श्रीराम पुत्र, सखा, पिता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2022   
Total Views |
 
 

shreeram  
 
 
 
प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनात पुत्र धर्माचे, मित्र धर्माचे आणि पिता धर्माचे आदर्शपूर्वक पालन केल्याचे दिसून येते. राजा दशरथाची आज्ञा मानून वनगमन, निषादराजाला जीवश्चकंठश्च मित्र मानणे, सुग्रीव-बिभीषणाला राज्यपद देणे आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारून लव-कुश यांच्याकडे राज्यकारभार सोपवण्यातून श्रीरामांनी आपल्या कृतीतून नातेसंबंध जपल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या या नातेसंबंधांतील आदर्शाविषयी...
 
विश्वेतिहासात मातृ-पितृभक्ताच्या रुपात पहिला उल्लेख गणपतीचा मिळतो. एकदा सर्व देवतांमध्ये पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा आयोजित केली जाते. त्यावेळी कार्तिकस्वामीसह उर्वरित देवता आपापली वाहने घेऊन पृथ्वी प्रदक्षिणेला जातात. पण, गणपती मात्र माता पार्वती आणि पिता महादेवालाच सातवेळा प्रदक्षिणा घालतो. कार्तिकस्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करुन आल्यानंतर गणपतीला तिथेच पाहतो. गणपती अजून पृथ्वी प्रदक्षिणेला गेला नाही का, असे विचारतो. त्यावर “मी माता-पित्यांना प्रदक्षिणा घातली. माता-पित्यातच सर्व तीर्थ आहेत,” असे सांगतो. यातूनच गणपतीच्या मातृ-पितृभक्तीची महानता समजते.
 
 
पुत्र श्रीराम
 
 
मातृ-पितृभक्तीचे आणखी सुंदर उदाहरण रामायणात पाहायला मिळते. राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याने कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयीला खूप आनंद होतो. पण, श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा निर्णय कैकेयी दासी मंथरेला अजिबात पसंत पडत नाही. मंथरा कैकेयीच्या मनात श्रीरामाविरोधात विष कालवते. “श्रीराम राजा झाल्यास तुझ्या भरताला त्याच्या आज्ञेचे पालन करावे लागेल,” असे मंथरा कैकेयीला सांगते. “तसे होऊ नये म्हणून श्रीरामाला 14 वर्षांच्या वनवासाला पाठव,” असा सल्लाही देते. तो सल्ला ऐकून कैकेयी दशरथाकडे येते आणि त्याने एकेकाळी दिलेल्या दोन वरदानांची आठवण करते. श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या स्वप्नांनी राजा दशरथ कमालीचा आनंदी असतो. तो कैकेयीला “वरदान माग,“ असे म्हणतो. तेव्हा कैकेयी, पहिल्या वरदानानुसार, ‘भरताचा राज्याभिषेक करा’ आणि दुसर्‍या वरदानानुसार, ‘श्रीरामाला 14 वर्षांचा वनवास द्या,’ अशी मागणी करते. तोच इतक्या वेळ प्रसन्नमुख असलेल्या दशरथाची अवस्था वाईट होते. त्याच्या मनात दुःख, वेदना, यातना दाटून येते. इकडे अयोध्येत मात्र श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरु असते. त्याचवेळी श्रीराम दशरथाच्या महालात येतात. दशरथ उदास, दुःखी असल्याचे दिसते. श्रीराम दशरथाच्या दुःखाचे कारण विचारतात. त्यावर “राजाच्या मनातल्या गोष्टींचे तू पालन करायला तयार असल्यास मी सांगते,” असे कैकेयी म्हणते. तेव्हा, “पितृआज्ञा असेल तर आगीतही उडी मारेल, हलाहलही प्राशन करेल,” असे श्रीराम म्हणतात. श्रीरामाच्या या उत्तरावरुन त्यांची पितृभक्ती किती उच्चकोटीची होती, याची प्रचिती येते. तसेच, “देवतांनीही पित्यालाच देवता मानलेले आहे. म्हणून देवता समजून मी तुमच्या आज्ञेचे पालन करेन,” असे श्रीराम राजा दशरथाला म्हणतात. अर्थात, दशरथ श्रीरामाच्या वियोगाने आधीच दुःखी झालेला असल्याने पुढचे वाक्य कैकेयीच बोलते. “तुला 14 वर्षांच्या वनवासाला जावे लागेल, हीच पितृआज्ञा आहे,” असे कैकेयी श्रीरामाला सांगते. कैकेयीचे उत्तर ऐकताच श्रीराम एकही उलट प्रश्न विचारत नाही. इथे दुसरा कोणी असता तर तत्काळ माता-पित्यांशी भांडण सुरू केले असते. पण, श्रीराम पितृआज्ञा प्रमाण मानून सर्व सुख, संपत्ती, ऐश्वर्य, साम्राज्याचा त्याग करुन,
तदेतत् तु मया कार्यं क्रियते भुवि नान्यथा।
पितुर्हि वचनं कुर्वन् न कश्चिन्नाम हीयते॥
अर्थात, “या भूमंडळावर सर्वांनी करण्यायोग्य आहे तेच मीही करणार. पित्याच्या आज्ञेचे पालन करणारा कोणीही पुरुष धर्मापासून भ्रष्ट होत नाही,” असे म्हणत वनवासाला निघतात. पितृआज्ञेचे अशाप्रकारे पालन केल्याचे दुसरे कोणतेही उदाहरण जगाच्या इतिहासात कुठे सापडत नाही आणि यातूनच श्रीरामाची पितृभक्ती गगनाला भिडल्याचे दिसून येते, श्रीरामाची पितृभक्ती अवघ्या जगाला प्रेरणा देत राहते.
 
