मुंबई (भालचंद्र देव ): दोन्ही मेट्रोंची यापुढील सर्व कामे हातावेगळी करण्यासाठी सन 2023 उजाडण्याची शक्यता आहे. कारण, मेट्रोची अनेक तांत्रिक कामे शिल्लक आहेत. तांत्रिक कामांमुळे होणार्या विलंबामुळे मेट्रोचा पुढचा मार्गही उशिरा व खडतर आहे, असे एका अधिकार्याने सांगितले.
पादचारी पुलावर अद्याप छप्पर नाही
“दहिसर येथे नवीन पादचारी पूल बांधण्यात आला आहे. मात्र, पुलावर आणि पायर्यांवर अद्याप छप्पर बांधलेले नाही. दररोज सकाळी असंख्य कामगार, रहिवासी, शाळकरी/ महाविद्यालयीन विद्यार्थी आदी ये-जा करत आहेत. हायवेचे काम चांगले केले. मात्र, त्यावरील संरक्षक भिंतीचे काम अर्धवट सोडल्यामुळे हायवे ओलांडणार्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी घाईघाईत दोन्ही मेट्रोंचे उद्घाटन केले. मात्र, या पुलावर आणि पायर्यांवर छप्पर, दिवाबत्ती आहे की नाही, याची चौकशी केली नाही. तसे झाले असते, तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे स्थानिक रहिवासी राजेंद्र धस म्हणाले. बहुधा यापुढील मेट्रोंची सर्व कामे रखडणार आहेत,” अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
नोकरदारांना, महिलांना मेट्रो सुरू झाल्याने आनंद
“गोरेगावला कामानिमित्त दररोज जाणार्या एका महिलेने सोमवारी प्रथमच दहिसर ते डहाणूकर वाडीपर्यंत पहिल्यांदाच प्रवास केला. या मेट्रोतून प्रवास केल्यानंतर हर्षोल्हास झाला आहे. मी आता जाता-येता मेट्रोनीच प्रवास करणार आहे. कारण, इतके दिवस मी दररोज जाण्या-येण्यासाठी 130 रुपये मोजत होते. यापुढे फक्त 60 रुपये मोजणार असल्यामुळे माझा खर्चही कमी होईल आणि माझी दररोजची दगदगदेखील संपेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
‘डहाणूकर वाडी’ स्थानकात उतरल्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्था आणि अन्य व्यवस्थापन, स्वच्छता व टापटीपपणा पाहून त्या हरखून गेल्या होत्या. जर मेट्रो प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढवली आणि अशीच व्यवस्था राखली, तर या मार्गावर प्रवाशांची गर्दी नक्कीच वाढेल. त्यामुळे मेट्रोचेही उत्पन्न नक्कीच वाढेल. मात्र, प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तर कमी उत्पन्न मिळेल आणि ही सेवा रडत-खडत सुरू ठेवावी लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मेट्रोच्या व्यवस्थापनाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. दहिसर, आरे, मागाठाणे आदी परिसरांत राहणार्या नोकरदारांनीही या सेवेचे कौतुक केले आणि सध्याची व्यवस्था अशीच ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बोरिवली येथील 66 वर्षीय रहिवासी दिलीप परब त्यांच्या बहिणीला मुलुंडला सोडण्यासाठी आले होते. त्यांचे काम झाल्यानंतर त्यांनी दहिसर स्थानकाला भेट दिली. संपूर्ण स्थानक पाहून झाल्यावर त्यांनी मेट्रोच्या एका अधिकार्याशी संपर्क साधून त्यांच्या व्यवस्थापनाचे आणि अन्य अधिकारी, कर्मचार्यांची तोंड भरून वाहवा केली.
रावळपाडा येथील धर्मेंद्र झा हे रहिवासी गेली 42 वर्षे मेट्रोच्या क्षेत्रात राहतात. मेट्रोच्या निमित्ताने आमच्या परिसराला चांगले रुप मिळाले आहे. रस्ते चांगले झाले आहेत. या भागात डायमंड, लोखंडाच्या कंपन्या आहेत. तेथील शेकडो कामगार दुपारी जेवणासाठी हायवे ओलांडून जात असत. त्यावेळी वाहने थांबावी लागत होती. मात्र, आता पादचारी पूल झाल्यामुळे त्यांची चांगली व्यवस्था झाली, असे झा म्हणाले.