संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील मातृशक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2022   
Total Views |

samyukta-maharashtra
 
 
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०५ हुतात्म्यांमध्ये महिलाही हुतात्मा झाल्या. या लढ्यात सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या, श्रीमंत, गरीब, कष्टकरी, उच्चविद्याविभूषित ते निरक्षर अशा सर्वच पार्श्वभूमीतील महिलांचे योगदान आहे. या लढ्यात विविध विचारधारेच्या महिला सक्रिय होत्या. जनसंघ, हिंदू महासभा ते कम्युनिस्ट, समाजवादी ते अगदी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या महिलाही होत्या. महाराष्ट्रावर होणार्‍या अन्यायाविरोधात आणि काँग्रेसच्या जुलमी अत्याचाराविरोधात एकजुटीने त्या उभ्या ठाकल्या. या सर्व मातृशक्तीचे, स्त्रीशक्तीचे स्मरण आज महाराष्ट्र दिनानिमित्त करायलाच हवे!
 
 
 
पुण्यातील एका नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण आलेे. उद्घाटन करणार इतक्यात भीमाबाई दांगट महिलेने “सुर्याजी पिसाळ, चालता हो!!!” असे म्हणत काळा झेंडा त्यांच्या दिशेने भिरकावला. त्यानंतर कार्यक्रमामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा जयघोष निनादला. ही घटना आहे. दि. १४ एप्रिल, १९५६ रोजीची. भीमा दांगट. पुण्यातील एक श्रीमंत कुटुंबातील विधवा महिला. त्या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. दान आणि समाजकार्यात आघाडीवर. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आर्थिक मदत म्हणून त्यांनी अंगावरचे दागिनेही काढून दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर पकडला. दिल्लीश्रेष्ठींना खुश करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील मराठी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून फारकत घेतली. या सगळ्यांची चिड महाराष्ट्रातल्या तमाम जनतेलाआली. त्यामुळेच १९५६च्या त्या दिवशी जनतेची प्रतिनिधी म्हणून भीमा दांगट यांनी यशवंतराव चव्हाणांसह इतर नेत्यांना जनतेची प्रतिक्रिया तीव्र कृतीतून दाखवून दिली. इतकेच नाही, तर भीमाबाई यांनी १४ वर्षांपासून असलेले आपल्या महानगरपालिकेच्या सदस्यत्वाचाही राजीनामाही दिला. भीमाबाई एक प्रातिनिधिक उदाहरण. त्यावेळी जनसंघाच्या पुण्यातील मालतीबाई परांजपे या शिक्षण मंडळावर होत्या. त्यांनीही या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. सत्तेत असताना सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या कृतीविरोधात आवाज उठवणार्‍या या महिला शक्ती.
 
 
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आव्हान म्हणून मोरारजी देसाई आणि सका पाटील यांनी मुंबईत जाहीर सभा घेतली. या सभेत महाराष्ट्रद्वेष्टे काय बोलतात, हे ऐकण्यासाठी तमाम जनसमुदाय गोळा झाला. यावेळी ‘काँगे्रस जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,’ अशी वल्गना मोरारजी आणि सका पाटील यांनी सुरू केली. सभेला जमलेले लोक निशस्त्र अगदी सोबत कागदाचा कपटाही घेऊन आली नाहीत. त्यामुळे सभेत काही गोंधळ किंवा हल्ला वगैरे होणार नाही, असे काँग्रेसी नेत्यांना आणि पोलिसांना वाटले. मात्र, त्यावेळी मोरारजी देसाई आणि सका पाटील यांची मुक्ताफळं ऐकून कोंडाबाई सावंत या महिलेचा राग अनावर झाला. साधीभोळी महिला. पण, रागाच्या भरात तिने सरळ पायातली चप्पल मोरारजी यांच्या दिशेने भिरकावली. तिचे पाहून जमलेल्या हजारो लोकांनी चपला भिरकावायला सुरुवात केली. नेत्यांना अक्षरशः पळता भुई थोडी झाली. थोडक्यात, भीमाबाई काय, मालतीबाई काय आणि कोंडाबाई काय, सर्वच जातीपातीच्या आणि आर्थिक सामाजिक स्तरातील महिला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर होत्या.
 