 
 
सखा श्रीराम
 
 
श्रीरामचंद्रांनी मानवी जीवनातील प्रत्येक नात्याचा सन्मान केला आणि ते नाते निभावलेदेखील. त्यात पुत्राच्या नात्याबरोबरच मित्राचे नातेही होते. श्रीराम अयोध्येचा सम्राट दशरथाचे पुत्र होते. पण, त्यांची भिल्ल समाजातील निषादराजाबरोबरची मैत्री अनुपमेय होती. बालपणी एकदा निषादराज श्रीराम आणि अन्य भावंडांना भेटण्यासाठी अयोध्येकडे मार्गक्रमण करत असतो. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी श्रीरामाला भेट देण्यासाठी मधुर फळे आणि ‘रुरू’ नामक हरणाच्या चामड्याची-वनवासी लोक नेसतात, ते धोतरही दिले होते. निषादराजाने फळे आपल्या सोबत्यांकडे दिली, पण धोतर स्वतःकडेच ठेवले. अखेर सर्वजण शरयूकिनारी आले व स्नानासाठी नदीत उतरले. त्यावेळी निषादराजाचे लक्ष श्रीराम व भावंडांना भेट म्हणून देण्यासाठी आणलेल्या धोतरांकडेच होते. पण, तितक्यात कुठूनतरी चार मुले आली आणि त्यांनी निषादराजाने गाठोड्यात बांधलेले एक धोतर परिधान केले. त्याने निषादराजाला राग आला. कारण, ती भेट श्रीरामांसाठी होती. निषादराजाने तसे बोलूनही दाखवले. श्रीरामाने सांगितले, “तू ज्यांच्यासाठी भेट आणली ते राजकुमार आम्हीच आहोत.” ते ऐकताच छोट्याशा निषादराजाने श्रीरामाच्या चरणांशी लोळण घेतली. पण, श्रीरामांनी निषादराजाला उठवले आणि मिठी मारली. नंतर पाचही बालके दशरथाकडे आले. त्यावेळी श्रीरामाने निषादराजाची ओळख ‘मित्र’ म्हणून करुन दिली. चक्रवर्ती सम्राटाच्या पुत्राने धोतरासारख्या लहानशा भेटीनंतर आपल्याला मित्र मानल्याचे पाहताच निषादराज भाव-विभोर होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. पुढे श्रीराम आणि निषादराजाची मैत्री अधिकाधिक प्रगाढ होत गेली. एकदा श्रीरामाने निषादराजाची प्रशंसा केल्याने दशरथाने त्याला ‘शृंगवेरपुराचे राजेपद’ही दिले. नंतर निषादराजाला श्रीरामाच्या वनगमनाची माहिती मिळताच तो धावतपळत आला. त्यावेळी दोघांनी आस्थेने एकमेकांची विचारपूस केली आणि अखेरीस श्रीरामांनी निषादराजाला निरोप दिला. त्यावेळी श्रीरामांच्या मनात निषादराजाबद्दल नेमकी काय भावना होती, याचे वर्णन गोस्वामी तुलसीदासांनी सुंदर शब्दांत केले आहे-
तुम मम सखा भरत सम भ्राता
सदा रहेहु पुर आवत जाता॥
अर्थात, “हे मित्रा, तू मला भरताप्रमाणेच प्रिय असून सदैव अयोध्येला येत राहा,” असे म्हणत श्रीरामांनी निषादराजाला भरताप्रमाणे बंधूच मानल्याचे दिसते. मैत्री कोणत्याही सामाजिक बंधनाच्या पलीकडे असते. समाजाने निर्माण केलेल्या उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यतेच्या भिंती मैत्रीसमोर तुटून पडतात. श्रीरामाने निषादराजाशी मैत्री करुन तेच दाखवून दिले.
श्रीरामांच्या मैत्रीची आणखी उदाहरणे म्हणजे, सुग्रीव आणि बिभीषण. वालीने सुग्रीवाच्या पत्नीचे हरण करुन त्याचे राज्यही बळकावले होते. सुग्रीवाने आपली व्यथा श्रीरामांना सांगितली होती, तर श्रीरामांनीही वालीचा वध करून, सुग्रीवाला पत्नी आणि राज्य पुन्हा प्रदान करत आपला मैत्रीधर्म निभावला. लंकाविजयानंतर श्रीरामांनी त्यावर आपला हक्क सांगितला नाही. उलट बिभीषणाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याच्याच डोक्यावर लंकेच्या राज्याचा मुकूट ठेवला. यातूनच श्रीरामांनी उपदेशाचे डोस पाजण्याचे वा सल्ले देण्याचे काम केले नाही, तर प्रत्यक्ष स्वतःच्या कृतीतून मैत्री कशी जपावी, हे दाखवून दिल्याचे स्पष्ट होते.
 
