धर्मसंस्कारांची समाजनिष्ठ प्रतिभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2022   
Total Views |

manasa
धर्म संस्कार, समाजहितासाठी सुनियोजित कार्य करणार्‍या डॉ. प्रतिभा बोथारे. विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती आयामाच्या त्या कोकण प्रांताच्या संयोजिका आहेत. त्यांच्या जीवनविचारांचा घेतलेला हा मागोवा.

डॉ.प्रतिभा बोथारे या विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती आयामाच्या कोकण प्रांत संयोजिका आहेत. शिव कल्याण केंद्राच्या विश्वस्त आहेत.‘एमबीबीएस’, ‘एमडी’, ‘डीजीओ’पर्यंतआरोग्यशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रतिभा यांचे मुंबईमधील अंधेरीला ‘सुगुण हॉस्पिटल’ही आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात त्या अत्यंत कुशल स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणूनही ओळखल्या जातात. धर्म समाजासाठी धडाडीने कार्य करणार्‍या अतिशय संवेदनशील डॉ. प्रतिभा बोथारे यांच्या वृत्तीतला हा सेवाभाव, हे जाज्वल्यधर्मप्रेम समाजनिष्ठा कुठून आली? याचा मागोवा घेताना कळते की, गुणवंतराव शिंदे आणि सुमन शिंदे या लातूरच्या दाम्पत्याला तीन अपत्ये. त्यापैकी एक प्रतिभा. गुणवंतराव हे अभियंता आणि सरकारी नोकरी करत होते, तर सुमनबाई गृहिणी. घरी आर्थिक आणि संस्कारांचीही सुबत्ताच! प्रतिभा यांची आजी काशीबाई. निजामाच्या सत्ताकाळात काशीबाईंनी पतीच्या निधनांनतर तळहातावर शीर घेऊन पदरात निखारे बांधूनच मुलांना वाढवले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलाला ‘इंजिनियर’ केले. काशीबाई प्रतिभा यांना रामायण, महाभारतातल्या कथा सांगत. सासर-माहेर आणि राज्याच्या प्रतिष्ठेसाठी सीतामायचा त्याग आणि कष्ट सांगत असत. आजीच्या कथा ऐकून लहानपणापासूनच प्रतिभा यांच्या मनात भारतीय संस्कृती, धर्मसंस्कारांबद्दल कमालीचा प्रेम आणि आदरभाव निर्माण झाला. त्यामुळेच की कायपुढे त्या समाज आणि धर्मसंस्कारांसाठी काम करू शकल्या. तसे म्हटले तर प्रतिभा यांनी डॉक्टर व्हावे, ही त्यांच्या आईची इच्छा. लातूरमधील जाजनूरसारख्या गावात काही दशकांपूर्वी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी जागृती नव्हती. त्यात पाण्याचे दुर्भिक्ष. एक एक महिना नळालापाणी यायचे नाही.
गावातल्या आयाबाया एक कळशी पाण्यासाठी दिवस दिवस राबायच्या. त्यांचे आरोग्याचे प्रश्न खूप गंभीर असायचे. हे सगळे प्रतिभा यांनी जवळून पाहिले. आपण डॉक्टर व्हावे आणि या आयाबायांचे प्रश्न सोडवावे, असे प्रतिभा यांनाही वाटे. त्यांनी त्यांचे पूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित केले. पदवी परीक्षेत त्यांना कर्नाटक विद्यापीठातून सुवर्णपदकही मिळाले. पुढे ‘एमबीबीएस’पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांचा विवाह डॉ. कैलाश बोथारे यांच्याशी झाला. सासर मुंबईत. मुंबईत सुरुवातीला त्यांनी दुसर्‍याच्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम केले. लग्नानंतर त्यांनी ‘एमडी’चे शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या काळात सासरच्यांची साथ होतीच. पुढे प्रतिभा यांनी पतीच्या सोबतीने स्वत:चे रुग्णालय सुरू केले. पण, ग्रामीण भागातल्या महिलांचे त्यांनी अनुभवलेले प्रश्न त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हते. याच काळात त्यांच्या परिचयातील एक स्नेह्याने रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडिया यांच्या ग्रामविकास कार्याबद्दल त्यांना सांगितले. साधारण १२ वर्षांपूर्वीचा काळ होता. त्यावेळी डॉ. प्रतिभा यांनी विमल केडिया यांच्या मार्गदर्शनाने वाडा, जव्हार, पालघरसारख्या वनवासीहुल क्षेत्रात ‘आरोग्य सेवा’ उपक्रम राबवायला सुरुवात केली.
