हवामान बदल कासवांच्या ‘मुळावर’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2022   
Total Views |

kasuv
 
 
जागतिक हवामान बदल ही केवळ एक परिस्थिती राहिली नसून तिचे परिणाम जाणवू लागले आहेत. महाराष्ट्रातील सागरी जीवांच्या विणीवरदेखील त्याचे परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. या परिणामांना सामोरे जाणारी एक प्रजात म्हणजे सागरी कासव. हवामान बदलामुळे तापमानात वाढ झाल्याने कोकणातील सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे. याविषयी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाचा ऊहापोह करणारा हा लेख....

'ऑलिव्ह रिडले’ कासवाविषयी
 
जगभरात सागरी कासवांच्या सात प्रजाती आढळतात. त्यापैकी ‘ऑलिव्ह रिडले’ जातीचे कासव हे सागरी कासवांमध्ये संख्येने सर्वात जास्त असणारे समुद्री कासव आहे. ‘ऑलिव्ह’ हिरव्या रंगाच्या कवचामुळे या कासवाला ‘ऑलिव्ह रिडले’ असे नाव पडले. इंग्रजीत ’रिडले’ म्हणजे लहान आकाराचा. अदमासे ३५ ते ४५ किलो वजनाची ही कासवे दोन ते अडीच फुटांपर्यंत वाढतात. सर्वभक्षी अशी ही प्रजात निरनिराळ्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करते. खेकडे, कोळंबी, लॉबस्टर, सी अर्चिन, जेलीफिश, शैवाल आणि मासे हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. हे कासव हिंद महासागरासारख्या थंड तापमान असणार्‍या समुद्रात अधिवास करत नाहीत. उलटपक्षी अरबी समुद्र किंवा उपोष्ण कटिबंधीय समुद्रात अधिवास करतात. या कासवाच्या वल्ह्यासारख्या पुढच्या परांवर एक नख असते. विणीच्या हंगामात हे कासव २० ते ३० दिवसांच्या अंतराने एक ते तीन वेळा विण करू शकते. यावेळी ते साधारण १०० ते १५० अंडी घालतात.

hangam 
 
कोकणातील विणीचा हंगाम
 
कोकण किनारपट्टीवर दरवर्षी ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. रायगडमधील चार आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी किनार्‍यांवर सागरी कासवांची विण होते. पूर्वी मुंबईच्या वर्सोवा, जुहू, गिरगाव, राजभवन किनारपट्टीवर या कासवांची विण होत होती. मात्र, वाढत्या शहरी करणा१४ मुळे आणि किनार्‍यांवर मानवी वावर वाढल्यामुळे कासवांची विण बंद झाली. सध्या कोकण किनारपट्टीवर सागरी कासव संवर्धन केले जाते. यामध्ये मादी सागरी कासवाने घातलेली अंडी ही ‘हॅचरी’मध्ये हलवली जातात. त्यानंतर जन्मलेल्या पिल्लांना कासवमित्रांकडून समुद्रात सोडण्यात येते. वेळास आणि आंजर्ले या किनार्‍यांवर कासव महोत्सवासारखे उपक्रम राबवून स्थानिकांना रोजगार निर्माण करुन दिला जातो.
 