 
 
चळवळीबाबत काँग्रेसचे धुरीण म्हणत की, ‘उच्चभू्र लोक ब्राह्मण आणि मराठा वर्ग या लढ्यात सामील नाही. हा असाच बहुजनांचा थातूरमातूर लढा आहे.’ पण, काँग्रेस पक्षाचीच पाश्वर्र्भूमी असलेल्या प्रेमला चव्हाण यांनी शेकडो मराठा महिलांना या लढ्यात सामील केले. इतकेच नव्हे, तर चळवळीला विरोध करणार्‍या मंत्री आणि आमदारांना साडीचोळी पाठवली. तसेच‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चाळीतच चालते,’ असे काँग्रेसचे नेते टवाळकीने म्हणत. प्रसिद्ध चित्रकार रावसाहेब धुरंधर हे त्यावेळी मुंबईचे बडे प्रस्थ. त्यांची लेक अंबुताई हिने खार आणि आजूबाजूच्या बंगल्यांतील उच्चभू्र समाजाच्या महिलांना या चळवळीत सामील करण्याचे कार्य केले. विमला बागलसारख्या महिलांनी ग्रामीण भागातील महिलांना या चळवळीद्वारे राजकीय क्षेत्रातले द्वार खुले करून दिले. घरादारात अगदी कौटुंबिक समारंभातही महिला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे स्वप्न पाहत असत. असेच एक डोहाळेगीत त्यावेळी घरोघरी म्हटले जाई.
 
मम मैत्रिणींनो थट्टा कसली करिता
डोहाळे कसले पुसता
मज डोहाळे कसले हो होतात सांगते
चित्त द्या येथे संयुक्त महाराष्ट्र व्हावा
हा ध्यास लागला मनाला ध्यास
 
पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र होत गेला. दादर, परळ, लालबाग, गिरगाव नव्हे, दक्षिण मुंबई या लढ्याचे केंद्र झाले. परळमधली लक्ष्मी कॉटेज, कृष्णानगर चाळींमधील महिला सत्याग्रहात उतरू नयेत, म्हणून पोलिसांनी अश्रुधुरांचा मारा केला. अश्रुधूर मार्‍यामुळे गंगुबाई मसुरकर यांचे दीड महिन्याचे बाळ, सरोजिनी इडकर यांचे एक महिन्याचे बाळ, भागिरथी फाटक यांचे १५ दिवसांचे बाळ गुदमरू लागले. त्यावेळी परळ- लालबागच्या चाळीतील पार्वतीबाई भोईर ही महिला सरळ घरातून बाहेर आली. म्हणाली, “आम्हाला आमच्या मुलाबाळांना गुदमरून मारण्यापेक्षा आम्हाला गोळी मारा. पण, आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे.” पोलिसांनी तिच्यावर अश्रुधूर सोडला. या सगळ्या घटनेनंतर परळ-लालबागच्या चाळीतील जवळ जवळ ४०० आयाबाया आपल्या लेकरांसकट रस्त्यावर उतरल्या. त्यांना पाहून पोलिसांनी माघार घेतली. या महिलाशक्तीचा विरोध काँग्रेस सरकारने दाखवलेल्या माजाला, क्रूरतेला आणि दडपशाहीला होता. भाषावार प्रांतरचना देशभरात कार्यान्वित होत असताना महाराष्ट्रासाठी दुजाभाव का? मुंबई आणि महाराष्ट्राचे नाते म्हणजे शरीर आणि श्वास ते एकमेकांपासून दूर करणार, तेही केवळ सत्तेच्या दडपशाहीतून? त्यावेळी शाहीर अनुसया शिंदे पोवाड्यातून म्हणत-
 
 ‘एक पाय तुमच्या गावात,
दुसरा तुरूंगात किंवा स्वर्गात
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
त्याचसाठी वाणीचा हिला चेतविला जी जी
 
