सापेक्षरित्या एकसमयावच्छेदेकरून संघात संभव झाले की, त्यापासून परमाणू तयार होतो. परमाणूपासून अणू, अणूपासून विभिन्न पदार्थ एवं विभिन्न पदार्थांच्या संघातापासून सर्व जग तयार झाले आहे. ओतांच्या साकारण्यामुळेच सर्व जग दृश्यमान होते, म्हणून तेजस तत्त्वाचा गुण आकार मानला आहे. कुंडलिनीजागृत साधकाला बाह्य उत्तेजनाशिवाय स्वत:च्या ठिकाणी दिव्यस्पर्शाचा अनुभव येत असतो.
साधकाच्या शरीरातील यच्चयावत पेशींचे स्वैरस्पंदन चालत असल्याने असल्या दिव्य स्पंदनयुक्त साधकाला सततचे दिव्य स्पर्श अनुभवायला मिळत असल्यास नवल नाही. तीच अवस्था दिव्य नादांची आहे. साधारणतः असा समज आहे की, आपल्याला कर्णेंद्रियांद्वारे नाद ऐकू येतात. पण, योग्याला नेत्राद्वारेही नाद ऐकू येतात. सूर्यचंद्रतार्यांकडे पाहून योगी त्यांचे नाद ऐकू शकतो. त्यांना ‘अनाहतनाद’ म्हणतात. कर्णपटलावर वायुलहरींचे स्पंदन होऊन साधारण नाद प्रतीत होत असतात. सामान्यांना नादाकरिता बाह्य उत्तेजकांची आवश्यकता असते, पण असाधारण साधकाचे अंगप्रत्यंग नवचैतन्याने स्पंदित होत असल्याने त्याला कानांद्वारे, नेत्रांद्वारे दिव्य नाद सतत ऐकू येत असल्यास ते त्याच्या दिव्य अवस्थेला धरुनच आहे. नाद हा गुण तत्त्वदर्शनात आकाश तत्त्वाचा मानला आहे. मूळ प्रकृतीत विकृती उत्पन्न झाली की, नाद उत्पन्न होत असतो. प्रकृतीच्या साम्यावस्थेत नाद नाही की स्पर्श नाही, आकार नाही की रस व गंध नाही. प्रकृतीच्या आदी अवस्थेत नाद नाही. ‘परिमळ घ्राणी उरे’ या ओवीपदाचा एवढा प्रपंच झाला आहे.
तो ही शक्तिसवे संचरे। मध्यमेमाजी ॥
स्वयंभू परिमल आपल्या मूल दिव्य ‘कुंडलिनी’ शक्तीत परिणत होऊन ती कुंडलिनी मध्यमेत म्हणजे सुषुम्ना नाडीत संचरत असते. दिव्य परिमल, स्पर्श, नाद, रस व गंध यांचा सतत अनुभव घेण्याची इच्छा करणे उच्च साधनावस्था प्राप्त करण्याचे दृष्टीने अयोग्य असते. एखाद्या अवस्थेचा अनुभव आला की, साधकाने त्या अवस्थेचा त्याग करुन त्यावरील उच्च अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करावयास हवा. स्वयंभू असा दिव्य परिमल घेण्याच्या अवस्थेला उन्नयनीत करुन म्हणजे आपल्या मूलशक्तीत परिणत करुन साधक आता ‘कुंडलिनी’ शक्ती संचारासह मध्यमा म्हणजे सुषुम्नेत प्रवेश करतो. या अवस्थेचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात, ‘तोही शक्ति सवे संचरे। मध्यमे माजी ॥’
सुषुम्ना नाडी
आपल्या शरीरात नाकपुडीत डाव्या बाजूला असणार्या योगनाडीला ‘ईडा’, तर उजव्या बाजूला असलेल्या योगनाडीला ‘पिंगला’ म्हणतात. डावीला ‘चंद्रनाडी’, तर उजवीला ‘सूर्यनाडी’ असेही म्हणतात. प्रत्येक नाडी अर्धा तास सुरु असते. या दोन्ही नाड्यांच्या मधोमध असलेली ‘सुषुम्ना नाडी’ होय. पण, या नाड्या शरीरात नसून शरीराच्या आधार असतात. जीवात्मा आणि शरीर यांचे संक्रामक केंद्र म्हणजे ‘योगनाडी’ होय. चित्रपटातील चित्रांचे केंद्रीकरण पडद्यावरच नसते. पडद्यामुळे ते दिसते