 
 
पिता श्रीराम
 
 
वाल्मिकी रामायणात श्रीरामांच्या पुत्रांची कथा देण्यात आलेली आहे. लंकाविजयानंतर श्रीराम अयोध्येला आले, पण त्याचवेळी त्यांना सीतेविषयीच्या लोकापवादाची माहिती मिळते. अयोध्येतील निवडक लोकांना सीतेच्या पावित्र्याविषयी शंका असते. त्यावर श्रीराम भावंडांशी चर्चा करतात आणि लक्ष्मणाला सीतेला अरण्यात वाल्मिकींच्या आश्रमाजळ सोडण्याची आज्ञा करतात. सीता त्यावेळी गर्भवती असते व अरण्यात आल्यानंतर सीता वाल्मिकींच्या आश्रमातच राहते. तिथेच सीतेला लव आणि कुश असे दोन जुळे पुत्र होतात. लव-कुश दिसामासाने वाढत असतात आणि योग्य वयाचे झाल्यानंतर वाल्मिकींनीच त्यांना विविध शास्त्रांचे ज्ञान दिले. कलागुणसंपन्न, विविध विद्यापारंगत केले. वाल्मिकींनी लव-कुश यांना रामायणदेखील शिकवले होते. पण, अयोध्यापती श्रीराम आपले वडील असल्याचे त्यांना कित्येक वर्ष माहिती नव्हते, असे म्हणतात. पुढे एकदा अयोध्येत श्रीराम अश्वमेध यज्ञाचे आयोजन करतात. त्यानंतर यज्ञाचा शुभ्र घोडा सोडून देतात. घोडा जिथे जाईल, तो तो प्रदेश श्रीरामाच्या साम्राज्यात समाविष्ट होईल, अशी त्यामागची संकल्पना होती. नंतर घोडा वाल्मिकींच्या आश्रमाजवळ येतो व लव-कुश तो पकडतात. घोडा पकडण्याचा अर्थ अयोध्येच्या साम्राज्याला आव्हान दिले असा होता. श्रीरामांना दोघा बालकांनी घोडा पकडल्याची माहिती मिळताच ते माहिती घेण्यासाठी दूतांना पाठवतात. पण, लव-कुश घोडा सोडत नाहीत. ते पाहून श्रीरामांचे बंधू लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न लव-कुश यांच्याशी युद्ध करतात. पण, तिघे भाऊ पराभूत होतात. अखेर श्रीरामांना युद्धासाठी यावे लागते. पण, युद्धाचा निर्णय लागत नाही. त्यामुळे श्रीराम दोन्ही बालकांना यज्ञात येण्याचे आमंत्रण देतात. अयोध्येत आल्यानंतर लव-कुश नगरजनांसमोर रामायण गातात, तसेच दरबारात सीतेची व्यथाही सांगतात. ते ऐकून लव-कुश आपलेच पुत्र असल्याचे श्रीरामांना समजते. त्यावेळी श्रीरामांना अतीव दुःख होते व ते सीतेला पुन्हा अयोध्येत आणण्याचे ठरवतात. पण, तरीही सीतेच्या शुद्धतेविषयी प्रश्न असल्याने पुन्हा एकदा तिची परीक्षा घेण्याचे निश्चित होते. सीतेला याची माहिती मिळताच ती दरबारात येते आणि संपूर्ण समाजासमोर आपल्या सतित्वाची शपथ घेते आणि पृथ्वीकडे स्वतःसाठी स्थान मागते. त्याचवेळी जमीन दुभंगते आणि सीता पृथ्वीत समाविष्ट होते. त्यानंतर लव-कुश श्रीरामांबरोबरच अयोध्येत राहतात. पुढे श्रीराम उत्तर कोशलच्या सिंहासनावर लवचा राज्याभिषेक करतात, तर दक्षिण कोशलच्या सिंहासनावर कुशचा! अशाप्रकारे आपला पिताधर्म पार पाडतात व वानप्रस्थाश्रमात जातात. योग्यवेळी आपल्याकडील राज्य आपल्या पुत्रांकडे सोपवून स्वतः सर्व त्याग करण्याची शिकवण श्रीरामांनी यातून दिल्याचे दिसते. एकूणच श्रीरामांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक नातेसंबंध प्रामाणिकपणे निभावल्याचे त्यांच्या पुत्रधर्म, मित्रधर्म आणि पिताधर्मावरून स्पष्ट होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@