एकजुटीचा मंत्र जपूया!

    07-Apr-2022
Total Views |

Ekjuticha Mantra Japuya
 
 
 
ऋग्वेदाचे अंतिम सूक्त म्हणजेच ‘संघटन सूक्त’ यात ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्’ असे संघटनवाढीविषयक सुंदर वर्णन आढळते. मानव समूहाने मिळून-मिसळून चालावे, एकत्र येऊनच एका विचाराने बोलावे आणि सर्वांची मनेदेखील एकच असावीत. ज्यामुळे देशातील जनतेचे सर्वहित साधले जाते. इतकेच काय, तर सार्‍या समस्यांचे निवारण होऊन माणूस हा खर्‍या अर्थाने माणूस बनतो. परिणामी, आदर्श मानव समाज उदयास येतो.
 
 
सु क्षेत्रिया सु गातु या वसु या यजामहे ।
अप: न: शोशुचद् अघम् ॥
(ऋग्वेद-१/९७/२ अथर्ववेद-४/३३/२)
 
अन्वयार्थ 
आम्ही सर्वजण (सु क्षेत्रिया) चांगल्या क्षेत्रातील लोकांशीच (यजामहे) एकजूट करू. (सु गातुया) जे सन्मार्गावर चालणारे आहेत, अशा सुपथगामी लोकांचीच (यजामहे) संगत धरू. (च) तसेच (वसु या ) सुसंपन्नतेशी (यजामहे) संगती करू. यामुळे (न:) आम्हा सर्वांची (अघम्) सर्व प्रकारचे पापे (अप शोशुचत्) जळून भस्मीभूत होवोत.
 
 
विवेचन
केवळ मानवी जीवनच नव्हे, तर सबंध वैश्विक समाजाच्या प्रगतीसाठी 'संगतिकरण' हा मोलाचा मंत्र आहे. जेव्हा पवित्र उद्देशाने समाजातील काही लोक एकत्र येतात आणि ते समाज, देश व राष्ट्राच्या सर्वंकष हिताचा विचार करू लागतात, यालाच तर 'सु+संगतिकरण' असे म्हणतात. संघटित होणे किंवा एकत्रित येणे म्हणजेच संगतिकरण होय. वरील वेदमंत्रात यजामहे हे वचन आले आहे. 'यज् देवपूजासंगतिकरणदानेषु' देवपूजा म्हणजे दिव्य गुणांची पूजा, श्रेष्ठ तत्त्वांचा सन्मान आणि विद्वानांचा सत्कार. संगतिकरण म्हणजेच एकजूट आणि दान म्हणजे इतरांसाठी काहीतरी देत राहणे. ‘यज्’ या धातूचे असे प्रामुख्याने तीन किंवा यापेक्षाही अधिक अर्थ होतात. या तिन्हींच्या मध्यभागी ’संगतिकरण’ हा शब्द आला आहे. एकीकडे महापुरुषांचा सन्मान करणे आणि दुसरीकडे दान देणे, यामुळेच तर संघटनवाढीस बळ मिळते. समाजात सद्विचारांचे वारे वाहू लागते. महान उद्देशाने प्रेरित होऊन लोकांमध्ये एकजूट वाढू लागते. याला आपण संघटन कौशल्य विकसित करणे, असेदेखील म्हणू शकतो.
 
 
 