एवढेच! तद्वत् ‘योगनाड्यां’चे म्हणता येईल. ध्यानधारणा व प्राणायामामुळे या नाड्या शुद्ध होऊन त्यांच्या स्वस्थतेमुळे मधली सुषुम्ना जागृत होत असते. सुषुम्ना जागृत झाल्यावर साधकाच्यावृत्ती स्थिरावलेल्या श्वास शून्य असतो. जवळ जवळ नसल्यागत असतो. सर्व व्यवहारदेहभावाच्या वर आणि शांत असतात. जवळ जवळ कोणत्याच इच्छा नसतात. एका गहन अंध:कारातून आपण अतिशय प्रचंड वेगाने जात आहोत, असा सुषुम्नास्थित साधकाचा अनुभव असतो. वृत्तीरहित साधकच सुषुम्नेतून प्रवास करू शकतो व सुषुम्नेच्या ‘परा’ अवस्थेला असणार्या परमात्म्यास जाणू शकतो. भगवान वेदव्यास याच सुषुम्नेला कथारूपाने ‘यमुना’ म्हणतात. सुषुम्नेप्रमाणे यमुनाही ‘काळी’ मानली आहे. भागवतातील ‘कात्यायनी व्रता’ची कथा याच सुषुम्ना अवस्थेतील अनुभवप्रवास होय. वृत्ती म्हणजे मानवीशुद्धचित्तावरील वस्त्रे हे समीकरण धरुन पुन्हा एकदा कात्यायनी व्रताचा आशय ध्यानात आल्यास त्या कथेतील अगम्य वा अश्लीलतेचा भावार्थ गळून एका गहन योगसाधनेचा दिव्यअनुभव साक्षात्कार येईल. ही कथा सर्वांना ठाऊकच आहे. गोपी यमुनेत निर्वस्त्र (वृत्तिरहित) होऊन स्नान करीत असताना भगवान गोपालकृष्ण त्यांची वस्त्रे पळवितात व लपून बसतात. त्यांना त्याच निर्वस्त्र अवस्थेत म्हणजे ‘सर्व वाईट व चांगल्या वृत्तींचादेखील त्याग करून चित्त शुद्ध करा व माझ्याजवळ या तरच मी दर्शन देईन,’ असे सांगतात. हेच काळ्या यमुनेचे व देवता दर्शनाचे दिव्य रहस्य आहे. याचा खरा आशय लक्षात घेतला गेला नाही, तर ही कथा सर्वसामान्यांना अश्लील वाटणे साहजिकच आहे.
सर्व शरीरातील चैतन्यशक्ती सुषुम्नेतून म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शब्दांत मध्यमेतून उन्मिलित झाल्यास पलीकडील दिव्यभाव प्रकट होतात. साधक देहभावाच्या वर असतो. तुकाराम महाराज म्हणतात, ‘देहभाव हरपला तुज पाहता विठ्ठला.’ अशा दिव्य अवस्थेतील साधकाला वारंवार आपल्या मस्तकात पण वरच्या स्थानी चंद्रदर्शन घडत असते. सर्वत्र चंद्रप्रकाशाचे साम्राज्य दिसून येते, त्यालाच माऊली ‘चंद्रामृताचे तळे’ असे म्हणतात. भगवान शिवाच्या माथ्यावर याच अवस्थेला धरुन चंद्र दाखविला आहे. भगवान रामाला याकरिताच ‘रामचंद्र’ असे म्हटले आहे. भगवान कृष्णाला म्हणूनच ‘चंद्रवंशी’ म्हटले आहे. असला श्रेष्ठ साधक आत्मज्ञान झाल्यामुळे चिरंजीवी असतो. त्याला जराजन्ममृत्यू नसतात. शरीर काळानुसार गळेल, पण साधक अमरआत्मा असतो. असल्या दिव्य अवस्थेत सर्वसाधक चिरंजीवी होत. असल्या चंद्रदर्शनामुळे साधकाच्या सर्व शरीरात एक प्रकारचे नवचैतन्य उत्पन्न होऊन त्याला कोणत्याच प्रकारचा रोग वा जरा उत्पन्न होत नाहीत. सर्व नाड्यांतून जणू अमृतप्रवाह रसरसून वाहतो आहे, असा साधकाला अनुभव येतो. काही साधकांना आहाराचीसुद्धा आवश्यकता राहत नाही. सततच्या अमृतरसाने ते सतत तृप्त असतात. धन्यकाम साधक, धन्यकाम शरीर! (क्रमशः)
- योगिराज हरकरे
शब्दांकन : राजेश कोल्हापुरे