मुंबै बँक प्रकरणात दरेकर यांची साडेतीन तास चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2022   
Total Views |
 
pravin darekar
 
 
 
मुंबई : 'राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची दडपशाही सुरू आहे. त्यातूनच भाजपच्या विविध नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. अशाच प्रकारे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एका प्रकरणात माझी देखील चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. आज झालेल्या चौकशीत आपण पोलिसांच्या प्रश्नांना आवश्यक ती उत्तरे दिली आहेत. मात्र, चौकशी दरम्यान पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे,' असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. सोमवार, दि. ४ एप्रिल रोजी माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकामध्ये मुंबै बँक प्रकरणात प्रविण दरेकर यांची सुमारे साडेतीन चौकशी करण्यात आली. 'पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते, त्यानुसार आपण पोलिस ठाण्यात उपस्थित राहून पोलिस अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत,' असे दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
 
 
 
मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजता सुरु झालेली चौकशी दुपारी ३ च्या सुमारास संपली. मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. त्यात सोमवार, दि. ४ एप्रिल रोजी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.
 
 
 
चौकशीबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, "सभासद म्हणून बँकेकडून काही लाभ घेतला का, अशाप्रकारचे गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न तीन तासात विचारण्यात आले. पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. अनेक वेळा उलटसुलट आणि तेच तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. ज्याची नियत साफ आहे, त्यांच्यावर अशाप्रकारच्या गोष्टीचा परिणाम होत नाही. अत्यंत मुद्देसूद, तपशीलवार जे जे विचारण्यात आले त्याची व्यवस्थित अशी उत्तरे दिली आहेत.'
 
 
 
'पोलिसांकडून नियमबाह्य प्रश्नांची विचारणा'
"मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात नोंद करण्यात आलेला हा गुन्हा एका संस्थेपुरता मर्यादित आहे. असे असतानाही इतर सस्था, राज्यस्तरीय फेडरेशन, बँक आणि अनेक विषयासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला, असे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच चौकशी दरम्यान, अनेक नियमबाह्य प्रश्नांची देखील पोलिसांकडून विचारणा करण्यात आल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.
 
 
 
चौकशीदरम्यान पोलिसांना वारंवार फोन
"मुंबै बँक प्रकरणात होत असलेल्या माझ्या चौकशी दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त स्वत: तिथे मॉनिटर करत होते. पोलिसांवर त्यांचा दबाव असल्याचे वारंवार स्पष्टपणे निर्देशित होत होते. परंतु ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली, त्यांनी त्यांचे कर्तव्य व्यवस्थित बजावले आहे. माझ्याकडे असलेली आवश्यक ती सर्व माहिती मी त्यांना दिली आहे. मात्र, संशयास्पद बाब म्हणजे माझी चौकशी सुरु असताना पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार कुणाचे तरी फोन येत होते. चौकशी दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना सहा-सात वेळा फोन आले, पण ते फोन नक्की कुणाचे होते याचा मात्र काही मागमूस लागला नाही,' असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
 
 
 
पोलिसांना सहकार्य करणार
'पोलिसांनी दिलेल्या नोटिसीप्रमाणे मी आज इथे हजर राहून आवश्यक त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या व्यतिरिक्त देखील जेव्हा पोलिसांना आवश्यकता वाटेल तेव्हा आपण पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तयार आहोत,' असे देखील दरेकर यांनी आश्वासित केले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@