आज भारताच्या संसदीय राजकारणात चारही दिशांनी ‘कमळ’ उमलल्याचे दिसते, त्याच्या मूळाशी एकात्म मानव दर्शनच आहे. त्याची सर्वात सहज आणि प्रखर अभिव्यक्ती नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वाच्या रुपात आपल्या समोर प्रकट होत आहे.
समस्त हिंदू धर्मीयांविषयीच्या गहिर्या आपुलकीचा भाव-बोध म्हणजेच हिंदुत्व. हिंदू कुटुंबात जन्म घेऊनही, हिंदूंच्या सण-उत्सव तथा सामाजिक-सांस्कृतिक परंपरांवर निष्ठा नाही, हिंदूंच्या आदर्श महापुरुषांबद्दल मनात श्रद्धा नाही, हिंदूंच्या दुर्दशेने वेदना होत नाही आणि हिंदूंवर होणार्या अत्याचारांना वाचून-ऐकूनही हृदयात क्षोभ, आक्रोश, क्रोध निर्माण होत नाही, तो हिंदुत्वविहीन हिंदू काही कामाचा नाही.
हिंदुत्वाचा विरोध करणारे स्वयंघोषित उदारवादी झालेले आहेत. पण, मूळात ते अनुदारवादी आहेत. प्रत्यक्षातले उदारवादी, तर हिंदुत्वाला आत्मसात करणारे लोक आहेत. राजकीय क्षेत्रात प्रारंभी डाव्यांनी आणि आता काँग्रेसी नेतृत्वाने ‘हिंदुत्व’ शब्दाला ‘वादी’ पद जोडून नवाच ‘हिंदुत्ववादी’ शब्द तयार केला आणि त्या शब्दाला फुटीरतावादी, दहशतवादी याप्रमाणे बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले. हिंदूविरोधातील काँग्रेसचे अशाप्रकारचे उद्योग हिंदू धर्मीयांसाठी सातत्याने दुर्दैवी ठरले आणि आजही दुर्दैवीच ठरत आहेत. काँग्रेसने ‘हिंदुत्ववादी’ शब्द हिंदू अस्मितेसाठी संघर्ष करणारे समाजात लोकप्रिय होऊ नये म्हणून तयार केला. तथापि, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदू धर्मीयांना या सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवेदनशील तर केलेच, पण नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत विजयाचा डंका वाजल्याने हिंदूंमधील त्यांची लोकप्रियताही दिसून आली. काशिविश्वनाथ कॉरिडोरचा जीर्णोद्धारही पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केला आणि संपूर्ण भारतातील प्राचीन धार्मिक, सांस्कृतिक वारशाची प्रतीके असलेल्या मंदिरांना पुन्हा एकदा प्रतिष्ठा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, याची ग्वाहीही त्यांनी दिली. भारताला आपल्या धर्माची अवस्था पुन:प्राप्त झाल्यानंतर भारताचा आध्यात्मिक गौरव जागृत होईल, असे त्यांचे मत आहे.
दरम्यान, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या माध्यमातून एकात्म मानव दर्शनाच्या रुपात राजकीय क्षेत्रात हिंदुत्वाची विचारधारा प्रस्फुटीत झाली. एकात्म मानव दर्शनात राष्ट्राची परिभाषा पुढीलप्रमाणे दिलेली आहे - “ज्यावेळी एखादा मानवी समूह एखादे लक्ष्य, एखादा आदर्श, एखाद्या ध्येयाबरोबर असतो आणि भूमीच्या एखाद्या विशिष्ट भागाबद्दल मातृभूमीची भावना बाळगतो, तेव्हा तो समूह राष्ट्राची निर्मिती करतो. जर दोन्ही कोणत्याही एकाचा म्हणजे एखाद्या आदर्शाचा आणि मातृभूमीच्या भावाचा अभाव असेल, तर कोणतेही राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही.” शरीरात एक ‘स्व’ असतो आणि तेच व्यक्तीचे सार आहे, जर त्याने शरीराची सोबत सोडली, तर व्यक्तीला मृत मानले जाते. अशाचप्रकारे एखाद्या राष्ट्राबाबत ‘स्व’चा विचार, आदर्श अथवा मौलिक सिद्धांत असतात, तोच त्या राष्ट्राचा आत्मा असतो. कोणत्याही राष्ट्राचा एक आत्मा असतो आणि त्याला एक तांत्रिक नावही आहे. जनसंघाने आपलेसे केलेल्या सिद्धांत आणि धोरणात या नावाचा उल्लेख ‘चिति’ म्हणून करण्यात आलेला आहे. ‘चिति’ एक संस्कृत शब्द असून व्यापक स्तरावर त्याचा अर्थ ‘सार्वभौमिक चेतना’ असा आहे. तेच एकात्म मानव दर्शनाचे मूळ आहे. जर एखाद्या कर्मविशेषाचे गुण-दोष निर्धारित करण्याचे निकष असतील, तर ‘चिति’च आहे. जे काही आपल्या स्वभाव अथवा ‘चिति’शी अनुरुप असे, तेच स्विकारार्ह असते आणि संस्कृतीचा भाग होते. आपल्याला याच गोष्टींना पुढे न्यायचे आहे.
