लक्ष करतो. या मुली ‘लव्ह जिहाद’ राक्षसाच्या बळी होतात. तिथूनच रणरागिणी आणि ‘लव्ह जिहाद’च्या राक्षसाची कर्दनकाळ अ‍ॅड. सुधा जोशी यांच्या लढ्याचा प्रवास सुरू झाला.
 
 
 
गेली २५ वर्षे अ‍ॅड. सुधा जोशी कल्याणमध्ये वकिली करत आहेत. जवळ जवळ तीन दशकं त्या विश्व हिंदू परिषदेचे कार्य करत आहेत.त्या विश्व हिंदू परिषद, कल्याण जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत. धर्म, समाज आणि महिला सबलीकरण या आयामातून त्या अष्टोप्रहर काम करतात. आजपर्यंत ‘लव्ह जिहाद’ची २६ प्रकरणं त्यांनी यशस्वीपणे हाताळली आहेत. १२ मुलींची त्यांनी या दुष्टचक्रातून सुटका केली. सध्या त्यांच्याकडे अशाच प्रकारची चार प्रकरणं आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये मुलीची इज्जत आणि भविष्य याचा विचार करूनच कोणतेही पाऊल टाकावे लागते. नुसती कायद्याची कलमे लावून अशी प्रकरणे हाताळलीच जाऊ शकत नाहीत. सुधा या सर्व केसेेस विनामूल्य लढतात. आजपर्यंत त्यांनी गोरक्षासंबंधीही शेकडो केसेस लढवल्या आहेत. त्यासाठी त्यांना धमकीही आली होती आणि त्या धमकीनुसार पोलिसांनी सुरक्षा द्यायचीही तयारी दर्शवली होती. मात्र, गोरक्षा हे ईश्वरी कार्य आहे. तो परमेश्वर बळ देईल,असे म्हणून अ‍ॅड. सुधांनी पोलिसांची सुरक्षा नाकारली, तर अशा या अ‍ॅड. सुधा जोशी. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतला, तर जाणवते की, आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्या ठाम राहिल्या आणि आपले ध्येय साध्य केले.
 
 
 
त्यांचे पिता बिंदुराव दिवानजी हे शिक्षक आणि आई सुभद्रा गृहिणी. दिवानजी कुटुंब कर्नाटक विजापूरमधील मामदापूर गावचे. सुधा यांचे माहेरचे नाव भागिरथी. बिंदुराव हे समाजशील. या गावात बिंदुराव यांच्या समर्थनानेच काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरत असे. या पार्श्वभूमीवर सुधा यांचे आजोबा हे प्रकांड पंडित होते. ते सुधांना राजा हरिश्चंद्र तसेच रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगत. आपली संस्कृती, तिचे वैभव, वेदपुराण आणि कथेचे वास्तव रूप सांगत. नीतिमूल्यांचे संस्कार करत. प्रभु श्रीरामांच्या चरित्रातली मानवी नीतिमूल्ये सुधा यांच्या मनावर अक्षरशः गोंदली गेली. पुढे राममंदिराचा लढा सुरू झाला. गावात रामरथ आला. सुधा तो रथ पाहायला गेल्या. तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या अधिकार्‍यांनी आवाहन केले की, “कुणाला काही बोलायचे आहे का?” त्यावेळी सुधा यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर आणि आस्था संस्कृती यावर मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुधांचे वक्तव्य एकून सगळे मंत्रमुग्ध झाले. दुसर्‍या दिवशी विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी सुधांच्या घरी आले. त्यांच्या वडिलांना म्हणाले की, “सुधा यांना विश्व हिंदू परिषदेमध्ये सहभागी करून घ्यायला परवानगी द्यावी.” सुधांच्या घरी काँग्रेसचे वातावरण. पण, तरीही बिंदुराव म्हणाले, “धार्मिक कामास ना नाही.” मग सुधा विश्व हिंदू परिषदेचे काम करू लागल्या. त्यानंतर गावात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची सभा होती. त्या सभेदरम्यान सुधा यांना विजापूर भाजप महिला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी चालून आली. मात्र, बिंदुराव ‘मुलींनी राजकारणात जाऊ नये,’ या म्हणण्यावर ठाम होते. त्यावेळी सुधा ‘एलएलबी’च्या द्वितीय वर्षामध्ये शिकत होत्या. त्यावेळी सुधा यांचा विवाह करण्याचे निश्चित झाले. सुधा यांना वाटले की, आपण तर कर्नाटक विद्यापीठातून ‘एलएलबी’ करतो. आता पुन्हा मुंबई विद्यापीठातून शिकायचे. काय होणार? आपला आणि विश्व हिंदू परिषद संबंध संपलाच.
 
 
 
मुंबईच्या सुधाकर जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुधाकर खूपच सुशील. त्यांनी नेहमीच सुधांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुधांनी विवाहानंतर ‘एलएलबी’चे शिक्षणही पूर्ण केले. सुधांनी वकिली करण्यास सुरुवात केली. पण, त्यांना तर मराठी समजत नसे आणि बोलताही येत नसे. मग त्यांनी मराठी भाषा शिकण्याचा सराव केला. काही महिन्यांतच त्या मराठीतून वकिलीची कामेही करू लागल्या. या सगळ्या काळात त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची आठवण येई. त्यांना कळले की, विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय डोंबिवलीला आहे. सुधांनी तिथे संपर्क केला. पुन्हा विश्व हिंदू परिषदेचे काम करू लागल्या. या सगळ्या काळात त्यांच्या पतींनी त्यांना उत्तम साथ दिली. अ‍ॅड. सुधा जोशी या कर्तृत्ववान महिलेच्या जीवनाकडे पाहताना जाणवते की, स्त्री म्हणून त्यांच्यासाठीही समाजाच्या चालीरीती आणि नीतिनियम आहेतच. पण, त्या सर्व चौकटींनाच आपल्या ध्येयाच्या आकाशात त्यांनी सामावून घेतले. ‘मला हे करायचे होते, पण करू दिले नाही’ म्हणून रडगाणे त्या गात बसल्याच नाहीत. आयुष्यातल्या प्रत्येक क्षण त्या ध्येयासाठी जगत गेल्या. रणरागिणी अ‍ॅड. सुधा जोशी यांच्या कार्याला प्रणाम!
 
 
@@AUTHORINFO_V1@@