समाजजाणीवा जाणणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2022   
Total Views |

समाजजाणीवा जाणणारा उद्योजक
 
 
कुटुंबापासून सुरू झालेला प्रवास ‘वसुधैव कुटुम्बकम्’पर्यंत नेणार्‍या नाशिकच्या कौस्तुभ मेहता यांच्याविषयी...
 
 
“कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत बालपणी जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवर झालेल्या संस्कारांचा मोठा वाटा असतो,” असे आवर्जून सांगतात नाशिकमधील औद्योगिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या यशस्वी कर्तृत्वासाठी ओळखले जाणारे कौस्तुभ मेहता. कौस्तुभ यांचे बालपण तसे सुखवस्तू. परंतु, प्रगल्भ सामाजिक जाणिवांनी संपन्न अशा वातावरणात गेले. आपल्या लहानपणी कौस्तुभ त्यांच्या आजोबांसोबत ‘रिमांड होम’मधील मुलांना गोष्टी सांगायला जात. तो अनुभव त्यांना खूप शिकवणारा होता. शाळेकडून अंध मुलांसाठी अधिकाधिक मदत जमा करणे म्हणजे आपण उचललेला खारीचा वाटा आहे, ही कल्पना असलेल्या कौस्तुभ यांनी पुढे जाऊन सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे मोठे योगदान देण्याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला.
 
 
 
सारासार विचार करून निर्णय घेणे, निर्णयांची जबाबदारी पेलणे यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी कायमच प्रोत्साहन दिले व विश्वास दाखवला. हाच विश्वास पुढे ‘सीओइपी’मध्ये ‘इंजिनिअरिंग’ करताना त्यांच्या मनात होता. त्यामुळे अभ्यासासोबत नियतकालिकांमध्ये लेखन, जवळच्या खेड्यांमध्ये जाऊन मुलांना शिकवणे, ट्रेकिंग अशा उपक्रमांमध्ये ते सहभागी होत गेले. नाशिकमध्ये परतल्यावर कौस्तुभ एकीकडे आपल्या घरातील व्यवसायाचा तसेच, रचना या माजी विद्यार्थी संघाचादेखील भाग झाले. कुठलेही नवीन कार्य हाती केवळ घ्यायचे नाही, तर त्याचा सखोल अभ्यास करून, उपलब्ध स्रोतांचा परिपूर्ण उपयोग, नवा विचार मांडण्याची तयारी, अडचणींवर मात करण्याची मानसिकता यातून त्यांनी अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. वृक्षारोपण, हुंडामुक्ती, स्वच्छता, व्यसनमुक्ती, असे सामाजिक संदेश असलेली आंतरशालेय जनजागरण रॅली स्पर्धेची त्यांची संकल्पना सर्वत्र कौतुकास पात्र ठरली.
 
 
 
‘महाराष्ट्र समाज सेवा संघा’ची वाघेरा येथील आश्रमशाळा कौस्तुभ यांच्या वनवासी मुलांसाठीच्या उत्तुंग कामगिरीची सुरुवात ठरली. या शाळांना वेळोवेळी दिलेल्या भेटींदरम्यान तिथली परिस्थिती लक्षात घेत या मुलांना शालेय सामान, संगणक सामग्री, कपडे यांचा पुरवठा केला गेला. त्याचबरोबरीने उल्लेखनीय अशी ‘दत्तक योजना’ कौस्तुभ यांनी राबवली आणि समाजाच्या विविध स्तरांमधील ते एक सन्माननीय दुवा ठरत गेले. ’याच वनवासी मुलांसाठी अमेरिकेतून आलेल्या त्यांच्या मित्राच्या सातवीतल्या मुलाने समाज सहभागातून जमा केलेली तब्बल ७५ हजार रुपयांची मदत आपल्यासाठी एक विलक्षण अनुभव होता, असे कौस्तुभ आवर्जून सांगतात. त्यांच्या संस्थेतर्फे माई लेले श्रवण विकास शाळेत ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू केलेली ’सेल बँक’ देखील एक महत्त्वाचा उपक्रम ठरला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यातून ‘हिअरींग एड’च्या सेलचा पुरवठा केला जातो. अनेक सामाजिक संस्थांची कौस्तुभ यांनी केवळ मुहूर्तमेढ रोवली नाही, तर त्या नावारूपास देखील आणल्या. यातून त्यांना सहकार्य, बजेटिंग, व्यवस्थापन, मार्केटिंग, कामाची आखणी, मांडणी, प्रचार, लोकांना प्रोत्साहन देत कार्यपूर्ती करणे हे शिकायला मिळाले. याच कौशल्यांचे कौस्तुभ आता शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच औद्योगिक क्षेत्रातही मार्गदर्शन करतात.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘लीडरशिप फोरम’मध्ये झालेली भेट व त्यांच्या सोबतची चर्चा आपल्या कायम स्मरणात असून आपल्या वाटचालीतला तो अतिशय महत्त्वाचा टप्पा होता, असे कौस्तुभ सांगतात. ‘मेटाफोर्ज इंजिनिअरिंग’, आपला केवळ व्यवसाय नसून वडिलांनी पाहिलेलं व प्रत्यक्षात आणलेलं एक स्वप्न आहे, असे कौस्तुभ मानतात. त्याचप्रमाणे मोठे बंधू प्राजक्त मेहता यांनी आखलेल्या ध्येयपूर्तीसाठी आपण त्यांची साथ करावी, असेही त्यांना वाटते. वेगवेगळ्या चढउतारातून यशाकडचा कारखान्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. आज त्यांच्याकडे जवळपास ३०० कर्मचारी आहेत. कोरोनाच्या काळात ‘कोविड’ झालेल्या कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी मेहता बंधूंनी उभारलेला ‘स्पेशल टास्क फोर्स’ हा औद्योगिक क्षेत्रात मानाचा व कौतुकाचा ठरला. ‘व्होकल फॉर लोकल’ येण्याच्या कित्येक दशकांपूर्वी आपण जे उत्पादन भारतात दर्जेदार करू शकतो, ते शक्यतो आयात करू नये, यासाठी आपले आजोबा अविरतपणे झटले याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.
 
 
 
अभियांत्रिकी व औद्योगिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रदेखील कौस्तुभ यांच्या आवडीचे. मुलांना उत्तम शिक्षण मिळावे, वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असावी, हसत-खेळत पण समाजोपयोगी विचारधारेचे शिक्षण असावे, असे त्यांना वाटते. याच विचारातून सुरू केलेलं ‘स्पार्कल प्री प्रायमरी स्कूल’ जगातील सर्वोत्तम मानल्या जाणार्‍या फिनलंड शिक्षण पद्धतीवर अवलंबून आहे. या शिक्षण पद्धतीत सातत्याने बदलत जाणार्‍या समाजासाठी मुलांना व्यावहारिक पातळीवर तयार करण्यावर भर असतो. अनेक संस्थांवर पदाधिकारी असण्याबरोबर, ट्रेकिंग, सायकलिंग असे छंद असणार्‍या कौस्तुभ यांना जीवनाकडे साकल्याने बघावे असे वाटते. कोणालाही दोष देण्याची मानसिकता न बाळगता पुढाकार घेऊन शक्य ती मदत आपण करायला हवी, असे ते मानतात. आपण केलेली मदत ही इतर कोणासाठी नसून सगळी माणसं ही आपलीच असतात, असे ते म्हणतात. तेव्हा कुटुंबापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ’वसुधैव कुटुम्बकम्’ पर्यंत झालेला आहे, हे निश्चित!
  
 
 
@@AUTHORINFO_V1@@