मुंबई (प्रतिनिधी): “एक पत्रकार असूनही शिवसेना नेते संजय राऊत यांनी अल्पावधीत कोट्यवधींची संपत्ती कमविली. त्यामुळे, माझी राऊत यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या यशाचे गमक इतर पत्रकारांनाही सांगावे. जेणेकरून महाराष्ट्रातील पत्रकारही आपल्यासारखी चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती करू शकतात,” असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला.
“संजय राऊत यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाईने भाजपला आनंद व्हायचे काही कारण नाही. संजय राऊत यांना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या नेत्यांवर व विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आनंदाच्या उकळ्या कशा फुटायच्या, त्याची त्यांनी आठवण करावी. भाजपला काही उड्या मारायचे कारण नाही. कारण, हा विषय भाजपचा नाही, तर एका तपास यंत्रणेचा विषय आहे,” असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.
अलिबागची एक एकरची जागा फक्त एक कोटींची असेल. तसेच, आपल्यावरील कारवाई म्हणजे मराठी माणसावर कारवाई करायची,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. त्यावर दरेकर यांनी सांगितले की, “पत्रकार म्हणून अलिबाग येथे कोट्यवधीची संपत्ती, तसेच दादरसारख्या भागातील एका टोलेजंग टॉवरमध्ये कोट्यवधीचा फ्लॅट म्हणजे थोडी संपत्ती नव्हे. तसेच, कारवाई झाल्यावर मराठीच्या नावाने भावनिक साद घालणे चुकीचे आहे. कारण, मराठी म्हणजे तुम्ही नाही, महाराष्ट्र म्हणजेही तुम्ही नाही, हे अनेकदा आम्ही सांगितले आहे. परंतु, आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्रीयन असे चित्र उभे करायचे, ही त्यांची नेहमीची पद्धत आहे,” असा टोलाही दरकेर यांनी लगावला.