ऋग्वेदाचे अंतिम सूक्त म्हणजेच ’संघटन सूक्त’ यात 'संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्' असे संघटनवाढीविषयक सुंदर वर्णन आढळते. मानव समूहाने मिळून-मिसळून चालावे, एकत्र येऊनच एका विचाराने बोलावे आणि सर्वांची मनेदेखील एकच असावीत. ज्यामुळे देशातील जनतेचे सर्वहित साधले जाते. इतकेच काय, तर सार्‍या समस्यांचे निवारण होऊन माणूस हा खर्‍या अर्थाने माणूस बनतो. परिणामी, आदर्श मानव समाज उदयास येतो. देशातील नागरिकांच्या एकजुटीने त्या राष्ट्राची चौफेर प्रगती साधली जातेच; अन्यथा आपसातल्या फुटीमुळे त्या राष्ट्राचा र्‍हास होण्यास वेळ लागणार नाही. ‘संगतिकरण’ हे देशाच्या विकासाचे व पुण्यवाढीचे लक्षण, तर ‘असंगतिकरण’ हे अधोगतीचे आणि पापाचे मूळ. समाजात वावरणार्‍या लोकात एकसमान विचार, परस्पर सुसूत्रता, एकवाक्यता, एक ध्येयशीलता नसेल, तर अनेक समस्या उद्भवतात. अविचार हेदेखील असंगतिकरणाचे मूळ आहे. समाजात परस्परविरोधी अविचार जेव्हा रुढ होऊ लागतात, तेव्हा एकात्मता नाहिशी होण्यास मदत मिळते. यामुळे एकसंघ समाज सुद्धा दुभंगू लागतो. परिणामी, आपसात संघर्ष उद्भवून अशांतता प्रस्थापित होऊ लागते. यासाठी तर या मंत्रात प्रत्येक माणसाने एक दुसर्‍याशी सुसंगत व एकरूप होत परिवार, समाज, राष्ट्र आणि वैश्विक स्तरावर संघटित व्हावे असे, आवाहन केले आहे. असे जर झाले, तर आमच्यातील सर्व पापे जळून भस्म होऊ शकतात. कोणत्याही प्रकारची अरिष्टे उद्भवणारच नाहीत.
 
  
अप न: शोशुचद् अघम्।
पापे जळून गेली की, समाज व राष्ट्रसुखाच्या मार्गाने जाऊ लागतो. देशवासीयांमध्ये संगती करण्याचे तत्त्व विकसित होण्यासाठी आवश्यक असणार्‍या तीन उपायांचे वर्णन या मंत्रात केले आहे. यात सर्वप्रथम म्हटले आहे-
 
सु क्षेत्रिया यजामहे।
आम्ही आमच्याच अधिकारक्षेत्रातील कार्यामध्ये प्रामाणिकपणे तत्पर असावे. दुसर्‍यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करता आपल्या कर्तव्यात दक्ष असावे. जर काय आम्ही आपली कामे सोडून इतरांच्या कार्यात लक्ष देऊ लागलो, तर एक-दुसर्‍यामध्ये प्रेम व स्नेह वाढणार नाही, याउलट शत्रुत्वच वाढीस लागते. मग ‘संगतिकरण’ अर्थात संघटन कसे काय वाढणार? म्हणूनच प्रत्येकाने आपापल्याकार्यक्षेत्रातील कर्तव्यात दक्ष राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. एकजूटवाढीचा हा खर्‍या अर्थाने पहिला उपाय नेहमीच उपयुक्त मानावा.
 
संगती करण्याचा दुसरा उपाय म्हणजे-
 
सु गातुया यजामहे।
गातु म्हणजेच गमनशीलता. ‘सु गातु’ याचा अर्थ पवित्र चांगल्या मार्गावरचे चालणे. आम्ही जर वाईट मार्गाने जाऊ लागलो, तर समाजातील भली माणसे नेहमी निंदा करतील आणि आपल्या सोबत कोणीही येणार नाही. यासाठीच तर आपले मार्गक्रमण हे सुपथावरील असले पाहिजे. स्वस्तिपंथाने चालण्याने राष्ट्राचे संघटन कौशल्य विकसित होते.
संगतिकरणाचा तिसरा व शेवटचा उपाय म्हणजे ‘वसुया यजामहे!’
 
‘वसु’ म्हणजेच धन किंवा ऐश्वर्य. ही पृथ्वी माता अनेक प्रकारच्या ऐश्वर्यातत्त्वांना धारण करते. तसेच तिच्यावर अनेक जण वसतात, राहतात. म्हणूनच ती वसुंधरा आहे. तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऐश्वर्य दडले आहे. आमची गमनशीलता ही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणचिकित्सा या विविध प्रकारच्या ऐश्वर्यगुणांनी परिपूर्ण असावे. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अभाव किंवा निर्धनता असता नये. अशा प्रकारची व्यवस्था व्यवस्था झाली, तर ही समाजात व राष्ट्रात एकजूट वाढीला लागते.वरील तिन्ही उपायांनी जेव्हा आम्ही सुसंगत होऊन आम्ही आमचे संघटन वाढवू लागलो, तर निश्चितच सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतील. एक-दुसर्‍यांमध्ये असलेले वैमनस्य, शत्रुत्व किंवा फुटिरता इत्यादी पापे जळून नाहिशी होतील. यासाठीच तर वेदप्रतिपादित हा एकजुटीचा मंत्र जपू या आणि समग्र मानवतेचे कल्याण साधूया!
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य