'डेटा लॉगर’चा वापर
 
हवामान बदलामुळे होणार्‍या तापमान वाढीचा कोकणातील सागरी कासवांच्या प्रजोत्पादनावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी एक संशोधन प्रकल्प सुरू होता. वन विभागाच्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’च्या माध्यमातून आणि ’भारतीय वन्यजीव संस्थान’चे वरिष्ठ संशोधक डॉ. के. सिवाकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएचडी स्कॉलर’ सुमेधा कोरगावकर या अभ्यास करत होत्या. घरट्यामधील तापमानाची नोंद करण्यासाठी कोरगावकर यांनी ’टेम्परेचर डेटा लॉगर’चा वापर केला. ’टेम्परेचर डेटा लॉगर’ हा एक संच असून प्रत्येक संचास उभ्या दांडीसारखे आठ ’सेन्सर’ आहेत. हे ’सेन्सर’ संवेदनशील असून ते ०.१ अंश सेल्सिअससारख्या अगदी सूक्ष्म तापमानाचीही नोंद करतात. हे ’सेन्सर’ घरट्यांमध्ये लावले जातात. या ’सेन्सर’द्वारे प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने घरट्यामधील तापमानाची नोंद होते. किनार्‍यांवर विजेची सोय नसल्याने सौरऊर्जेचा वापर करुन हे ‘डेटा लॉगर’ कार्यान्वित ठेवले जातात. ’डेटा लॉगर’मध्ये ’जीएसएम’ यंत्रणा बसविण्यात आल्याने ही माहिती थेट मोबाईलवर मिळते. यामुळे एखाद्या घरट्यामध्ये तापमान वाढत असल्याची माहिती किनार्‍यावरील कासवमित्राला वेळीच देऊन उपाययोजना राबवणे शक्य होते. ’डेटा लॉगर’च्या माध्यमातून केलेल्या अभ्यासाअंती कोकण किनारपट्टीवरील कासवांचा विणीवर तापमान बदलाचा गंभीर परिणाम होत असल्याची माहिती उघड झाली आहे.

detaaa 
 
तापमानवाढीचा परिणाम
 
पूर्वी कोकण किनारपट्टीवर नोव्हेंबर ते डिसेंबर या थंडीच्या महिन्यांमध्ये सागरी कासवांची मोठ्या संख्येने घरटी सापडत होती. मात्र, आता गेल्या काही वर्षांमध्ये सागरी कासवांची घरटी फेब्रुवारी ते मार्च या उन्हाळी महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने सापडू लागली आहेत. यामागील कारण, प्रामुख्याने जागतिक तापमान वाढ आहे. सागरी कासवांच्या पिल्लांचे लिंग विकसित होण्यामध्ये घरट्यातील तापमान महत्त्वाची भूमिका बजावते. साधारण घरट्यामधील २९.५ अंश सेल्सिअस तापमानात समानरित्या नर आणि मादीचे लिंग विकसित होते. शिवाय ३३ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान अंड्यांच्या विकासाकरिता सुरक्षित असते. मात्र, त्यापुढील तापमानात अंड्यांमध्ये केवळ मादी लिंग विकसित होते. कोरगावकर यांनी ’डेटा लॉगर’च्या मदतीने केलेल्या तपासणीअंती कोकणातील घरट्यामधील तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्यााचे नोंदवले. कोकणातील कासव विणीचे बहुतांश किनारे नदीमुखाशी आहेत. परिणामी, पाण्याबरोबर वाहून येणार्‍या गाळाचे कण वाळूमध्ये मिश्रित होतात. अशा परिस्थितीत घरट्यामधील आर्द्रता आणि बाहेरील तापमान वाढल्यास गाळमिश्रित वाळू दगडासारखी कडक होते. त्यामध्ये पिल्ले अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद कोरगावकर यांनी गावखडी आणि वायंगणीच्या किनार्‍यांवरुन केली आहे.
 
