भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक आमूलाग्र बदल केले. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची वर्णी लावण्यापासून ते तिन्ही प्रकारच्या क्रिकेट प्रकारांमध्ये भारतीय संघासाठी नवा कर्णधार निवडण्यापर्यंत अनेक बदल सौरव गांगुली यांच्या कारकिर्दीतच घडले. प्रसिद्ध खेळाडूविराट कोहलीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णयही गांगुली ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी विराजमान असतानाच घेतला. सौरव गांगुली यांच्या कारकिर्दीत हे बदल घडत असताना अनेकदा समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्यापासून ते नवा कर्णधारपदाच्या नियुक्तीपर्यंत थेट ‘बीसीसीआय’ अध्यक्षांनी हस्तक्षेप करणे, म्हणजे गांगुली यांची ही एक प्रकारे ’दादागिरी’च असून ही वृत्ती भारतीय संघासाठी घातक ठरेल, अशा प्रकारचे भाकित टीकाकारांनी केले होते. परंतु, हे भाकित आता काहीसे खोटे ठरत असताना दिसत आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाची विस्कटलेली घडी सध्या सावरण्याच्या स्थितीत असून, आगामी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेसाठी नव्याने संघबांधणी करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विविध मालिकांमध्ये भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघांवर वरचढ ठरत असल्याचे पाहायला मिळाले. संघातील अनुभवी आणि नवख्या खेळाडूंमध्ये ताळमेळ ठेवण्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यशस्वी होत असतानाचे दिसत असल्याचे क्रिकेटचे जाणकार सांगतात. घरच्या मैदानात नुकत्याच पार पडलेल्या सर्व मालिकांमध्ये निर्भेळ यश मिळविण्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघ यशस्वी झाला, यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचेही अनेक क्रिकेट जाणकारांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे भारतीय संघ आगामी काळातही निश्चितच उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास सर्वांना वाटत आहे. ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी धडाडीचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकदा कडाडून टीकाही करण्यात आली. परंतु, आजची स्थिती ही वेगळी आहे. भारतीय क्रिकेट आज पुन्हा एकदा नव्या रुपाने यशाचे शिखर सर करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, याचे थोडे श्रेय गांगुली यांनादेखील द्यायला हवे.
उदारमतवादी ‘दादा’
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या घरच्या मैदानांवरील मालिकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांविरोधात निर्भेळ यश मिळविल्यानंतर आजच्या घडीला या संघावर कौतुकवर्षाव होत आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाची क्रिकेट जाणकारांकडून प्रशंसा होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेले प्रयोग यशस्वी होत असल्याचेही समाजमाध्यमांवर म्हटले जात आहे. समाजमाध्यमांवर नव्या खेळाडूंसह कर्णधार, मुख्य प्रशिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत असताना, संघाच्या माजी प्रशिक्षकांविरोधात अनेकदा समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठत असल्याचेही पाहायला मिळाले. परंतु, अशा परिस्थितीतही अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये गांगुली यांनी विधाने करताना संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षकांची स्तुतीच केल्याने त्यांच्या या स्वभावाचीही सर्वत्र चर्चाच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अलीकडेच गांगुली यांना एका कार्यक्रमात भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आणि माजी प्रशिक्षक यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आले असता, त्यांनी या दोघांमध्ये तुलना करणे, चुकीचे असल्याचे म्हटले. रवी आणि राहुल या दोघांचेही व्यक्तिमत्व वेगळे आहे. एक जण निडरपणे बोलतो आणि वावरतो, तर दुसरा दिग्गज खेळाडू असून आपले काम शांतपणे करतो. मात्र, दोघेही आपापल्या परीने तितकेच यशस्वी आहेत. त्यामुळे त्यांच्यात तुलना करणे हे योग्य ठरणार नाही” असे म्हणत सौरव गांगुली यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला. कारण, रवी शास्त्री यांचा कार्यकाळ न वाढविल्यावरून आणि त्या जागी आपल्या एकेकाळच्या माजी सहकार्याची नियुक्ती केल्याचा आरोप करत गांगुलीविरोधात समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अनेकांनी गांगुलीविरोधात टीकेचे आसूड ओढले होते. परंतु, गांगुली यांनी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत, रवी शास्त्री यांच्या कार्यपद्धतीचीही स्तुती केल्याने त्यांच्या या उदारमतवादी स्वभावाचे सर्व स्तरांवरून कौतुक केले जात आहे. ‘बीसीसीआय’ अध्यक्षपदी विराजमान असताना त्यांनी घेतलेली ही भूमिका योग्यच असून, त्यांची ही भूमिका भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही तितकीच महत्त्वाची असल्याचे क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे.
- रामचंद्र नाईक