‘भोंगे’ विक्रेते आणि दुरुस्ती करणारे पोलिसांच्या रडारवर

स्पीकर खरेदीसाठी आधार, पॅनकार्डची सक्ती

    01-May-2022
Total Views |
 
 
 
 
 
bhonga
 
 
 
 
ठाणे:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ‘एल्गार’ केल्यानंतर येनकेनप्रकारे भोंगे फारच चर्चेत आले आहेत. त्यामुळे भोंगे विक्रेते आणि दुरुस्ती करणारे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मोठ्या संख्येने (भोंगे) स्पीकरची खरेदी केली जात असेल, तर पोलिसांना सूचना द्या... कमी संख्येने स्पीकर खरेदी करणार्‍या ग्राहकाचे पॅनकार्ड आणि आधार कार्डाची नोंद करून ठेवा... स्पीकर दुरूस्ती करण्यासाठी येणार्‍यांच्याही नोंदी ठेवा... ठाणे शहरातील प्रभात चित्रपट गल्लीतील स्पीकर विक्रेत्यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून या संदर्भातील सूचना दिल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. यामुळे एकीकडे भोंगे विक्रेते हादरले असून अन्य समारंभ, अध्यात्मिक कार्यक्रमानिमित्त स्पीकर खरेदीसाठी येणार्‍यांनाही याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.
 
 
 
देशभरातील मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा दि. ३ मेपासून मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत दिला होता. यानंतर शहरातील मनसे पदाधिकार्‍यांकडून शहरातील मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्यासाठी परवानग्या देण्याची पत्रे देण्यास सुरुवात झाली. मनसेच्या या भोंगा आंदोलनामुळे आता स्पीकर विक्रेत्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला आहे. यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून वेगवेगळ्या मार्गांनी संघर्ष टाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याच आंदोलनाच्या निमित्ताने ठाणे नगर पोलिसांनी शहरातील प्रभात गल्ली येथील स्पीकर विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची चौकशी सुरू केल्याचे स्पीकर विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने स्पीकर खरेदी करण्यासाठी कोणी आला तर त्याची कल्पना पोलिसांना द्यावी. तसेच, छोट्या स्पीकरची विक्री करताना, दुरूस्ती करताना ग्राहकांचे आधार आणि पॅनकार्ड तपासण्याच्या तसेच त्याची नोंद घेण्याच्या सचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांमुळे स्पीकर विक्रेत्यांकडून ग्राहकांचीही उलटतपासणी सुरू झाली आहे, तर धार्मिक कार्यक्रम, सामाजिक जनजागृती उपक्रमांसाठी लागणार्‍या स्पीकरच्या खरेदीवर नियंत्रण आले आहे. तसेच, दुरूस्तीसाठीही कुणी येईना झाल्यामुळे व्यापारी हबकले असून ग्राहकांनाही नाहक त्रास होऊ लागला आहे. स्पीकर भाड्याने देणार्‍या व्यवसायिकांनाही अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.