मुंबई : सहा महिन्यांपासून न्याय हक्कांच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमांचा बांध अखेर फुटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिलव्हर ओक' या घरावर धडक देत एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळी मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांनी चप्पल भिरकावत आंदोलनही सुरू केले. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी घडलेल्या प्रसंगाबद्दल ट्विट केले आहे. "शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला हा दुर्देवीच होता. पोलिसांच्या तपासातून या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हेही लवकरच कळेल. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे सांगत अचानक अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उमाळे दाटून आलेत.", असे ते यावेळी म्हणाले. 'खर आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण...' असे म्हणत त्यांनी विरोधकांना अनेक मुद्दे मांडत विरोधकांना धारेवर धरले आहे.
केशव उपाध्ये पुढे म्हणतात...
"नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही पण... याची सुरूवातच काँग्रेस नेत्यांनी केली. भाजपा नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे कोण होते? एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन त्याला मारहाण करणे, पोलिसाला मारहाण केली म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी कायम ठेवणे, दाऊदशी संबंधित गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगात असलेला नेता मंत्रिपदी कायम ठेवणे, मंत्र्याने पोलिसांना बोलावून महिना शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देणे, काळ्या पैशावर कारवाई म्हणून ज्याची संपत्ती जप्त झाली त्याचे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढणे, राज्यपालांना सरकारी विमानातून उतरवणे; ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती नाही."
"उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेऊन साक्षीदाराचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणे, सरकारी वकिलाच्या पुढाकाराने खोटे पुरावे तयार करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गोवणे, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हेगार ठरविणे, जनादेशाचा अपमान करून आणि विश्वासघात करून सरकार स्थापन करणे, आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पंढरपुरात महापूजेपासून रोखणं; ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती नाही."