नागपूर : "राज्याच्या अतिदुर्गम भागात आजही विजेचा लपंडाव कायम आहे. महावितरण ऐतिहासिक वीज निर्मितीचा केवळ कागदी दिखावा करत असून राज्यातील भारनियमन खरंच संपुष्टात आले असते तर वेळी-अवेळी वीज खंडित होण्याचे प्रकार घडले नसते.", असे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महानिर्मितीने विक्रमी कामगिरी साध्य केली असून गेल्या ६० वर्षातील सर्वाधिक वीज निर्मितीचा दावा केला आहे. परंतु हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे म्हणणे आहे. ते कोराडी येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "चंद्रपूर, गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातून, नंदुरबार पालघर आणि मेळघाट सारख्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यांवरून आजही जनतेचे फोन येत असून भारनियमनाने त्रस्त झालेले शेतकरी वेळी-अवेळी विजेचा लपंडाव कायम असल्याचे सांगत आहेत. भंडारा, गोंदिया भागात कुठे शेतीला वीज नाही तर कुठे गावात अंधार असल्याची स्थिती आहे. महत्वाचे म्हणजे या स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पीक वेळीच पाणी न मिळाल्यामुळे धोक्यात सापडले आहे."
"मिशन ८ हजार मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महावितरण काम करीत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु त्यासाठी केवळ कागदी विक्रम प्रस्थापित करून चालणार नाही. महावितरणला वास्तविक स्थिती तपासावी लागेल. एकीकडे महावितरणने गेल्या ६० वर्षातील सर्वाधिक वीज निर्मितीचे लक्ष गाठल्याचे जाहीर केले असताना अतिदुर्गम भागातील वीज खंडित होण्याचे प्रमाणही कायम असेल तर महावितरणच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.", असेही बावनकुळे यांनी पुढे म्हटले.