संयुक्त महाराष्ट्र चळवळीची महिला समितीही निर्माण झाली होती. विविध विचारसरणीलामानणार्‍या महिला या समितीमध्ये केवळ महाराष्ट्र प्रेमापोटी एकत्रित आल्या. त्यात जनसंघाच्या मीराताई पावगी, मालती परांजपे, सुशीला आठवले, शालिनी कुलकर्णी, हिंदू महासभेच्या शांता गोखले, कम्युनिस्ट विचारसरणीच्या अहिल्या रांगणेकर, तारा रोड्डी, गोदावरी परूळेकर, अनु लिमये, कुसूम रणदिवे, प्रजासमाजवादी पक्षाच्या प्रमिला दंडवते, यांच्यासोबतच समाजातील सर्वच स्तरातील महिला या लढ्यात उतरल्या होत्या. शैला पेंडसे, सुमन संझगिरी, प्रमोदिनी ताराशेट्ट्ये, मालिनी तुळपुळे, कमल भागवत, सुनंदा देसाई, निर्मला कुलकर्णी, पुष्पा त्रिलोकेकर आणि शालिनी राऊत, सुनंदा देसाई, मृणाल गोरे, शांती रानडे, अनसूया लिमये, प्रेमा पुरव, अवाबेने देशपांडे, जिर्जा देशमुख, पार्वतीबाई भोर, यशोदा माडीवाले, आणि किती जणींची नावे घ्यावीत? यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध करणार्‍या काँग्रेसी नेता काकासाहेब गाडगीळ यांची पत्नी अनसूया आणि मुलगी सुरेखा पी. पाणंदीकर होत्या. या लढ्यामध्ये लेखिका दुर्गाबाई भागवत आणि इस्मत चुगताई यांचेही योगदान आहे. अर्थात, सगळ्या महिलांची नावं लिहिणे जागेअभावी शक्य नाही. मात्र, त्या ज्ञात-अज्ञात सार्‍याजणींचा सहभाग शब्दातीतच आहे.
 
 
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकांनी सहभागी होऊ नये, म्हणून दररोज हजारो लोकांना तुरूंगात डांबले जायचे. या बांधवांचे खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. मुंबईत त्यावेळी जागोजागी खाणावळी होत्या. खाणावळी चालवणार्‍या आयाबाया दररोज जास्तीचे अन्न बनवत. भाकरी, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, म्हाद्या म्हणजे सातारापद्धतीचे पिठले बनवत. हे जास्तीचे अन्न गोळा करून आंदोलनकर्त्यांना दिले जाई. त्यावेळी शिकलेल्या गृहिणी न्यायालयाच्या कचेरीत जात. नव्याने कुणावर केस बनली आहे, तुरूंगात डांबले याची यादी तयार करत. या यादीनुसार मदत पुरवण्याची कार्यवाही महिला करत असत. या महिलांनी अक्षरशः लेकराबाळासकट तुरूंगवास भोगला. या लढ्यात कष्टकरी महिलांचा सहभाग मोठा होता. जनतेचाप्रक्षोभ शमावा म्हणून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्याचवेळी छत्रपती शिवाजी महराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी महाराष्ट्रात येणार होते. त्यावेळी मुंबई किनारपट्टीच्या हजारो कोळीण भगिनी पारंपरिक वेशभूषेत नेहरूंना विरोध करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहिल्या. पुढे प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचेपर्यंत क्रांतिसिंह नाना पाटलांची आई गोजाबाई आणि मुलगी हौसाबाईने हजारो महिलांसोबत त्यांच्याविरोधात निर्दशने केली. एकंदर जातीपातीच्या भिंती भेदून, लिंगभेद विसरून सगळा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. अधिकृतरित्या १०५ आणि अनधिकृतरित्या ११६ जणांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करले. त्यामुळे आचार्य अत्रे यांनी मोरारजी यांना ‘मर्डरजी’ असे नाव दिले. हा लढा, त्यातले हौतात्म्य आणि यश पोवाड्यातून मांडायला लिलू म्हापणकर, अनुसुया शिंदे, कुसूम गायकवाड आणि अनेक महिला पुढे सरसावल्या. कुसूम गायकवाड यांच्या पोवाड्यातून त्यावेळी महिलांना काय वाटले असेल, याचा अंदाज येतो- 
 
मोरारजी आला, आला गोळी घालण्याला
दाखविला मराठी बाणा, महाराष्ट्र चढवी माना
सत्याग्रही देऊनी ठाणा, दिल्लीला आणले भाना
मर्डरजी गेला गेला, जय महाराष्ट्र बोला...
 
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी सर्वभाषिक महिलांनी मोठे योगदान दिले. ‘तुची दुर्गा तू भवान’ असे स्वरूप जागवत हा लढा यशस्वी केला. या सगळ्या ज्ञात-अज्ञात माताभगिनींना महाराष्ट्र दिनानिमित्त वंदन!
 
 
@@AUTHORINFO_V1@@