त्यानंतर साधारण नऊ वर्षांपूर्वी एक घटना घडली आणि तोपर्यंत स्वत:ची अत्यंत ‘सेक्युलर’ म्हणून ओळख देणार्‍या डॉ. प्रतिभा यांच्या विचारांत आमूलाग्र बदल झाला. एक सामाजिक कार्यकर्त्या एका अत्यंत भेदरलेल्या मुलीला त्यांच्याकडे उपचारासाठी घेऊन आल्या. तिच्यावर शब्दातीत भयंकर शारीरिक लैंगिक अत्याचार झाले होते. तिने डॉ. प्रतिभा यांना सांगितले की, ती मुंबईतल्या एका संपन्न उच्चवर्णीय घरातील मुलगी. तिने आईवडिलांच्या मर्जीविरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केला. मुलासोबत पळून जाताना घरातले लाखो रुपयांचे दागिने आणि पैसेही ती घेऊन गेली. मुलाने तिला मुंब्र्याला नेले. तिने धर्मांतर करण्यास नकार दिल्यावर त्या मुलीला ‘काफिर’ ठरवले गेले. सजा म्हणून घरातल्या इतर पुरुषांनी तसेच त्या मुलाच्या मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. दोन महिने असेच यातनेत गेले. शेवटी हिंमत करून एकेदिवशी तिने गुजराती भाषेत मदतीसाठी चिठ्ठी लिहून खिडकीतून खाली फेकली. सुर्दैवाने ही चिठ्ठी एका सज्जन व्यक्तीला मिळाली. पुढे तिला तिथून बाहेर काढण्यात आले. मात्र, तिच्या संपन्न सुस्थितीतल्या आईवडिलांनी तिला पुन्हा घरात घ्यायला साफ नकार दिला. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने या मुलीच्या देखभालीची आणि निवासाची जबाबदारी स्वीकारली. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुलीला कुठे नेले, तिथे तिची व्यवस्था कशी आहे, हे पाहण्यासाठी प्रतिभा स्वत: तिच्यासोबत गेल्या. प्रतिभा यांनी पाहिले की, तिथे मुलीची व्यवस्थित काळजी घेतली गेली. इतकेच नव्हे, तर विशेष प्रयत्न करून त्या मुलीला तिच्या पालकांकडेही परत पाठवले गेले. या घटनेचा मागोवा घेतानाच त्यांना लक्षात आले की, ही अशी एकटीच मुलगी नाही, तर मुंबईतून दरवर्षी अशा हजारो मुली गायब होतात. या मुलींचे पुढे काय होते? या विचारांनी प्रतिभा अस्वस्थ झाल्या.
त्यातूनच त्यांचे धर्मसमाजावार आधारित सेवाकार्य सुरू झाले. विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती आयामात त्या कार्य करू लागल्या. त्यांनी आजपर्यंत शेकडो मुलींना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या सुगुण रुग्णालयात मुलींना आरोग्य सेवा क्षेत्रातील विविध सेवासंधीबाबत प्रशिक्षणही दिले जाते. मुंबईच्या वस्त्यांमध्ये मुलीमहिलांनी सुरक्षित राहावे, धर्म, समाज आरोग्यासंदर्भात जागरूक राहावे, यासाठी डॉ. प्रतिभा विशेष कार्य करतात. डॉ. प्रतिभा प्रश्न उपस्थित करतात की, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट बघून आपण अस्वस्थ होतो. पण, आपल्या लाडक्या मुंबईतही अशा अनेक वस्त्या आहेत की, जिथे आयाबायांच्या जगण्याचा संघर्ष भयंकर आहे. वस्तीपातळीवरील महिलांनी सक्षम व्हावे, म्हणून प्रतिभा सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या सेवाकार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्या म्हणतात, “या माझ्या समाजभगिनींसाठी आणि समाजासाठी आयुष्यभर कार्य करायचे आहे.” डॉ. प्रतिभा यांच्यासारखे ध्येयवादी मातृशक्ती ही समाजासाठी आदर्श आहे, हे नक्की!
 
 
@@AUTHORINFO_V1@@