मुंग्यांचा प्रभाव
 
घरट्यामधील वाढते तापमान आणि निर्माण होणारी आर्द्रता ’डोरिलस ओरिएंटलिस’ या मुंग्यांसाठी पोषक असते. अशा परिस्थितीत या मुंग्यांचा घरट्यांमधील वावर वाढल्याने त्या कासवांच्या पिल्लांना आणि परिपक्व अंड्यांना खातात. कोळथरे आणि वायंगणी (वेंगुर्ला) येथील घरट्यांच्या तपासणीअंती ही बाब समोर आली आहे. भारतात सर्वत्र आढळणार्‍या ’डोरिलस ओरिएंटलिस’ या लाल मुंग्या प्रामुख्याने जमिनीखाली अधिवास करत असून त्या अंध असतात. शेतीमध्ये त्यातही मुख्यत्वे कंदमुळांच्या शेतीमध्ये त्यांचा वावर असतो. या मुंग्यांचा कोकणातील किनार्‍यांवर नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे त्यांना मारण्याऐवजी पळवून लावून त्यांचे कासवांच्या घरट्यांवरील हल्ले कमी करण्यासाठी कोरगावकर यांनी स्थानिक कासवमित्र सुहास तोरसकर आणि प्रवीण तोडणकर यांच्या मदतीने काही उपाययोजनाही केल्या. त्यामध्ये कडुलिंबाच्या बियांची पावडर घरट्यांच्या बाजूने चर खोदून पेरली गेली. त्यामुळे मुंग्यांचा प्रभाव कमी होऊन कासवांच्या घरट्यांचे रक्षण झाल्याची नोंदही करण्यात आली.
 
सुरुच्या बनात जन्मदर अधिक
 
केंद्रीय ’पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालया’ने (एमईओएफसीसी) ’समुद्री कासव कृती आराखडा’ (अ‍ॅक्शन प्लॅन) घोषित केला आहे. या कृती आराखड्यामध्ये केंद्र सरकारने राज्य प्रशासनाला सागरी कासव विणीच्या किनार्‍यांवरील सुरुची झाडे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील अनेक किनार्‍यांवर होणार्‍या सुरुच्या झाडांच्या लागवडीवर रोख लावण्यात आली आहे. प्रामुख्याने समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येणार्‍या किनार्‍यांवर सुरुच्या झाडांची लागवड करु नये आणि केलेली असल्यास ती काढून टाकण्याची सूचना केंद्राने केली आहे. अशा परिस्थितीत मात्र, सागरी कासव विणीसाठी सुरुची झाडे महत्त्वाची असल्याची नोंद कोरगावकर यांच्या अभ्यासातून समोर आली आहे. सुरुच्या झाडांच्या खाली संरक्षित केलेल्या अंड्यांमधून जन्म घेण्यार्‍या पिल्लांचा जन्मदर अधिक असतो, अशी नोंद अभ्यासाअंती करण्यात आली आहे. कारण, वाढलेल्या तापमानात सुरुच्या खाली संरक्षित केलेल्या अंड्यांना सावली मिळते. परिणामी, घरट्यांमधील तापमान वाढत नाही आणि पिल्लांचा जन्म घेण्याचा दर हा ८० ते ९० टक्के असतो, असे कोरगावकर यांनी सांगितले.
 
उपाययोजना आखणार
 
’मँग्रोव्ह फाऊंडेशन’ने अर्थसाहाय्य केलेल्या या अभ्यासामुळे कासवांच्या विणीवर तापमान वाढीचा होणारा परिणाम लक्षात आला आहे. यासाठी कासव विणीच्या सात किनार्‍यांवर संरक्षित केलेल्या घरट्यांमधून माहितीचे संकलन करण्यात आले होते. नैसर्गिक अधिवासात तयार केलेले घरटे ‘हॅचरी’मधून हलवल्यानंतर त्यामधील पिल्लांचा जन्मदर कमी होत असल्याची नोंद, या अभ्यासाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या अभ्यासात सुचविलेल्या उपायांचा विचार करुन त्यावर अंमलबजावणी केली जाईल. याशिवाय, ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’ हा प्रकल्प पुढे नेणार आहे. ’डेटा लॉगर’चा वापर करून घरट्यांमधील तापमानाचे बदल समजून घेण्यासाठी आणि समुद्री कासवांचा जन्मदर वाढवण्याकरिता ठोस उपाय लागू करण्यासाठी दीर्घकालीन डेटा संकलित करण्याची योजना आखणार आहे.
- विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
@@AUTHORINFO_V1@@