जे काही ‘चिति’च्या विरूद्ध असते, त्याला विकृत, नको असलेले मानून सोडून दिले जाते आणि त्यापासून बचावले पाहिजे. ‘चिति’च अशी कसोटी आहे ज्यावर प्रत्येक क्रिया, प्रत्येक दृष्टिकोनाची पारख केली जाते आणि ते स्विकारार्ह आहे अथवा नाही, हे निश्चित केले जाते. ‘चिति’ राष्ट्राचा आत्मा आहे. याच ‘चिति’च्या पायावर राष्ट्राची निर्मिती होते आणि ते राष्ट्र सशक्त व साहसी होते. हीच ‘चिति’ कोणत्याही राष्ट्राच्या एखाद्या महापुरुषाच्या कार्यातून परिलक्षित होत असते. याच मानव दर्शनाच्या विचारावर भाजप अजूनही वाटचाल करत आहे आणि त्याला आपल्या सुशासनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात क्रियान्वित करून अंत्योदयाचे स्वप्न साकार करत आहे.
पक्षाच्या मुंबईतील पहिल्याच अधिवेशनात अध्यक्षपदावरून अटलजींनी ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ असे म्हटले होते. आज भारताच्या संसदीय राजकारणात चारही दिशांनी ‘कमळ’ उमलल्याचे दिसते, त्याच्या मूळाशी एकात्म मानव दर्शनच आहे. त्याची सर्वात सहज आणि प्रखर अभिव्यक्ती नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वाच्या रुपात आपल्या समोर प्रकट होत आहे. याच कारणामुळे भाजपने शासन आणि राजकारणात संपूर्ण परिवर्तन घडवण्यात यश मिळवले. भाजपचे हे नवे प्रारुप हिंदुत्व आणि विकासाला एकाच नाण्याच्या दोन बाजू मानते. तसेच भारताशी आपुलकीचे नाते संसदीय व्यवस्थेत कोणी निर्माण केले असेल, तर भाजपनेच, हेही तथ्य आहे.
मला बालपणापासूनच स्वामी विवेकानंदांनी प्रेरणा दिली. रवींद्रनाथांनी म्हटलेले आहे, जर एखाद्याला भारत समजून घ्यायचा असेल, तर त्याने विवेकानंदांचे साहित्य वाचले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी दाखवलेल्या मार्गावर चालत मी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना मला मार्गदर्शन करताना आणि समाजाचे नेतृत्व करताना पाहिलेले आहे. याच धार्मिक आणि सांस्कृतिक चेतनेला आज पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ‘न्यू इंडिया’च्या नावाने ओळखतो. नवभारताच्या याच कल्पनेच्या कारणाने आज प्रत्येक कार्यकर्त्याला ‘भक्त’ म्हटले तरी अभिमान वाटतो आणि सातत्याने ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ असे म्हणतो.
श्वेता शालिनी
(लेखिका भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आणि भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय प्रकोष्ठ (सेल)च्या प्रदेश प्रभारी आहेत.)
(अनुवाद : महेश पुराणिक)